केंद्र स्तरावरील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करणार

24 Mar 2024 20:01:58
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर, 
MP Sudhir Mungantiwar : मी खासदार म्हणून निवडून आल्यास या मतदार संघातील केंद्र स्तरावरील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्राधान्य देईल. तशा समस्यांची यादीच आपण तयार केली असून, त्या सोडविण्यासाठी जनतेच्या आशीर्वादाची गरज आहे, असे आवाहन चंद्रपूर-आर्णी-वणी लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
 
 
sjAD
 
रविवारी पत्रकारांशी आभासीपध्दतीने संवाद साधताना ते बोलत होते. चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील विविध विधानसभा क्षेत्रातल्या औद्योगिक, रोजगार, आयुष्मान भारत, विविध क्लस्टर आणि इतरही एकूण 250 प्रश्न खासदार म्हणून निवडून आल्यानंतर केंद्र सरकारकडे मी मांडण्याचा आणि प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न करेल. मतदार संघातील जनता आपल्या समस्या डॅश-बोर्ड आणि वॉर रूमच्या माध्यमातून नोंदवू शकतात. त्या सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य स्तरावर मी प्रयत्न करीत राहीन, असेही ते म्हणाले.
 
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असूनही काँग्रेसचे उमेदवार त्यांच्या कार्यकाळात कोणतेही विकास प्रकल्प आणण्यात अयशस्वी ठरले. हिटलरच्या राजवटीत नाझी प्रचार मंत्री जोसेफ गोबेल्स यांच्यासारखाच काँग्रेस पक्ष मोठा लबाड असल्याची टिका त्यांनी केली. लोकसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी व या क्षेत्राला विकासाचे ‘रोल मॉडेल’ बनविण्यासाठी मला संसदेत पाठविण्यासाठी जनतेने आशीर्वाद द्यावा व पत्रकारांनी आपल्या लेखणीद्वारे सहकार्य करावे, असे आवाहनही मुनगंटीवार यांनी केले.
ते पुढे म्हणाले, जेव्हा मी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात निवडणुकीसाठी उभा राहिलो. त्याच वेळेस प्रतिज्ञा केली की बल्लारपूरला तालुक्याचा दर्जा मिळवून देणारच. तालुका मिळवून देण्यात जर मी असमर्थ ठरलो, तर मी निवडणूक लढणार नाही, असेही त्यावेळेस जनतेला सांगितले. परंतु, ती वेळ माझ्यावर आली नाही. आमदारकीच्या कार्यकाळात बल्लारपूरला तालुकाच्या दर्जा मिळवून दिला. विसापूर येथे अटल बिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डन, एपीजे अब्दुल कलाम गार्डन, चंद्रपूर येथे सैनिकी शाळा, चंद्रपूर येथे 100 खाटांचे कॅन्सर हॉस्पिटल, चंद्रपूर येथे सर्व सोयींनी युक्त असे वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर, मूल बल्लारपूर येथे प्रवाशांसाठी आकर्षक बसस्थानके निर्माण केली. शेतकर्‍यांसाठी सिंचनाच्या सोयी, महिला भगिनी आत्मनिर्भर बनण्यासाठी स्वयंरोजगार निर्मिती, दुर्धर आजाराने ग्रस्त असणार्‍या रुग्णांसाठी महाआरोग्य मेळावे घेऊन त्यात निदान व शस्त्रक्रिया करून त्यांना सहकार्य केले. त्यामुळेच जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
26 मार्च रोजी सादर करणार नामांकन
 
येत्या 26 मार्च रोजी चंद्रपूर येथे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. 26 मार्च रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे राजेंद्र जैन, शिवसेनेचे किरण पांडे, आरपीआयचे जोगेंद्र कवाडे आणि अन्य भाजप नेत्यांच्या उपस्थितीत हा उमेदवारी अर्ज करण्यात येणार आहे. तत्पूर्वी, येथील शिवाजी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे.
Powered By Sangraha 9.0