नागपूर,
Seven-day Kirtan राष्ट्रीय कीर्तनकार कै. दिलीपबुवा डबीर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, वैदर्भीय हरिकीर्तन संस्थेने, उज्ज्वलनगरातील श्रीहनुमान मंदिर सेवा सांस्कृतिक मंडळ यांच्या सहकार्याने सात दिवसांच्या कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे.वर्धा मार्गावरील उज्ज्वलनगर येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणात, बुधवार दि. २७मार्च ते मंगळवार दि. २ एप्रिल या कालावधीत रोज सायंकाळी ६.00 ते ९.00 या कालावधीत ही कीर्तने होतील. महाराष्ट्रातील प्रख्यात सात कीर्तनकार या महोत्सवात आपली कीर्तनसेवा देणार आहेत. प्रस्तुत महोत्सवात चार राष्ट्रीय कीर्तने आणि तीन पारंपरिक कीर्तने सादर होतील .प्रसिद्ध प्रवचनकार -वेदांती मंदाताई गंधे (अमरावती) यांच्या हस्ते दिनांक २७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता महोत्सवाचे उद्घाटन होईल. पुणे येथील युवा कीर्तनकार श्रेयस बडवे यांचे, ‘नरवीर तानाजी मालुसरे’ या विषयावर उद्घाटनाचे दिवशी कीर्तन होईल.गुरुवार, दि. २८ मार्च रोजी पुणे येथील कीर्तनकार अवंतिका टोळे यांचे ‘संत रोहिदास’ या विषयावर कीर्तन होईल तर शुक्रवार, दि. २९मार्च रोजी अनुभवबुवा डबीर हे ‘भस्मासुर-मोहिनी’चे आख्यान सादर करतील. या दिवशी मध्यांतरात जगदंबेचा जोगवा सादर होईल.
शनिवार, दि. ३० मार्च रोजी ‘द्रौपदी स्वयंवर’ या विषयावर ज्येष्ठ कीर्तनकार श्यामबुवा धुमकेकर यांचे कीर्तन होईल तर, रविवार, दि. ३१ मार्च रोजी पुणे येथील कीर्तनकार संदीपबुवा मांडके ‘अफजलखान वध’ या विषयावर कीर्तन सादर करतील.Seven-day Kirtanसोमवार, दि. १एप्रिल रोजी ‘फाळणीतील बलिदान’ या विषयावर ज्येष्ठ कीर्तनकार मोहनबुवा कुबेर यांचे कीर्तन होईल तर, समारोपाच्या दिवशी म्हणजे मंगळवार, दि. २ एप्रिल रोजी प्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांचे ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’ या विषयावर कीर्तन होईल.रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू आचार्य हरेराम त्रिपाठी कीर्तनमहोत्सवाच्या समारोपाचे प्रमुख अतिथी असून, मुंबई येथील ज्येष्ठ कीर्तनाचार्य श्रीपादबुवा ढोले यांचा अतिथींच्या हस्ते याप्रसंगी सत्कार करण्यात येईल.या महोत्सवा दरम्यान, कै. दिलीपबुवा डबीर यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंवर त्याचे शिष्य सुरेश खापेकर, शुभांगी चिंचाळकर, प्रज्ञा कुळकर्णी, श्रुती वाघ आणि मृण्मयी कुलकर्णी मनोगत व्यक्त करणार आहेत.
राहुल गणोरकर, श्रुती वाघ, चिन्मय देशपांडे या तीन युवा कीर्तनकारांना दि. २८ मार्च रोजी, तसेच वेदशास्त्रांचा व्यासंग करणारे सर्वेश जोशी, मानस जोशी आणि सुमीत देशमुख या तीन वेदाध्यायींना दि. ३० मार्च रोजी सन्माननीयांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील.Seven-day Kirtan संपूर्ण महोत्सवात स्वानंद नेने (रत्नागिरी) हे ऑर्गनवर, सारंग पेंडसे (अचलपूर) हे तबल्यावर, धनंजय गाडगीळ (सांगली) हे व्हायोलिनवर आणि अरविंद उपाध्ये (नागपूर) हे बासरीवर वाद्यसंगती करतील. ज्येष्ठ निवेदक प्रकाश एदलाबादकर संपूर्ण महोत्सवाचे सूत्रसंचालन करतील. अजय संचेती, आशीष फडणवीस, शिवानी दाणी-वखरे, निखिल मुंडले, संदीप जोशी, आशुतोष शेवाळकर, प्रा. सुरेश तेलंग, भालचंद्र मूर्ती, जयंत पालकर आणि शिरीष पटवर्धन हे या महोत्सवाचे प्रमुख आश्रयदाते आहेत .
कीर्तनमहोत्सवाच्या निमित्ताने आयोजकांनी रविवार, दि. ३१ मार्च रोजी ‘श्रीगजानन विजय’ ग्रंथाचे सामूहिक पारायण आयोजित केले आहे. या पारायणात ज्या भाविकांना सहभाग घ्यायचा असेल त्यांनी दिनांक २९ मार्चपर्यंत आपले नाव कीर्तनस्थळी असलेल्या देणगी कक्षावर नोंदवावे आणि पारायणाचे वेळेस आपला ग्रंथ, आसन आणि आरतीचे साहित्य सोबत आणावे अशी सूचना आयोजकांनी केली आहे. या कीर्तन महोत्सवास भाविक-रसिक नागरिकांनी अगत्याने यावे, असे आवाहन वैदर्भीय हरिकीर्तन संस्थेचे अध्यक्ष मुकुंदबुवा देवरस, प्रमुख संयोजक मोहनबुवा कुबेर आणि श्रीहनुमान मंदिर सेवा सांस्कृतिक मंडळाच्या कार्यकारी मंडळाने केले आहे.
सौजन्य : प्रकाश एदलाबादकर,संपर्क मित्र