शिमगाच, पण नव्या काळातला!

    दिनांक :24-Mar-2024
Total Views |
- डॉ. चंद्रशेखर टिळक
ज्येष्ठ अभ्यासक
Shimga and Elections : शिमगा आणि निवडणुकांच्या घोषणा यात फार मोठे साम्य असते. आपल्याकडे आधीपासूनच शिमगा म्हणजे जणू अर्वाच्च भाषेत बोलण्याची संधी वा परवानगी अशा अर्थाने साजरा केला जाणारा सण मानला जातो. या अर्थाने विचार करायचा तर यंदा शिमग्याच्या पृष्ठभूमीवर लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली. निवडणूक आयोगाने निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले असून निवडणुका ही तर अर्वाच्च भाषेत बोलण्याची नामी संधी असतेच! पण आजकालचे सामाजिक आणि राजकीय वातावरण बघता अर्वाच्च बोलण्यासाठी आता आपण निवडणुका वा शिमग्याची वाट बघतो असे नाही. वाढत्या अर्थव्यवस्थेत आणि त्यातही मोदी अर्थकारणाविषयी बोलले जाते की, सगळ्या महत्त्वाच्या आर्थिक घोषणा अर्थसंकल्पाबाहेर होतात. त्या धर्तीवर सांगायचे तर अर्वाच्च बोलणे, एकमेकांच्या नावाने ओरडणे हे आपल्याकडे शिमग्यालाच नव्हे तर अव्याहत सुरू असते. त्यामुळे खरे तर शिमग्याचे सार्वत्रिकीकरण हेच अलिकडच्या काळातील ठळक वैशिष्ट्य मानावे लागेल.
 
 

leader 1
 
Shimga and Elections : कोकणातील मंडळींना शिमग्याचे फार महत्त्व, उत्साह असायचा आणि आजही आहे. मुंबईत आलेला नोकरदार वर्ग गणपती आणि शिमग्याला कोकणातल्या आपल्या गावी गेला नाही, असे कधीच होत नाही. पण याचे महत्त्व ओळखल्यामुळे कदाचित एक वेगळाच शिमगा सुरू झाल्यासारखी परिस्थिती आहे. ती अशी की, शिमग्याच्या अगदी आधी काही दिवस कोकणात जाणार्‍या 18 गाड्या काही दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या. आता ही शिमग्याची बोंब मारण्याची रेल्वेची नवी पद्धत आहे की काय हे समजायला मार्ग नाही. कारण त्यापूर्वीच दोन दिवस एसटीचा व्यवसाय जास्तीत जास्त वाढता राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे शिंदे सरकारकडून जाहीर करण्यात आले होते. त्यामुळेच रेल्वे गाड्याच बंद केल्या की, लोक आपोआप एसटीने जातील आणि त्यानिमित्ताने झालेल्या वा न झालेल्या रस्त्यांची चर्चा करता येईल, हा शिंदेशाहीचा शिमग्याची बोंब मारण्याचा वेगळा प्रकार तर नाही ना, याचा विचार करावा लागेल.
 
 
लोक म्हणतील, भटाचे डोके फार चालते... तसेही अलिकडे भटांच्या नावे वर्षभर शिमगा सुरूच असतो. असो. एकंदरीतच तीन मोठे नेते एकत्र आले आणि ‘तीन तिघाडा, काम बिगाडा’ असा Shimga and Elections शिमगा उभ्या महाराष्ट्राने पाहिला. एकंदरीतच सध्या शिमगा सार्वत्रिक आहे. पूर्वीच्या शिमग्याच्या पूजेमध्ये म्हणे आधी एरंडाचे झाड लावायचे. याचे मी ऐकत आलो ते असे की, टाळू खूप तापल्यास डोक्यावर एरंडाचे तेल थापले जाते. म्हणजेच एकीकडे डोक्याचा ताप कमी करण्यासाठी शिमग्याच्या आधी एरंडाचे झाड लावले जायचे. पण आत्ताच्या राजकीय आणि सामाजिक शिमग्यामध्ये तुमच्या-माझ्या सद्सद्विवेकबुद्धीचा एरंड जाणला जातो का, हेही पाहावे लागेल. शिमगा हा एकमेव सण आहे, ज्यात सामाजिक संकेत बाजूला ठेवले जातात. शिमग्याच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य असला तरी रात्री होळी पेटल्यानंतर सकाळी ज्या घरातील पोळी खाल्ली तिथल्याच लोकांच्या नावे बोंब मारण्याची सवलत वा सोयही संस्कृतीने करून ठेवली आहे. हल्ली घोषणांची पुरणपोळी दिली जाते आणि अंमलबजावणीच्या अभावाचा शिमगा मात्र नेहमीच कानी येतो. अन्यथा, कोकणात जाणारे वा गावखेड्यातले अनेक रस्ते इतकी वर्षे कशास अडले असते...!
 
 
Shimga and Elections : होळी आणि धुळवड अगदी तोंडावर असताना देशात आचारसंहिता लागू झाली. मात्र ती थोडी पुढे गेली असती तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते. म्हणजेच गेली काही वर्षे गणपती, दहीहंडी, दसरा, दिवाळी आदी सणांसाठी प्रायोजक-आयोजक करणारे गट सक्रिय झाले आहेत. त्याच धर्तीवर कदाचित अनेक राजकीय गटातटांना शिमग्याचे प्रायोजकत्व घेण्याची उत्तम सोय झाली असती. निवडणुकीच्या आदल्या दिवशी लोकांमध्ये काहीबाही वाटण्यापेक्षा शिमग्याच्या निमित्ताने जागरूकतेने आणि अधिकृतपणे बरेच काही वाटता आले असते... अर्थात गमतीचे हे मुद्दे सोडले, तरी या सणावारांमधील अर्थकारण आणि समाजकारण लक्षात घ्यायला हवे. सार्वत्रिकपणे साजरा होणे हे होळीचे एक वैशिष्ट्य आहे. इथे फरक लक्षात घेऊ या की, काळाच्या ओघात समाजनेतृत्वाने जाणीवपूर्वक सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्याचप्रमाणे तत्कालीन मंडळींनी दूरदर्शीपणातून शिवजयंती उत्सव सुरू केला. मात्र, होळीला सार्वत्रिक स्वरूप कोणा एकाने कोणा एकेकाळी दिल्याची नोंद नाही. म्हणजेच पहिल्यापासूनच ही केवळ सामूहिकच नव्हे तर सामाजिक प्रक्रिया राहिली आहे. हे बघता असा अंगभूत गुण हल्लीच्या सोशल मीडियामध्ये आढळतो का, याचाही विचार करावा लागेल.
 
 
व्हॉट्स अ‍ॅप आणि फेसबुकचे निरनिराळे उपयोग आता चलनात आहेत. त्यामुळेच सोशल मीडिया, त्यावरील भाषा आणि प्रकटीकरण हे अलिकडच्या आधुनिक होळीचे वेगळे रूप आहे का, याचाही विचार करायला हवा. अलिकडेच अवघ्या काही मिनिटांसाठी अचानक फेसबुक बंद पडले. त्यावेळी बहुसंख्य भारतीयांनी केलेली बोंबाबोंब पाहता त्याला सार्वत्रिक Shimga and Elections शिमगा म्हटले तर चुकीचे काय, असे वाटून गेले. त्यावरून अनेक विनोद पसरले. अंबानीच्या मुलाच्या लग्नाला आल्यामुळे फेसबुकच्या मालकाचे धंद्याकडे दुर्लक्ष झाले, या सार्वत्रिक झालेल्या संदेशाला आधुनिक शिमगा म्हणता येईल काय! पुढे ही गंमत बराच काळ सुरू होती. मस्क महाशय इथे आले तरी त्यांची व्यवसायावर खरी निष्ठा आहे. कारण त्यांचे व्यवसायवृद्धीसंदर्भातले मेसेज येत राहिलेे... या आशयाचा मेसेजदेखील प्रचंड व्हायरल झाला. आता हादेखील एका वेगळ्या अर्थी आर्थिक शिमगा होता काय? ही गमतीची उदाहरणे असली तरी यातून लक्षात येते की, अलिकडच्या काळात कोणताही सण किंवा कोणताही समारंभ केवळ सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा राहत नाही. कारण मुळातच आपली संस्कृती जास्तीत जास्त अर्थकारणाकडे, राजकारणाकडे वळू लागली आहे. पूर्वी समाजकारण हे अर्थकारण आणि राजकारणातून घडत असे. आता ते तसे घडत नाही.
 
 
आपल्या संस्कृतीने नेहमीच मनात असेल ते बोलून टाकण्याचा संदेश दिला आहे. तद्नंतर बोलणार्‍यानेही ते विसरून जावे आणि ऐकणार्‍यानेही फारसे मनावर घेऊ नये, असे जुने जाणकार सांगतात. त्या अर्थाने ‘शिमग्याच्या बोंबा’ हा शब्द आपल्या भाषेत रूढ झाला असेल. आता शिमग्याच्या बोंबा आणि दारू प्यालेला माणूस यांच्यातील साम्यही बघा. शिमग्याला दारू प्यायली नाही तर देव रागावेल की काय, अशी परिस्थिती असते...! मात्र या दोघांनी काहीही बोलले तरीही कोणीही गांभीर्याने घेत नाही. आज आपण देशाचे समाजकारण आणि राजकारण या पातळीवर आणून ठेवले आहे का, याचाही या निमित्ताने विचार व्हायला हवा. आज एखादी गोष्ट प्रत्यक्ष होईपर्यंत कोणीच कोणावर विश्वास ठेवत नाही. गोष्ट झाली तरी ती मनासारखी झाली नसल्याचा कांगावा करून श्रेय नाकारतात. या सार्वजनिक शिमग्याचाही विचार करावा लागेल.
 
 
Shimga and Elections शिमग्याच्या निमित्ताने मन मोकळे करण्याची संधी मिळते. तेव्हाच्या समाजाने लोकांना ती जाणीवपूर्वक दिली होती का, असाही विचार मनात येऊन जातो. असे असेल तर आजच्या प्रचंड मोठ्या संगणकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये याची नेमकी गरज किती, हेदेखील जाणून घ्यायला हवे. कोरोनानंतरचा काळ आता मागे पडला आहे. पण दरम्यानच्या धकाधकीच्या काळाने आपल्याला असे ‘व्हेंटिलेशन’च दिलेले नाही. सध्या आपण सगळेच कार्यक्रम ऑनलाईन करतो. प्रत्यक्ष भेटणे हा प्रकार कमी झाला आहे. दुसरीकडे गेल्या तीन-चार वर्षांमध्ये वैद्यकीय तज्ज्ञांकडे जाणार्‍यांचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. मुख्य म्हणजे ते वय, स्थळ, लिंग, उत्पन्न निरपेक्ष आहे आणि मानसिक अशांतता हाच त्याचा मूलभूत पाया आहे. पूर्वी आपण दिवसभरात नातलग, घरातील सदस्य, कार्यालयीन सहयोगी, व्यावसायिक, सामाजिक आदी भावबंधांशी संबंधित होतो. अलिकडच्या ऑनलाईनच्या जमान्यात मात्र हे ‘आऊटलेट्स’ राहिलेले नाहीत. साहजिकच मानसिक दबाबाने, हृदयविकाराच्या धक्क्याने होणार्‍या मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. भावना व्यक्त करण्याची हक्काची फार कमी स्थाने आता उरली आहेत. म्हणूनच होळीसारख्या व्हेंटिलेशनचे काम करणार्‍या उत्सवांचे महत्त्व नव्याने जाणून घेण्याची गरज आहे. या अर्थाने सामाजिक होळी साजरी केली तर बरेच प्रश्न सुटतील याची खात्री वाटते.