अंधभक्त आणि अंधविरोधक

    दिनांक :25-Mar-2024
Total Views |
कानोसा
- अमोल पुसदकर
सध्या Andhbhakt अंधभक्त हा शब्द समाज माध्यमांवर खूप प्रचलित आहे. यामध्ये मोदी विरोधक जे आहेत ते मोदी समर्थकांना अंधभक्त म्हणतात. अंधभक्त का बरं तर त्यांचे म्हणणे असे आहे की, मोदी समर्थकांना मोदींच्या सर्वच गोष्टी चांगल्या वाटतात. एकदा मोदींची स्तुती करणारा किंवा सरकारच्या कामांची योग्य दखल घेणारा एक लेख मी लिहिला होता. त्यावर मला एकाने फोन करून विचारले की, ‘सर, आपण अंधभक्त आहात का?’ मी म्हणाले, ‘मी मोदींचा किंवा कोणाचाही अंधभक्त नाही.’ मग मी त्यांना प्रतिप्रश्न केला की, ‘साहेब, तुम्ही मोदींचे अंधविरोधक आहात का?’ यावर त्यांना काय बोलावे हे सुचले नाही. मी त्यांना म्हटले की, ‘मोदी सरकारने देशाच्या विकासासाठी अनेक कार्य केलेली आहेत. सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानच्या हृदयात धडकी भरवलेली आहे. बालाकोटचा एअर स्ट्राईक केलेला आहे. कोरोनामध्ये 130 कोटी लोकांचे लसीकरण केलेले आहे. त्यांची हिंमत कायम ठेवलेली आहे. कोरोनाच्या संकटाशी सामना केलेला आहे. त्यानंतर ‘मेक इन इंडिया’सारख्या प्रोजेक्टमुळे देशामध्ये रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विदेशातील तंत्रज्ञान भारतामध्ये आणून त्याचे आत्मसातीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चांद्रयान-3 चे यशस्वी आयोजन केलेले आहे. 370 कलम रद्द करून काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित केलेली आहे. दहशतवाद्यांचे तळ समाप्त केलेले आहे. सीएएचा कायदा करून दुःखी शरणार्थींचे अश्रू पुसलेले आहेत. तिहेरी तलाक रद्द करून मुस्लिम महिलांना एक सन्मान प्रदान केलेला आहे. महिलांकरिता 33 टक्के आरक्षण लागू केलेले आहे. अशी अनेक कामे मोदी सरकारने केलेली आहे. परंतु एवढे करूनही तुम्हाला निरपेक्ष बुद्धीने मोदी सरकारच्या कामाचे मूल्यांकन का करता येत नाही? तुम्ही अंधविरोधक तर नाहीत ना हे कृपया एकदा तपासून बघा.’
 
 
modi Bhakt
 
Andhbhakt  : आपल्या देशामध्ये जे कम्युनिस्ट विचारसरणीचे लोक आहेत त्यांची काम करण्याची ही पद्धत आहे. जर तुम्ही कोणाला कन्व्हिन्स करू शकत नसाल तर त्याला कन्फ्युज करा. म्हणजे जर तुम्ही कोणाचे समाधान करू शकत नसाल तर त्याला भ्रमित करा, असा त्याचा अर्थ आहे. मोदींच्या कामाची तारीफ करणारा फार मोठा वर्ग या देशामध्ये व विदेशात आहे. मोदींची स्तुती करणार्‍यांवर काही लोक समाज माध्यमांवर तुटून पडतात. यांची एक टोळी असते. जर कोणी मोदी सरकारने केलेल्या एखाद्या घोषणेचे कौतुक केले तर ताबडतोब त्याच्या विरोधात एकामागून एक टीकेचा पाऊस पडायला लागतो व त्याला अंधभक्त असे संबोधले जाते. त्यामुळे बिचारा सामान्य माणूस घाबराघुबरा होऊन पुन्हा त्याच्यावर काही पोस्ट टाकण्याच्या आधी विचारच करतो.
 
 
 
काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशमध्ये एका ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते; त्यामध्ये भाषण झाल्यानंतर एका ख्रिश्चन प्राध्यापकाने प्रश्न विचारला की, ‘सर, राम मंदिर झाल्यामुळे देशाचा काय फायदा झालेला आहे?’ मी त्यांना म्हटले की, ‘सर, या प्रश्नाला तुम्ही असे विचारायला हवे की, राम मंदिर झाल्यामुळे देशाचा किती फायदा झालेला आहे. फायदा झाला हे निश्चित आहे फक्त किती झाला हे तुम्ही मला विचारायला पाहिजे.’ मी त्यांना म्हणालो, 1947 पासून काँग्रेसने हा प्रश्न सडत ठेवलेला होता. हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये वैर कायम राहून आपले राजकारण व्यवस्थित चालले पाहिजे, याचा प्रयत्न काँग्रेसने केला. त्यामुळे मी त्यांना म्हणालो की, कुठल्याही देशाला जर प्रगती करायची असेल तर त्या देशातील लोकांमध्ये एकोपा राहण्याची आवश्यकता असते. राम मंदिराचा प्रश्न समाप्त झालेला असल्यामुळे आता हिंदू-मुस्लिम विरोधासाठी जी काही अनेक कारणे असतील त्यापैकी एक मोठे कारण समाप्त झालेले आहे. त्यामुळे देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी येईल व देश प्रगतिपथावर जाईल हा देशाचा खूप मोठा फायदा झालेला आहे. आता हे करण्यामध्ये मोदी सरकारची एक मोठी भूमिका राहिलेली आहे. परंतु, या भूमिकेची स्तुती करणार्‍या लोकांना जर तुम्ही अंधभक्त म्हणाल तर या सर्व सुधारणांचे विरोध करणार्‍यांना अंधविरोधक का म्हणू नये.
 
 
Andhbhakt  : नुकतीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केलेली आहे. मी अनेक दिवसांपासून बघत आहे की, कुठल्याही नेत्याला ज्या वेळेला अटक केली जाते त्यावेळेला त्याचे समर्थक म्हणतात की, केंद्र सरकार ईडीचा दुरुपयोग करीत आहे. तुम्ही सर्व विरोधी लोकांनाच ईडीचे लक्ष्य करीत आहात. भाजपाच्या लोकांना तुम्ही का पकडत नाही, असाही प्रश्न ते विचारतात. ज्या ज्या लोकांना ईडीने अटक केलेली आहे त्या सर्वच लोकांना न्यायालयातून जामीन मिळवण्याचा मार्ग मोकळा आहे. असे काय आहे की, ज्यामुळे न्यायालय या लोकांना जामीन देत नाही व त्यांना कोठडीमध्ये टाकत आहे. म्हणजे ईडीजवळ असे काही भक्कम पुरावे असतील की, ज्यामुळेच न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावलेली आहे. तरीही जे लोक अशा भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या नेत्यांच्या समर्थनार्थ रास्ता रोको करतात, आंदोलन करतात, जाळपोळ करतात या सर्वांना अंधभक्त का म्हणू नये? हे तर इतके पराकोटीचे व्यक्तिपूजक आहेत की यांना देशभक्ती, देशहित याच्याही पेक्षा यांचा नेता मोठा वाटत आहे. खरे अंधभक्त तर हेच आहेत.
 
 
तुम्ही लोकांना दारूचे दुकान उघडण्याचे परवाने वाटाल, प्रत्येक बीअरच्या बाटली मागे 50 रुपये खाल, एखाद्याने निविदेपोटी भरलेले 30 कोटी रुपये त्याला एखादे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नाही म्हणून त्याला वापस करून टाकाल. दारू विक्रेत्यांना लागणारा कर मोठ्या प्रमाणावर कमी करून सरकारच्या महसुलाचे दीडशे कोटींचे नुकसान कराल आणि एवढे करूनही जर तुम्हाला वारंवार चौकशीसाठी बोलावणे येत असेल तर त्याला तुम्ही उपस्थित राहणार नाही. यामुळे जर तुम्हाला अटक करण्यात आली तर तुमचे समर्थक आंदोलन करतील, रास्ता रोको करतील, जाळपोळ करतील. याला Andhbhakt  अंधभक्ती नाही तर काय म्हणायचे? एवढे करूनही समाज माध्यमांवर तुम्ही फोटो टाकता की आम्ही भगतसिंगांचे वंशज आहोत. जेलमध्ये जाण्यासाठी आम्ही घाबरणार नाही. स्वतःच्या भ्रष्टाचारी नेत्यांची भगतसिंगांसारख्या राष्ट्रभक्तांशी तुलना करायला तुम्हाला थोडीशीही लाज वाटत नाही. अशा अंधभक्तांचा बुरखा समाज माध्यमांवर व सर्वत्र फाडण्याची आवश्यकता आहे. जे सत्य आहे त्याला आपण बिनधोकपणे सत्य म्हणून स्वीकारले पाहिजे, लोकांना सांगितले पाहिजे, त्याच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे. एखाद्या नेत्याची अंधभक्ती करण्याची आवश्यकता नाही, परंतु भारत भक्ती करण्याची आवश्यकता आहे. अंधभक्त कुणीही बनू नये; परंतु भारतभक्त मात्र जरूर बनावे, असे वाटते. 
 
- 9552535813
(लेखक प्रसिद्ध वक्ते, सामाजिक व राजकीय विचारक आहेत.)