‘जशास तसे’ उत्तर

    दिनांक :25-Mar-2024
Total Views |
वेध
- नीलेश जोशी
politics of appeasement : ‘ॐ सर्वे भवन्तु सुखिनः।’पासून ते पसायदानातून मानवासहित प्राणिमात्रांसाठीही विश्वात्मक देवाकडे प्रार्थना करणारे संत ज्ञानेश्वर अशी समृद्ध विचार-आचारांची मोठी परंपरा आम्हाला लाभली आहे. एवढेच नव्हे तर हिंदू धर्म संस्कृतीत विश्व मांगल्याची कामना करणारे अनेक श्लोक, सुभाषित आहेत. त्या माध्यमातून अगदी पुराण काळापासून विश्व कल्याणाचे आचरण असावे, असा संस्कार मनामनावर बिंबविला जातो. पण असे असूनही हिंदू धर्म, संस्कृतीचे अनुसरण करणार्‍यांवर वारंवार हल्ले होतात. कधी थेट तर कधी कुरापती काढून हल्ले केेले जातात. झुंडशाहीने हल्ला करणे हे तर देशातील काही भागात नित्याचेच झाले आहे. या घटनांनंतर सुप्रसिद्ध लेखक वि. स. खांडेकर यांच्या ‘ययाती’ कादंबरीतील ‘जग माणसाच्या मनातील दयेवर चालत नाही. तर तेे मनगटातील बळावर चालतं...’ या वाक्याची आठवण होते. विचार-आचार आणि तत्त्वज्ञान कितीही चांगले असले तरी त्यामागे शक्तिसंपन्न संघटित समाजाचे पाठबळ आवश्यक ठरते. मधल्या कालखंडातील आक्रमणाचा काळ सोडला तर विश्व शांती, कल्याणाचा विचार सांगणारा हिंदू विजिगीषू होता. स्वातंत्र्यानंतर तुष्टीकरण नीतीमुळे बचावात्मक असलेला समाज आता सजग आणि योग्य ठिकाणी प्रतिकारात्मक भूमिकेत उभा राहत आहे.
 
 
hanuman-chalisa
 
politics of appeasement : बंगळुरू शहरातील सिद्धन्ना गल्ली परिसरातील जुम्मा मस्जिद मार्गावर मुकेश नावाच्या एका व्यक्तीचे दुकान आहे. रविवार, 17 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास 6-7 समाजकंटक मुकेश यांच्या दुकानात शिरले. त्यांनी मुकेश यांच्याशी बाचाबाची, शिवीगाळ केली. सुरुवातीला शाब्दिक वाद घातला तर त्यानंतर मुकेश यांच्यावर हल्ला चढविला. दुकानातून बाहेर ओढून त्यांना मारहाण करण्यात आली. हा सर्व प्रकार का घडला तर मुकेश हे दुकानात सायंकाळच्या वेळी पूजाअर्चा करीत होते. यावेळी ते भजन आणि हनुमान चालीसा लावायचे. समाजकंटकांनी, आमच्या अजानच्या वेळी तुम्ही भजने का वाजविता, असा आक्षेप घेऊन त्यांच्यावर हा हल्ला केला होता. या घटनाक्रमाचे चित्रीकरण सीसीटीव्हीमध्ये झाले आणि त्याची चित्रफीत समाजमाध्यमातून प्रसारित झाली. त्यानंतर या घटनेवर उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटली. मंगळवार, 19 मार्च रोजी मुकेशच्या दुकानासमोरील मार्गावर हजारो जण हनुमान चालीसा पठन, रामनामाचा जप करण्यासाठी एकत्र आले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन जमावबंदी लागू केली. या प्रतिक्रियेनंतर मुकेश यांना मारहाण करणार्‍या दोषींना अटक करण्यात आली तर आंदोलन करणार्‍यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले. नुकतेच कर्नाटक राज्यात सत्तांतर झाले आणि काँग्रेसचे सरकार तेथे आले. त्यानंतर या आणि अशा प्रकारांच्या घटनांमध्ये त्या राज्यात वाढ झाली आहे. हा निव्वळ योगायोग असावा का? कर्नाटकातच मध्यंतरी झालेल्या ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोेषणांचे प्रकरण ताजेच आहे. politics of appeasement तुष्टीकरण करणारे आणि कथित ‘मोहब्बतची दुकान’ चालविणारे सत्तेत आल्यानंतर घडणार्‍या या घटना देशभक्त नागरिकांची चिंता वाढविणार्‍या आहेत. समाज मात्र ‘जशास तसे’ उत्तर देण्याच्या मानसिकतेत असल्याचे दिसून येते.
 
 
politics of appeasement : आतापर्यंत धर्मांधांचे तुष्टीकरण केल्यामुळे देशात सामाजिक, धार्मिक मोठे नुकसान झाले आहे. अनेक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्यात. मुली आणि महिलांचे जीवन उद्ध्वस्त करणार्‍या ‘लव्ह जिहाद’चे षडयंत्र रचले गेले. गोवंश हत्या, अमली पदार्थांची तस्करीसह आतंकवाद्यांना सहाय्य करणारा स्लिपर सेल देशात कार्यरत असल्याचे वेळोेवेळी सिद्ध झाले. पण ‘मोहब्बत की दुकान’ चालविणार्‍यांनी जो चष्मा घातला आहे त्यातून त्यांच्या दृष्टीस हे काहीच पडत नाही. समाजाचे, राष्ट्राचे हित गठ्ठा मतांच्या लालसेमुळे त्यांना कवडीमोल वाटते. महाराष्ट्रातही त्यांची हीच भूमिका असल्याचा संदेश त्यांनी कृतीतून दिला. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसोबत अकोला पश्चिम विधानसभेची पोटनिवडणूक आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेसने 16 गुन्हे दाखल असणारा उमेदवार घोषित केला. दंगल घडविणे, शस्त्रांचा वापर करणे, शासकीय कर्मचार्‍यावर हल्ला करणे असे गुन्हे दाखल असणारा ‘दंगेखोर’ व्यक्ती विधानसभेत पोहोचावा यासाठी काँग्रेस शक्ती पणाला लावणार आहे. काँग्रेसची ही कृती म्हणजे तुष्टीकरणासाठी ‘वाट्टेल ते’ अशीच आहे. पण देशातील हवा आता बदलली असून झुंडशाहीला ‘जशास तसे ’ तर तुष्टीकरणाला ठोस उत्तर देण्याची भूमिका जनमानसात दिसून येते.
 
- 9422862484