राजेश माहेश्वरी
आर्णी,
Holi festival हिंदू पंचागानुसार वर्षाअखेरचा सण म्हणून होळीकडे पाहिल्या जाते. सर्वत्र मोठ्या उत्साहात होळी सांजरी होत असली तरी बंजारा समाजात होळी सणाला विशेष महत्त्व आहे. बंजारा समाजात पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा केला जातो. होळी सण डोळ्यासमोर ठेवून बंजारा तांड्यांमध्ये आठ दिवसांपासूनच होळीची तयारी केली जाते. दररोज संध्याकाळी तांड्यावरील नागरिक एकत्र येऊन डफड्याच्या तालावर लेंगी गीतावर नृत्य करतात.
सूर्योदयापूर्वीच होळी पेटवून बंजारा समाज लोककलेचा जागर करतात. आर्णी तालुक्यात बंजारा समाजाची संख्या लक्षणीय आहे. तांड्यातील प्रमुख नाईक, कारभारी यांच्या दरबारात बंजारा पारंपरिक लोकनृत्य कलाविष्काराचे सादरीकरण होते.तांडा संस्कृती म्हणजे बंजारा समाजाची एक वेगळी ओळख आहे. समाजप्रमुख नाईक यांच्या दरबारात होळी व धुळीवंदन साजरा करण्यासंबंधी बैठक होते. दोन युवकांची दांड्या म्हणून नेमणूक केली जाते. Holi festival ते दोन्ही युवक इतर युवकांना सोबत घेऊन होळीसाठी लागणारे साहित्य तांड्यात फिरून जमा करतात. प्रत्येक कुटुंब लाकडे व शेणाची माळ दांड्याकडे देतात. कामानिमित्त बाहेरगावी असलेले बंजारा होळी सणानिमित्त आपल्या गावी येतात. सर्वत्र तांड्यामध्ये सूर्योदयापूर्वीच होळी पेटवली जाते. होळी पेटवताना बंजारा पारंपरिक पोषाख प्रदान करून बंजारा बोली भाषेतील लेंगी गीतावर लोककला सादर करतात. होळी सणानिमित्त ‘धुंड’ कार्यक‘माचे आयोजन करण्यात येते. या काळात ज्यांच्या घरी मुले जन्माला आली त्यांच्या घरासमोर सर्वजण वाजत-गाजत येतात. बंजारा बोली भाषेतील गाणी गायले जातात, मुलं जन्माच्या आनंदात त्यांच्याकडून विशेष ‘फगवा’ मागितल्या जातो. एखाद्याच्या घरी ऐन होळीला मृत्यू झाला असेल त्या कुटुंबातील सदस्यांना सोबत घेऊन तांड्यातील प्रमुख असलेल्या नायकाच्या घरी आणत शिमगा खेळला जातो. होळी धुळीवंदनाच्या नंतर गैर होतो. नंतर होळी सणाचा समारोप होतो.