गर्भगृह आणि गाभार्‍याचे आध्यात्मिक विज्ञान

    दिनांक :27-Mar-2024
Total Views |
धर्म-संस्कृती
- प्रा. दिलीप जोशी
आपल्या Bhartiya Mandir भारतीय वास्तुशास्त्रात मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण आणि आध्यात्मिक रचना आहे. पंचमहाभूते, सूर्यकिरणे आणि वातावरण यांचे वैज्ञानिक, आध्यात्मिक आणि भौतिक मनोविज्ञान याचा अभ्यासपूर्ण आविष्कार म्हणजे मंदिर आहे. किरणोत्सव हा त्यातीलच प्रकार आहे. मंदिराचा मंडपम् किंवा सभामंडप, प्रवेशद्वार, प्रदक्षिणा मार्ग, कलशदर्शन, मुखदर्शनस्थान, ओवरी, दीपमाळा, गरुडस्तंभ, यज्ञमंडप, वेदशाळा, प्रसादालय, तलाव, कूपतीर्थ असे अनेक वास्तुभाग आपल्याला दिसतात. त्यावरूनच त्या मंदिराची आभामंडल दिव्यता अनुभवास येते.
 
Mandir
 
Bhartiya Mandir : या सर्व मंदिर रचनेत गर्भगृह किंवा गाभारा हा मंदिर रचनेचा प्राण आहे. जिथे भगवंताची मूर्ती प्रतिष्ठित असते त्या स्थानाला गर्भगृह किंवा गाभारा म्हणतात. गर्भ आणि गाभा यावरून आपल्याला शब्दनिर्मिती लक्षात येते. गाभा म्हणजे गर, सार, मगज म्हणजे महत्त्वाचा अर्क भाग. गर्भ हा प्रजनन पैलू असला, तरी गर्भ म्हणजे आत्मा, स्वरूप जाणीव, अभिषेक ठेव, मधुच्छिष्ट होतो. लौकिकार्थाने गाभारा आणि गर्भगृह यात लौकिक अर्थांनी साम्य किंवा दोन्ही शब्द एकाच अर्थाचे वाटतात. पण दोन्हीचे गर्भितार्थ वेगळे आहेत, असे माझे मत आहे. गाभारा आणि गर्भगृह या शब्दातूनच त्यांचे अर्थ स्पष्ट होतात. भगवान शिवाची पिंड जिथे आहे त्याला गाभारा म्हणावं आणि भगवान विष्णूची मूर्ती जिथे त्याला गर्भगृह. शक्ती, गणपती किंवा दत्त भगवानदेखील यातीलच धाटणीत येतील. गर्भगृह आणि गाभारा याचा विचार केल्यास साधारणतः आपल्या शिव मंदिरांचा म्हणजे महादेवाच्या मंदिराचा आणि श्री बालाजी, श्री गोविंदराज अशा श्री विष्णू मंदिरांचा विचार करू. देशभरातील बहुतेक शिव मंदिरे जमिनीपासून खोल आहेत. म्हणजे पायर्‍या उतरून शिवपिंडीजवळ जावे लागते. शिव मंदिरातील या खोल भागाला गाभारा म्हणतात. गाभार्‍यात अंधार असतो. सध्या या सर्व मंदिरांत आधुनिक विद्युत व्यवस्था आहे. त्यामुळे प्राचीन अध्यात्म शास्त्र एकदम लक्षात येणार नाही. पण समजा या मंदिरातील विद्युत गेली तर या सर्व मंदिरात पिंड किंवा मूर्तिस्थानी अंधार असतो.
 
 
भगवंताची मूर्ती किंवा पिंड पाहण्यासाठी अवधान किंवा निरखून पाहणे, चाचपडणे जरुरीचे ठरते. म्हणजे एकदम उजेडातून अंधार्‍या गाभार्‍यात गेल्यावर सर्वत्र काळाकुट्ट अंधार भासतोच; त्यामुळे आवर्जून डोळे बंद करून एक-दोन मिनिट तरी राहावे लागते. त्यानंतर थोड्यावेळाने हळूहळू प्रकाशमान होऊ लागते. शिवभक्तांना ध्यानाचे अधिक महत्त्व असते. खोल गाभार्‍यात डोळे लावून घेणे अर्थात ध्यान आवर्जून घडते. शैवभक्तांची ही सहज उपासना होय. शिव मंदिरे खोल म्हणजे जमिनीखाली आहेत. त्यामुळे आपल्याला पायर्‍या उतरून खाली जावे लागते. पायरी उतरणे आणि पायरी चढणे हे तर जीवनाचे सूत्र आहे. जीवनाचा हाच गाभा आहे म्हणून तर अशा रचनेला गाभारा म्हणतात.
 
 
Bhartiya Mandir : आता जरा विष्णू मंदिरांचा विचार करा. विष्णू मंदिरे जमिनीच्या वर किंवा समतल आहेत. त्यांना खिडकी नावाचा प्रकार नसतो. पण पूर्वेला एखादा झरोका असतो. सूर्योदयप्रसंगी सूर्याची किरणे मूर्तीच्या मुखावर किंवा चरणावर पडतात. अशा रचनेला गर्भगृह म्हणतात. मर्यादित प्रकाशव्यवस्था ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ सूत्र सांगते. म्हणून त्याला गर्भगृह म्हणतात. आत गेल्यावर श्यामलांग, कोमलांग भगवान महाविष्णूंचे सुंदर ते ध्यान आपल्याला दिसते. प्रकाश रचना कमी असल्याने सुरुवातीला ते परब्रह्म भासमान होते आणि त्यानंतर त्याचे अवतरण होते आणि ते सावळे परब्रह्म डोळ्यात बसते.
 
 
सावळे परब्रह्म भासले ।
पाहे तव परब्रह्म अवतरले ।
रुप येवोनिया डोळा बैसले ॥
शिव आणि विष्णू मंदिराचा बारकाईने विचार केल्यास दोन्ही ठिकाणी ‘तमसो मा ज्योतिर्गमय’चे तत्त्व वापरले आहे. अंधारातून प्रकाशाकडे जाणे, असत्याकडून सत्याकडे, मर्त्याकडून अमर्त्याकडे म्हणजे अमृत तत्त्वाकडे जाणे हे आपले भारतीय यथार्थ दर्शन आहे. समजा औंढा नागनाथ मंदिरात आपण गेलो तर गाभारा खोल असल्यामुळे अवधानपूर्वक गाभार्‍यात जावे लागते. अंधुक प्रकाश असल्यामुळे लक्ष फक्त पिंडीवर ठेवावे लागते. पिंड नीट दिसण्यासाठी गाभार्‍यात गेल्यावर खाली बसावे लागते. शरीरशास्त्राचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की, एकदम लख्ख उजेडातून अंधारात गेलो तर आपल्याला काहीच दिसत नाही. त्यासाठी काही काळ डोळे लावून बसलो तर अंधाराचा प्रभाव कमी होतो आणि हळूहळू प्रकाशमान होऊ लागते. यालाच ध्यान किंवा ध्यानाची प्राथमिक अवस्था म्हणतात. थोडक्यात गाभार्‍याची रचना अशी आहे की, गाभार्‍यात शिरल्यावर ध्यान लावणे अती आवश्यकच. डोळे लावून त्या परमेश्वराची आर्त प्रार्थना; ती पण वैज्ञानिक कसोटीवर. थोडा वेळ का होईना संसार विसरावाच लागतो. म्हणून देशभरात बहुतेक शंकराची मंदिरे खोल गाभार्‍यात आणि तेही अंधारगृहात.
 
 
Bhartiya Mandir : श्री बालाजी मंदिराची रचना पाहिली तर तिथेही प्रकाश रचना अत्यल्पच. दक्षिण भारतात तर गर्भगृहात विद्युत दिवे अजिबात नाही. पद्मनाभ मंदिरात याचा अनुभव सर्व घेतात. डोळे लावून घेतले तरच भगवंताच्या मूर्तीचे दर्शन होते अन्यथा अडचणी. तिरुपती बालाजी मंदिरात हीच अनुभूती. हेच तत्त्व सर्व शिव आणि विष्णू मंदिरासाठी लागू आहे. आधुनिक विद्युत व्यवस्था नाही हे गृहीत धरून हा विचार मांडला आहे. हल्ली नवनिर्मित शिव किंवा विष्णू मंदिरात अशी रचना नाही. कारण त्या प्रत्येक मंदिरात कालमानाप्रमाणे मर्यादा ओळखून वास्तुरचना केली आहे. त्यात गैर काही नाही. पण साधारण गाभारा आणि गर्भगृह यात प्रकाशाचे मानसशास्त्र वापरले आहे. जेणेकरून दर्शन घेताना शांत, अवधानपूर्वक आणि ध्यानाच्या प्राथमिक अवस्थेसह दर्शन व्हावे. त्यातही शिव मंदिरे ही नदीतीरावर, स्मशानात, जंगलात असत म्हणून ती खोलवर असायची आणि विष्णू मंदिरे ही प्रांगण, सरोवरस्थळी आणि वस्तीच्या परिघात असत. म्हणून ती जमिनीवर किंवा समांतर आहेत. पण दोन्ही ठिकाणी मुख्य मूर्तीजवळ अंधाराकडून प्रकाशाकडे कसे जावे याची अनुभुती सहज मिळते. संत तुकाराम महाराजांनी तर श्रीमुख दर्शनासाठी स्पष्टच सांगितले...
 
‘तुका म्हणे माझे हेची सर्व सुखं
पाहिन श्रीमुख आवडीने ।’
थोडक्यात गर्भगृह आणि गाभारा यात ज्ञान-विज्ञान असून स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण देहाचे सक्षमीकरण आहे. विश्वाचे आर्त आणि विकासात्मक उकल आहे.
‘मंदिरात अंतरात, तोच नांदताहे ।
नाना देही नाना रूपे तुझा देव आहे ॥’ 
 
- 9822262735