भाजपा नेते दिलीप घोष यांच्याकडून दिलगिरी

    दिनांक :27-Mar-2024
Total Views |
- ममता बॅनर्जीबद्दल वादग्रस्त वक्तव्य
 
कोलकाता, 
भाजपाचे ज्येष्ठ नेते Dilip Ghosh दिलीप घोष यांनी बुधवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली. त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता. एका व्हिडीओ क्लिपमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या कौटुंबिक पृष्ठभूमीची खिल्ली उडवणार्‍या घोष यांच्याकडून भाजपाने स्पष्टीकरण मागितल्यानंतर काही तासांनी माफी मागितली. मी केलेल्या टिप्पणीबद्दल आणि त्यातील शब्दांवर माझा पक्ष आणि इतर लोकांनी आक्षेप घेतला आहे. तसे असेल तर मला त्याबद्दल खेद वाटतो, असे दिलीप घोष यांनी सांगितले. तृणमूल काँग्रेसने त्यांच्या टिप्पण्यांबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आणि त्यांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला.
 
 
Dilip Ghosh-Mamata Banerjee
 
माजी प्रदेशाध्यक्ष असलेले Dilip Ghosh दिलीप घोष म्हणाले की, त्यांचे मुख्यमंत्र्यांशी कोणतेही वैयक्तिक वैर नाही. माझ्या टिप्पण्यांवरून वाद निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. कारण, मी चुकीचे काम करणार्‍यांना तोंडावर असे बोलतो. घोष यांनी दावा केला की त्यांनी केवळ बॅनर्जी यांच्या राजकीय वक्तव्याचा निषेध केला आहे. घोष म्हणाले की, माझ्या टिप्पण्यांवर महिलांच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित झाला असला तरी, तृणमूलच्या एका नेत्याने विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी आणि त्यांचे वडील शिशिर अधिकारी यांच्या विरोधात अपमानास्पद शब्द वापरले होते. शुभेंदू पुरुष आहेत म्हणून त्यांना सन्मानाची अपेक्षा नाही का, असा सवाल त्यांनी दुर्गापूर येथे पत्रकारांशी बोलताना केला.