नव व मध्यम वयाचा मतदार निर्णायक

    दिनांक :27-Mar-2024
Total Views |
वेध
- गिरीश शेरेकर
LokSabha Elections : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून महाराष्ट्रात 48 जागांसाठी पाच टप्प्यांत होणार्‍या मतदानासाठी आयोगाची तयारी झाली आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा मतदानाच्या टक्केवारीत वाढ व्हावी यासाठी आयोग वेगवेगळे उपक्रम राबवीत आहे. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ही जनजागृती करण्यात येत आहे. नवमतदार व मध्यम वयोगटातील मतदारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. देशाची धुरा पाच वर्षांसाठी ज्या सरकारच्या हाती असते, ते सरकार निवडण्यासाठी ही सार्वत्रिक निवडणूक होत आहे. देशात राहणार्‍या प्रत्येक नागरिकाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सरकारशी संबंध येतोच. सरकारच्या प्रत्येक निर्णयाचा सामान्य व्यक्तीवर प्रभाव पडत असतो. अशा या अत्यंत महत्त्वाच्या निवडणुकीच्या मतदानात सर्वांचा सहभाग असणे तेवढेच आवश्यक आहे. गेल्या काही निवडणुकांपासून मतदानाचा टक्का वाढतो आहे. त्यात आणखी वाढ अपेक्षित आहे. नवमतदार व मध्यम वयोगटातील मतदारांमध्ये उत्साह असल्याने यंदा मतदानाचा टक्का आणखी वाढेल, अशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे हा मतदार राष्ट्रहिताच्या दृष्टीने निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. या मतदाराचा नेमका फायदा कोणाला झाला हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
 
 
yuva Voter
 
LokSabha Elections : निवडणूक आयोगाने राज्यातील मतदारांची एकूण संख्या व वयोगटानुसार नुकतीच आकडेवारी जाहीर केली आहे. सध्या एकूण मतदार 9 कोटी 12 लाख 44 हजार 679 आहे. त्यात 30 ते 49 वयोगटातील मतदार सर्वाधिक म्हणजे 40 टक्के आहे. 18 ते 29 वयोगटातील मतदारांची संख्या ही 1.27 कोटी आहे. त्यात नवमतदार जास्त आहेत. 40 ते 80 वयोगटातील मतदारांची संख्या प्रारूप मतदारयादीच्या तुलनेत तीन टक्क्यांनी कमी आहे. 20 लाख 21 हजार 350 मतदारांची नावे वगळण्यात आली आहे. मतदारयादीत हजार पुरुषांमागे महिलांची संख्या 917 वरून 922 पर्यंत वाढली आहे. 18 ते 19 वयोगटातील तब्बल 6 लाख 70 हजार 302 मतदार तर 20 ते 29 वयोगटातील 8 लाख 33 हजार 496 मतदार नव्याने जोडले गेले आहेत. 30 ते 39 वयोगटात एकूण मतदार 2 कोटी 7 लाख 90 हजार 742 (22.59 टक्के) तर 40 ते 49 वयोगटातील 2 कोटी 2 लाख 33 हजार 507 (21.98 टक्के) मतदार आहे. 50 ते 59 वयोगटातले एकूण मतदार 1 कोटी 53 लाख 51 हजार 217 (16.68 टक्के), 60 ते 69 वयोगटातील एकूण मतदार 98 लाख 12 हजार 225 असून त्यांची टक्केवारी 10.66 आहे. 70 ते 79 वयोगटातील एकूण मतदार 53 लाख 38 हजार 281 व टक्केवारी 5.8 आहे. 80 ते 89 वयोगटातले एकूण मतदार 20 लाख 95 हजार 822 आहे. हा टक्का 2.28 आहे. 85 पेक्षा अधिक वयोगटातील मतदार 13 लाख 12 हजार 623 आहेत तर 100 वर्षांवरील मतदारांची एकूण संख्या 52 हजार 769 आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर 17 ते 22 मार्चदरम्यान तब्बल 1 लाख 84 हजार 841 नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे.
 
 
LokSabha Elections : गेल्या दहा वर्षांत तरुण मतदारांमध्ये उत्साह वाढल्याचे पाहायला मिळाले आहे. मतदार म्हणूनही त्यांची संख्या वाढते आहे आणि प्रत्यक्ष मतदानातही त्यांचा सहभाग लक्ष वेधणारा आहे. बहुमतातले स्थिर व निर्णयक्षमता असलेले सरकार सत्तेत असणे हे त्या पाठीमागचे एक प्रमुख कारण आहे. याउलट राजकीय अस्थिरता असली की निर्णय लवकर होत नाही आणि प्रगतीचा वेग मंदावतो. त्याचा थेट परिणाम पुढच्या मतदानावर होतो. त्याची टक्केवारी कमी - अधिक असते आणि परिस्थितीनुसार त्याचे परिणाम असतात. भूतकाळातल्या अनेक निवडणुकांमध्ये ते दिसले. त्यातूनच पुढे सौदेबाजीने एकत्र आलेल्यांचे सरकार देशाने पाहिले आणि अनुभवले. हा इतिहास मतदारांच्या डोळ्यांसमोर असल्याने गेल्या दोन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमताचे सरकार विराजमान झाले. त्याचे चांगले परिणाम समोर आले असून स्थिर सरकारच देशाच्या हिताचे असते याची जाणीव मतदारांना झाली आहे. यंदाही सर्वच वयोगटांतले मतदार एक मजबूत सरकार निवडण्यासाठी विक्रमी संख्येने मतदान करतील, हा विश्वास आहे. 
 
- 9420721225