ठाकरे गटासमोर काँग्रेसची शरणागती, श्रद्धांजली वाहण्याची व्यवस्था

    दिनांक :27-Mar-2024
Total Views |
- संजय निरुपम यांचा अहेर
 
मुंबई, 
मुंबईतल्या 6 पैकी 5 जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला दिल्या जात असल्यास काँग्रेसच्या नेत्यांना पक्षाच्या अस्तित्वाचे काहीही देणेघेणे राहिले नसून, चर्चेसाठी गेलेल्या काँग्रेस नेत्यांनी ठाकरे गटासमोर सपशेल शरणागती पत्करली, असा अहेर काँग्रेसचे नेते व माजी खासदार Sanjay Nirupam संजय निरुपम यांनी दिला. ‘बार्गेनिंग पॉवर’ नसलेले नेते काँग्रेसला श्रद्धांजली वाहण्याची व्यवस्था करीत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
 
 
Sanjay Nirupam
 
उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात आपण काँग्रेसचे नेतृत्व करतो. सातत्याने या क्षेत्रात आपला संपर्क ठेवून, क्षेत्र बांधून ठेवण्याची काम करीत असतो. मात्र, या क्षेत्राबाबत निर्णय घेताना स्थानिक नेतृत्वाशी केली नाही, त्यांना डावलून कार्यकर्ते, नेत्यांची भूमिका जाणून घेण्याचे औदार्य काँग्रेसच्या नेत्यांनी दाखविले नाही. त्यामुळे आठवडाभर पक्ष नेतृत्वाची वाट पाहिल्यानंतर माझा निर्णय घेणार असल्याचा इशारा Sanjay Nirupam निरुपम यांनी काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वाला दिला.
 
 
Sanjay Nirupam निरुपम म्हणाले, मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझ्यासमोर सगळे पर्याय उपलब्ध आहेत. आता आरपारची लढाई होईल. येत्या आठवड्याभरात तुम्हाला घोषणा ऐकायला मिळू शकते, असे सूचक वक्तव्य संजय निरुपम यांनी केले. त्यामुळे आता निरुपम काँग्रेस आणि पर्यायाने महाविकास आघाडीलाच आव्हान देणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.
 
‘खिचडी चोरा’साठी काम करणार नाही
काँग्रेसचे शीर्ष नेतृत्व भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवते. तुमचा यासाठी लढा खरा असेल तर, आघाडीमधील घटकपक्ष एका खिचडी चोराला उमेदवारी देत असल्याचे तुम्हाला कसे चालते, असा सवाल उपस्थित करीत आपणच काय तर, खिचडी चोरासाठी काँग्रेसचा कोणताही कार्यकर्ता काम करणार नाही, असा इशारा निरुपम यांनी दिला.