रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद कालवश

    दिनांक :27-Mar-2024
Total Views |
कोलकाता, 
रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन बेलूर मठाचे अध्यक्ष Swami Samranand Maharaj स्वामी स्मरणानंद महाराज यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने रामकृष्ण मिशन सेवा प्रतिष्ठान येथे निधन झाले. 95 वर्षीय स्वामी स्मरणानंद महाराजांवर 1 मार्चपासून उपचार सुरू होते. रामकृष्ण मठ आणि मिशनचे माजी अध्यक्ष स्वामी आत्मस्थानंद महाराज यांच्या निधनानंतर स्वामी स्मरणानंद महाराज यांनी रामकृष्ण मठ आणि मिशनचे 16 वे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला होता.
 
 
swami-smrananand
 
त्यांनी 17 जुलै 2017 रोजी रामकृष्ण मठाचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला होता. गेल्या सहा महिन्यांपासून ते वृद्धापकाळाशी संबंधित आजाराने त्रस्त होते. सुमारे महिनाभर ते कोलकाता येथील रामकृष्ण मिशन सेवा प्रतिष्ठान रुग्णालयात दाखल होते. न्यूरोलॉजी आणि इतर विभागातील डॉक्टरांनी त्यांना नियमित निरीक्षणाखाली ठेवले. उत्तम वैद्यकीय सेवा असूनही गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती.
 
 
 
पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी या महिन्याच्या सुरुवातीला महाराजांची भेट घेतली होती. नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वामी स्मरणानंद महाराज यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. Swami Samranand Maharaj स्वामी स्मरणानंद महाराज यांच्या निधनावर नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिले आहे की, रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष श्रीमत् स्वामी स्मरणानंदजी महाराज यांनी आपले जीवन अध्यात्म आणि सेवेसाठी समर्पित केले. त्यांनी असंख्य लोकांच्या हृदयांवर आणि मनांवर आपली छाप सोडली. त्यांची करुणा आणि ज्ञान पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील.