शर्ट बदलला जावा तसा पक्ष बदल!

    दिनांक :28-Mar-2024
Total Views |
वेध
- नंदकिशोर काथवटे
Politics - Change parties : शर्ट बदलला जावा तशी राजकीय मंडळी आता पक्ष बदलू लागली आहेत. कारणे काहीही असली तरी या राजकारण्यांची नीतिमत्ता पार रसातळाला पोहोचली आहे. सामान्य माणसे उपवासदेखील दुसर्‍या दिवशी सोडतात. मात्र, येथे तर सकाळी एका पक्षाचा राजीनामा द्यायचा आणि सायंकाळी दुसर्‍या पक्षात प्रवेश करून त्या पक्षाचे गोडवे गायचे, असा प्रकार सर्रास सुरू झाला आहे. काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र आदिवासी आघाडी प्रदेशाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांनी काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप करीत पत्रपरिषदेत आपण आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले. राजीनामा देऊन अवघ्या काही तासांतच डॉ. उसेंडी यांनी नागपुरात जाऊन भाजपामध्ये प्रवेश केला. राजीनामा दिल्यानंतर गडचिरोलीवरून नागपूरला जाण्यासाठी जेवढा काही वेळ लागला असेल तेवढाच वेळ त्यांचा वाया गेला असेल.
 
 
leader-cartoon
 
उसेंडींचा भाजपा प्रवेश झाल्यानंतर सायंकाळी लगेच सर्वत्र बातम्यांचा पाऊस पडायला लागला आणि उसेंडी भाजपावासी झाले हे अख्ख्या राज्याला कळले. काँग्रेस पक्षाने डॉ. उसेंडी यांना गडचिरोली निर्वाचन क्षेत्रातून तिकीट नाकारल्यानंतर नाराज झालेल्या उसेंडी यांनी काँग्रेसशी फारकत घेत भाजपाशी जुळवून घेतले. मात्र, उसेंडी यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाला धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे. चार दिवसांपूर्वी काँग्रेसचे डॉ. नितीन कोडवते व डॉ. चंदा कोडवते हेदखील काँग्रेस सोडून भाजपात आले आणि काल उसेंडींनी हाती कमळ घेतले. या सर्व घडामोडी फारच विचित्र पद्धतीने घडत असून एकूणच राजकीय पक्षाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. उसेंडींनी काँग्रेस पक्षावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसमध्ये तिकीट वाटपात पैशाचा निकष पाळला जातो. जो उमेदवार पैसे खर्च करू शकतो, ज्या उमेदवाराकडे पैसे आहेत केवळ त्याच उमेदवाराला उमेदवारी दिली जाते. यासारखे गंभीर आरोप पक्ष सोडताना काँग्रेसवर केले आहे. आपण काँग्रेसची सेवा केली, आदिवासी समाजाला काँग्रेसशी जोडले, गडचिरोली जिल्ह्यात पक्ष संघटन वाढविले. तरीदेखील केवळ पैशाच्या निकषापोटी आपली उमेदवारी कापून बाहेरच्या उमेदवाराला उमेदवारी बहाल करण्यात आली. यासाठी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते जबाबदार असल्याचा आरोप उसेंडींनी केला आहे. काँग्रेसमध्ये असे जर घडत असेल तर ते अतिशय वाईट आहे. काँग्रेसची स्थिती सध्या राज्यात अतिशय बिकट झाली आहे.
 
 
Politics - Change parties : महाविकास आघाडीचा फज्जा उडाल्यानंतर काँग्रेस एकाकी पडली आहे. असे असताना जर काँग्रेस पक्षाचे जुने कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी भाजपाच्या प्रभावाखाली येऊन पक्षात प्रवेश करू लागले असतील तर काँग्रेससाठी ही नक्कीच धोक्याची घंटा आहे. नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी पक्ष सोडून दुसर्‍या पक्षांची वाट धरू नये म्हणूनच कदाचित काँग्रेसने उमेदवारी जाहीर करताना उशीर केला असेल. काँग्रेसला पुन्हा उभे राहायचे असेल तर कार्यकर्त्यांना व पदाधिकार्‍यांना सांभाळण्याची गरज आहे. या उलट स्थिती मात्र भाजपामध्ये असून इतर पक्षातून भाजपात येणार्‍या नेत्यांना व कार्यकर्त्यांना कसे सामावून घ्यायचे, असा प्रश्न पडला आहे. कालपर्यंत भाजपाला शिव्या देणारे आज मात्र भाजपा चांगला पक्ष असल्याचे जाहीरपणे बोलू लागले आहेत. भाजपानेसुद्धा बाहेरून आलेल्यांना सामावून घेतना पक्षातील इतर पदाधिकार्‍यांवर, कार्यकर्त्यांवर अन्याय होत नाही ना, याची काळजी घेण्याची गरज आहे. गडचिरोलीच्या राजकारणात डॉ. नितीन कोडवते, डॉ. चंदा कोडवते व डॉ. नामदेव उसेंडी या तीनही नेत्यांचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्याशी चांगले सख्य होते. या तिघांचीही ओळख वडेट्टीवारांचे समर्थक म्हणून होती. त्यामुळे काँग्रेसच्या दुसर्‍या गटात फारशी किंमत नव्हती. अखेर या तिघांनाही भाजपामध्ये आणणारी एक शक्ती चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याच्या भाजपाच्या राजकारणात स्थिरावू पाहत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या दोन्ही जिल्ह्याच्या भाजपाच्या राजकारणात आपले महत्त्व वाढविण्यासाठी एका नेत्याची कुरघोडी आता चांगलीच चर्चेत आली आहे. डॉ. नामदेव उसेंडी यांचा भाजपा प्रवेश याच नेत्याच्या मध्यस्थीने झाला असल्याचे बोलले जात आहे. उसेंडी यांच्या भाजपा प्रवेशामुळे अशोक नेते यांच्या उमेदवारीला किती फायदा होतो, हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल. मात्र, त्यांचा भाजपा प्रवेश आणि त्यांनी केलेले काँग्रेस पक्षावरील आरोप चांगलेच चर्चेत आले आहेत. 
 
- 9922999588