तभा वृत्तसेवा
चिखलदरा,
The famous Rani Park : चिखलदरा हे विदर्भाचे नंदनवन असून या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून पर्यटक येतात; मात्र या ठिकाणचा प्रसिद्ध असलेला राणी पार्क नेहमी बंद राहत असून त्यामुळे पर्यटकांना परतावे लागते. नगरपालिकेतर्फे या राणी लक्ष्मीबाई पार्कमध्ये लाखो रुपये खर्च करून सुशोभीकरणाची मोठी कामे करण्यात आली आहेत; मात्र सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रायमुनिया गवत तसेच जंगली झुडपे वाढत आहेत व या ठिकाणी लावलेले खेळणे सुद्धा तुटत आहेत.
या गार्डनकडे चिखलदरा नगरपालिकेचे पूर्णतः दुर्लक्ष होत असून गार्डन नेहमी बंद राहात असल्यामुळे पर्यटकांची निराशा होते. पर्यटक आले नाही तर या ठिकाणच्या छोट्या व्यवसायिकांना रोजगार मिळणार नाही. चिखलदर्याची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. या ठिकाणी शासनामार्फत पर्यटन विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात येतो. मात्र नंतर त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. सध्या पार्क बंद असल्यामुळे गेटवरून परत जावे लागते. पार्क तात्काळ सुरू करावे, अशी मागणी स्थानिक तसेच पर्यटकांकडून होत आहे.