मृत्युंजयांचा आत्मयज्ञ

भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू

    दिनांक :30-Mar-2024
Total Views |
संघर्ष गाथा
Bhagat Singh, Sukhdev and Rajguru : भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी झाला. शिक्षण घेत असताना ते जुगलकिशोर, भाई परमानंद आणि जयचंद विद्यालंकार यांच्या संपर्कात आले. 1923 मध्ये घर सोडून ते कानपूरला निघून गेले. भगतसिंग यांना हिंदी, उर्दू आणि पंजाबी या तिन्ही भाषा उत्तमप्रकारे अवगत होत्या. त्यांचे अनेक लेख कीर्ती (अमृतसर) या पंजाबी मासिकात प्रकाशित झाले होते. त्याचप्रमाणे अकाली आणि चाँद या उर्दू मासिकातही त्यांचे लेख प्रकाशित झाले होते. कानपूरमध्ये त्यांनी आपले नाव बदलून ‘बलवंत सिंह’ केले आणि गणेश शंकर विद्यार्थी यांच्या दैनिक ‘प्रताप’ या वृत्तपत्राच्या संपादन विभागात ते काम करू लागले. मात्र, पोलिसांची सक्रियता वाढू लागली आणि ते अलिगडच्या एका शाळेत शिकवू लागले.
 
 
Krantikarak-3
 
पुढील सहा महिन्यांनंतर ते पुन्हा लाहोरला परतले. तेथे काही दिवस राहिल्यानंतर ते दिल्लीला आले. येथे त्यांनी दैनिक अर्जुनच्या संपादन विभागात काम करण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी ते पुन्हा कानपूरला परतले. यादरम्यान, त्यांचा संपर्क बटुकेश्वर दत्त, अजय घोष, विजयकुमार सिन्हा आणि योगेशचंद्र चॅटर्जी यांसारख्या क्रांतिकारकांशी आला. लाहोरमध्ये 1926 च्या दसरा मेळ्यात कोणीतरी बॉम्ब हल्ला केला होता. याप्रकरणी पोलिसांनी भगतसिंग यांना अटक केली. मात्र, भगतसिंग यांचा या घटनेशी कवडीचाही संबंध नव्हता. उच्च न्यायालयाने त्यांची 60 हजार रुपयांच्या जामिनावर सुटका केली. सरकारकडे कुठलेही पुरावे नव्हते. त्यामुळे खटला बंद करण्यात आला.
 
 
Bhagat Singh, Sukhdev and Rajguru : सचिंद्रनाथ (शचींद्रनाथ) सन्याल, रामप्रसाद बिस्मिल आणि योगेशचंद्र चॅटर्जी यांनी क्रांतिकारकांचा अखिल भारतीय पक्ष सुरू करण्यास पुढाकार घेतला. त्यांनी 1923 मध्ये हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशनची स्थापना केली. भगतसिंगही देखील या गटात सामील झाले आणि त्यांचे नाव ‘बलवंत’ असे ठेवण्यात आले. काकोरी घटनेनंतर ते फारसे सक्रिय नव्हते. हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशनचे बहुतांश नेते तुरुंगात होते. इकडे भगतसिंग यांनी कानपूरचे विजयकुमार सिन्हा आणि लाहोरचे सुखदेव यांच्यासोबत क्रांतिकारी पक्षाचे पुन्हा संघटन करण्यास सुरुवात केली. 8-9 सप्टेंबर 1928 रोजी दिल्लीच्या फिरोजशाह कोटला येथे बैठक बोलावण्यात आली. बिहारचे दोन, पंजाबचे दोन, राजस्थानातून एक आणि पाच क्रांतिकारक संयुक्त प्रांतातून एकत्र गोळा झाले. सुरक्षेच्या कारणास्तव चंद्रशेखर आझाद यांनी बैठकीला येऊ नये असे त्यांना कळविण्यात आले. आणखी एक क्रांतिकारक सभेपासून दूर राहिले. सुखदेव, फणींद्रनाथ बोस आणि मनमोहन बॅनर्जी देखील या बैठकीत सहभागी झाले होते. भगतसिंग यांचे सर्व प्रस्ताव सहा विरुद्ध दोन अशा बहुमताने मंजूर झाले. याच बैठकीत हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिक असोसिएशनची स्थापना करण्यात आली. भगतसिंग आणि आणखी एक क्रांतिकारक विजयकुमार सिन्हा यांना समन्वयाचे काम देण्यात आले.
 
 
सुखदेव आणि राजगुरू
सुखदेव आणि राजगुरू यांची गणना त्या क्रांतिकारक आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांमध्ये केली जाते, ज्यांनी कोवळ्या तरुण वयात देशासाठी बलिदान दिले. सुखदेव यांचा जन्म 15 मे 1907 रोजी पंजाबच्या लुधियाना येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव ‘सुखदेव थापर’ असे होते. 1919 मध्ये जालियनवाला बागेतील भीषण हत्याकांडामुळे संपूर्ण देशात भीतीचे तसेच दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी सुखदेव यांचे वय अवघे 12 वर्षे होते. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना ब्रिटीश अधिकार्‍यांना मानवंदना (सॅल्यूट) द्यावी लागत असे. पण सुखदेवने तसे करण्यास ठामपणे नकार दिला, त्यामुळे त्याला शिक्षाही देण्यात आली. लायलपूरच्या सनातन धर्म हायस्कूल येथून मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर सुखदेव यांनी लाहोरच्या नॅशनल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. येथेच सुखदेव यांची भेट भगतसिंग यांच्याशी झाली. स्वातंत्र्यप्राप्ती, स्वराज्य याबाबत सुखदेव आणि भगतसिंग यांची मते एकसारखी होती. त्यामुळे लवकरच त्यांच्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले.
राजगुरू यांचा जन्म 24 ऑगस्ट 1908 रोजी पुणे जिल्ह्यातील खेडा गावात झाला. त्यांचे संपूर्ण नाव शिवराम हरी राजगुरू होते. ते लहानपणापासूनच वीर आणि धाडसी प्रवृत्तीचे होते. त्यांचे शिक्षण वाराणसीत झाले आणि येथूनच त्यांचा संपर्क स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारकांशी आला. राजगुरूंवर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या विचारांचा खूप प्रभाव होता.
 
 
भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, राजगुरू आणि जयगोपाल
Bhagat Singh, Sukhdev and Rajguru : भारतातील शासन सुधारणांसाठी सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन केला जाईल, अशी घोषणा 8 नोव्हेंबर 1927 रोजी तत्कालीन व्हाईसरॉयने केली. 30 ऑक्टोबर 1928 रोजी आयोगाचे सदस्य लाहोरला आले. येथे सायमन कमिशनला पंजाब केसरी लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली जोरदार विरोध झाला. रेल्वे स्थानकावर पोलिस अधीक्षक स्कॉट याने सहायक पोलिस अधीक्षक साँडर्स याला लाठीमार करण्याची परवानगी दिली होती होती. लाला लाजपत राय यांना गंभीर दुखापत झाली आणि 17 नोव्हेंबर 1928 रोजी त्यांचे निधन झाले. भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, राजगुरू आणि जयगोपाल यांनी याचा सूड घेण्याचे ठरवले. चौघांनी मिळून 27 डिसेंबर 1928 रोजी पोलिस अधीक्षक स्कॉट याला ठार मारण्याची योजना आखली. मात्र, त्यांनी सहायक पोलिस अधीक्षक साँडर्स याला गोळी मारली. पिस्तुलाचा ट्रिगर राजगुरूंनी दाबला आणि भगतसिंग यांनी पाच वेळा गोळीबार केला. ब्रिटिश भारतातील अशा प्रकारची ही दुसरी घटना होती. पहिली घटना पुण्यात घडली होती. 1896 मध्ये पुण्यात प्रथमच प्लेगची लागण झाली. प्लेग अधिकारी या नात्याने ब्रिटिश अधिकारी डब्ल्यू. सी. रँडने अनेक चुकीचे निर्णय घेतले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 4 मे 1897 रोजी केसरीमध्ये एक लेख लिहिला ज्यामध्ये त्यांनी सरकारवर जनतेवर अत्याचार केल्याचा आरोप केला. यातून प्रेरित होऊन चापेकर बंधूंनी 22 जून 1897 रोजी रँड आणि अन्य अधिकार्‍याची गोळ्या झाडून हत्या केली होती.
 
 
सेंट्रल असेंब्लीत स्फोट
भगतसिंग डिसेंबर 1928 मध्ये कलकत्ता (आता कोलकाता) येथे दाखल झाले. कलकत्त्यात त्यांची भेट त्रैलोक्य प्रतुलचंद्र गांगुली, फणींद्रनाथ बोस आणि यतीन्द्रनाथ दास यांच्याशी झाली. येथे त्यांनी सेंट्रल असेंब्लीमध्ये (जुने संसद सभागृह) स्फोट घडविण्याची योजना आखली. जानेवारी 1929 मध्ये ते आग्रा येथे परतले. येथे त्यांनी यतीन्द्रनाथ दास, सुखदेव, बटुकेश्वर दत्त, चंद्रशेखर आझाद आणि विजयकुमार सिन्हा यांच्यासोबत ठरलेल्या योजनेप्रमाणे काम सुरू केले. येथे बनवलेले बॉम्ब चाचणीसाठी झाशीला नेण्यात आले आणि ती चाचणी यशस्वी झाली.सेंट्रल असेंब्लीत दोन प्रस्तावांवर चर्चा होणार होती. पहिले जनसुरक्षा विधेयक 6 सप्टेंबर 1928 रोजी आणले गेले. क्रांतिकारी कारवायांना वेसण घालणे हा त्याचा उद्देश होता. हा प्रस्ताव 24 सप्टेंबर रोजी फेटाळण्यात आला. जानेवारी 1929 मध्ये काही बदलांसह हे विधेयक पुन्हा असेंब्लीत आणले गेले. दुसरे म्हणजे, कामगारांना संपावर जाण्यापासून रोखण्यासाठी 4 सप्टेंबर 1928 रोजी औद्योगिक विवाद विधेयक आणले गेले. सभागृहाने ते निवड समितीकडे पाठवले आणि काही बदलांसह ते 2 एप्रिल 1929 रोजी चर्चेसाठी सादर केले गेले. दोन्ही परिस्थितीत ब्रिटिश सरकारला स्वतःचे संरक्षण करायचे होते. मात्र, दोन्ही ठराव एकमताने मंजूर झाले नाहीत. व्हाईसरॉयने स्वत:च्या विशेषाधिकाराने त्यांना कायद्याचे स्वरूप दिले. याची 8 एप्रिल 1929 रोजी सेंट्रल असेंब्लीत घोषणा होणार होती. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांच्यासोबत सायमनही त्या दिवशी विधानसभेचे कामकाज पाहण्यासाठी आला होता. कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून भगतसिंग यांनी सलग दोन बॉम्ब पाठीमागच्या बाजूने फेकले. त्यानंतर त्यांनी पिस्तुलातून हवेत दोन गोळ्या झाडल्या. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी ‘इन्कलाब झिंदाबाद’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली.
 
 
दोघांना अटक करण्यात आली आणि 4 जून 1929 रोजी दिल्लीत त्यांच्याविरुद्ध खटला सुरू झाला. दोन दिवसांनी त्यांचे जबाब घेण्यात आले. 10 जून रोजी सत्र न्यायाधीश मिडल्टन यांनी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. भगतसिंग आणि दत्त दोघांनीही उपोषण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, त्यांच्यावर 10 जुलै 1929 रोजी लाहोरमध्ये सहायक पोलिस अधीक्षक साँडर्स याच्या हत्येचा खटला चालवण्यात आला. भगतसिंग यांनी निषेधार्थ न्यायालयात उपस्थित राहणे बंद केले. इंग्रज सरकारने सेंट्रल असेंब्लीमध्ये एक प्रस्ताव पारित केला की जर आरोपीने कोर्टात येण्यास स्वत:ला अपात्र ठरवले तर न्यायाधीशांना त्याच्या अनुपस्थितीत कामकाज चालू ठेवण्याचा अधिकार राहील. या संदर्भात गव्हर्नर जनरल आयर्विन यांनी 1 मे 1930 रोजी लाहोर षडयंत्र प्रकरणी एक अध्यादेश जारी केला.
 
 
Bhagat Singh, Sukhdev and Rajguru : शेवटच्या वेळी ते सर्व 12 मे 1930 रोजी कोर्टासमोर हजर झाले आणि त्यांनी देशभक्तिपर गीते गायला सुरुवात केली. ब्रिटीश सरकारला हे मंजूर नव्हते. म्हणून तेथील पोलिसांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेनंतर ते कधीही न्यायालयात गेले नाही. त्यामुळे आरोपींच्या अनुपस्थितीत तीन महिने ही कार्यवाही चालली आणि 26 ऑगस्ट 1930 रोजी समाप्त झाली.
न्यायाधिकरणाचा (ट्रिब्युनल) निर्णय 7 ऑक्टोबर 1930 रोजी सुनावण्यात आला. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी, सात जणांना आजन्म काळ्यापाण्याची शिक्षा, एकाला सात वर्षांची आणि एकाला तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. भगतसिंग आपल्या कुटुंबीयांना 3 मार्च 1931 रोजी अखेरचे भेटले. सरकारी वकील कार्डेन नॉड याने फाशीचा आदेश घेतला. 23 मार्च 1931 रोजी संध्याकाळी 7 वाजून 33 मिनिटांनी सर्वांना फाशी देण्यात आली.
 
 
भगतसिंग यांचे बलिदानी कुटुंब
भगतसिंग यांचा जन्म देशभक्त आणि सर्वस्व अर्पण करणार्‍या कुटुंबात झाला. भगतसिंग यांच्या बलिदानी कुटुंबाची वंशपरंपरा पाहिली तर आपल्या लक्षात येईल की, सरदार फतेहसिंग ते भगतसिंग यांच्यापर्यंत या घराण्याच्या पाच पिढ्यांनी स्वेच्छेने कष्ट, हालअपेष्टा सहन करून देशासाठी स्वत:ला समर्पित केले.
भगतसिंग यांच्या बलिदान कुटुंबाचे संस्कारच असे होते की ज्यामुळे पिढ्यान्पिढ्या या कुटुंबात ही परंपरा सुरूच राहिली. या कुटुंबातील स्त्रियांनी वीर योद्ध्यांना जन्म दिला, ज्यांनी देशभक्तीपोटी आपल्या प्राणांची आहुती दिली. भगतसिंग यांची आजी जय कौर यांनी एका सामाजिक क्रांतिकारकाशी विवाह केला. त्यांनी अनेक क्रांतिकारकांचे आदरातिथ्य केले आणि जखमी व अपंगांची नि:स्वार्थ भावनेने सेवा केली. भगतसिंग यांच्या कुटुंबातील महिलांनी देखील स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी खूप कष्ट सोसले. आपले पती अजित सिंग जिवंत आहेत की मृत याची हरनाम कौर यांना मुळीच कल्पना नव्हती. हुकुम कौर वयाच्या विसाव्या वर्षीच विधवा झाल्या होत्या आणि वयाच्या 56 व्या वर्षापर्यंत त्या ही वेदना, हे दु:ख सहन करीत होत्या. त्यांनी भगतसिंग आणि त्यांच्या भाऊ-बहिणींचे संगोपन केले. यामुळेच भगतसिंग यांना आपल्या या काकूंविषयी अतिशय आदर व प्रेम होते. अमर कौर ही भगतसिंग यांची धाकटी बहीण होती. तिचा स्वातंत्र्यलढ्यातील राजकीय आणि सामाजिक अशा दोन्ही उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग होता. तिने लाहोरमध्ये भारतीय तिरंगा फडकवला. 1955 मध्ये अमर कौर यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 
 
राजगुरू आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
Bhagat Singh, Sukhdev and Rajguru : शिवराम हरी राजगुरू (1908-1931) यांचे शिक्षण नागपूरच्या भोसला वेदशाळेत झाले होते. येथे त्यांची भेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्याशी 1925 मध्ये झाली. यानंतर राजगुरू यांनी नागपुरातील मोहिते वाडा शाखेला अनेकदा भेट दिली. राजगुरूंना व्यायामाची खूप आवड होती. क्रांतिकारक कार्यात सामील होण्यासाठी ते वाराणसीला आले. येथे ते भगतसिंग आणि इतर क्रांतिकारकांच्या संपर्कात आले.
सहायक पोलिस अधीक्षक साँडर्स याला गोळ्या घातल्यानंतर ब्रिटिश सरकारने राजगुरू आणि इतर क्रांतिकारकांना पकडण्याचे प्रयत्न सुरू केले. राजगुरूंना पकडले जाण्याची कुठलीही भीती नव्हती. ब्रिटिश सरकारच्या विरोधात तरुणांना जागृत करण्याचे काम ते नियमितपणे करीत राहिले. पुढे ते एका क्रांतिकारकासोबत अमरावतीला आले. येथे राजगुरू हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या उन्हाळी शिबिरात सामील झाले. येथून ते अकोल्यात गेले आणि राजराजेश्वर मंदिराजवळ भाड्याच्या घरात राहू लागला. याची व्यवस्था बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांनी केली होती. त्यानंतर ते बर्‍याचदा अमरावती, नागपूर आणि वर्धा येथे गेले. दरम्यान, 1929 मध्ये राजगुरू नागपुरात असताना डॉ. हेडगेवार यांना भेटले. सरसंघचालकांनी त्यांना पुण्याला न जाण्याचा सल्ला दिला. ब्रिटिश सरकारपासून त्यांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी उमरेड येथील भैयाजी दाणी यांच्या स्थानी राजगुरूंच्या मुक्कामाची व्यवस्था केली होती. मात्र, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला मानला नाही व ते पुण्याला गेले. जिथे त्यांना 30 सप्टेंबर 1929 रोजी अटक करण्यात आली.
 
 
भगतसिंग यांची काँग्रेसवर नाराजी
भगतसिंग डिसेंबर 1928 मध्ये कोलकाता येथे पोहोचले. त्यावेळी तेथे काँग्रेसचे अधिवेशन सुरू होते. ब्रिटिश सरकारला नेहरू समिती (वसाहतवादी) अहवाल लागू करण्याचा अल्टिमेटम देण्यात आला होता. भगतसिंगांचे असे मत होते की काँग्रेस संपूर्ण स्वराज्याच्या मद्रास निर्णयापासून मागे हटली आहे ; एवढेच नव्हे तर वसाहतवादी स्वराज्याच्या मागणीसंदर्भातही काँग्रेस एक पाऊल मागे हटली आहे. ही प्रगती नसून माघार आहे, असे त्यांचे मत होते.
 
 
भगतसिंग आणि वीर सावरकर : एकमेकांच्या लेखणीतून भगतसिंग यांचे वीर सावरकरांशी अतिशय घट्ट नाते होते. राजकारणात सहभागी न होण्याच्या अटीवर ब्रिटिशांनी त्यांना मुक्त केले. भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना फाशीची शिक्षा घोषित झाली त्यावेळी वीर सावरकर रत्नागिरीत नजरकैदेत होते. या दोन महान क्रांतिकारकांनी एकमेकांचे मन चांगलेच जाणून घेतले असे आपण म्हणू शकतो. महात्मा गांधींचे अनुयायी य. दि. फडके यांच्या मते, भगतसिंग यांनी वीर सावरकरांच्या ‘1857 चे स्वातंत्र्यसमर’ या पुस्तकातून प्रेरणा घेतली होती. इतकेच नव्हे, तर भगतसिंग यांनी आपल्या तुरुंगातील रोजनिशीत अनेक लेखकांचे विचार उद्धृत केले आहेत. त्यात केवळ सात भारतीय लेखकांचा समावेश आहे. त्यापैकी वीर सावरकर असे एकमेव लेखक आहेत की ज्यांचे एकापेक्षा अधिक लेख भगतसिंगांनी आपल्या डायरीत समाविष्ट केले आहेत.
 
 
मदनलाल धिंग्रा, अंबा प्रसाद, बालमुकुंद, सचिंद्रनाथ यांच्यासारखे क्रांतिकारक वीर सावरकर आणि भगतसिंग यांच्या लेखणीचे विषय होते. वीर सावरकरांनी 20 डिसेंबर 1928 रोजी लाला लजपतराय यांच्यावर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध करणारा लेख वीर सावरकरांनी लिहिला होता.
 
 
Bhagat Singh, Sukhdev and Rajguru : वीर सावरकरांनी आपल्या लिखाणात भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांचा उल्लेख अनेकदा केला आहे. सावरकरांवरील ‘द रिअल मीन ऑफ टेरर’ या शीर्षकाचा लेख भगतसिंग आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मे 1928 मध्ये ‘कीर्ती’मध्ये प्रकाशित केला होता. भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांच्या समर्थनार्थ वीर सावरकरांनी लिहिलेल्या एका लेखाचे शीर्षक ‘सशस्त्र पण अत्याचारी’ असे होते. अशाच आशयाचा एक लेख भगतसिंग आणि व्होरा यांनी 26 जानेवारी 1930 रोजी प्रकाशित केला होता. य. दि. फडके म्हणतात, अशा लेखांच्या माध्यमातून वीर सावरकर तरुणांच्या हृदयात क्रांतीची ठिणगी पेटवत होते.
 
 
हा भगतसिंग ! हाय हा !!
23 मार्च 1931 या दिवशी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तीन क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अवघ्या 22-23 वर्षांच्या तीन युवकांनी हौतात्म्य पत्करले. स्वातंत्र्यवीर सावरकर त्यावेळी रत्नागिरीत होते. हे वृत्त कळताच ते अतिशय अस्वस्थ झाले. पण ते स्वस्थ बसणारे नव्हते. समाजकारणाआडून देशकारण, राजकारण करण्यासाठीच तर त्यांनी राजकारणात भाग न घेण्याची अट आणि स्थानबद्धता स्वीकारली होती. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या हुतात्म्यांच्या गौरवाकरिता त्यांनी एक गीत लिहायला घेतले.
हा भगतसिंग हाय हा !
जाशि आजी, फांशि आम्हांस्तवचि वीरा हाय हा !
राजगुरू तू हाय हा !
राष्ट्रसमरी वीर कुमरा पडसि झुंजत हाय हा!
हाय हा, जयजय अहा !
जा हुतात्म्यांनो अहा !
साक्ष ठेवुनि शपथ घेतों आम्हि उरलों ते पहा !
शस्त्रसंगर चंड हा, झुंजवुनि कीं, जिंकुची स्वातंत्र्यविजयासी पहा !
हाय हा, जयजय अहा !!
दुसर्‍या दिवशी सूर्याची पहिली किरणं उगवण्यापूर्वीच सावरकरांच्या तरुण सहकार्‍यांनी ते गीत गात प्रभात फेरी काढली. रत्नागिरीकर जागे झाले ते भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या हुतात्म्यांच्या जागरानं.
भगतसिंगाचा विजय असो...
स्वातंत्र्यलक्ष्मीचा विजय असो !!! 
 
(पांचजन्यवरून साभार)