धर्म, संस्कृती आणि विज्ञान

    दिनांक :30-Mar-2024
Total Views |
वेध
- पुंडलिक आंबटकर
Dharm, Sanskriti and Vigyan हिंदू हा केवळ धर्म नसून जीवन जगण्याची एक सुसंस्कृत पद्धतसुद्धा होय, अशी व्याख्या विचारवंतांनी केलेली आहे. सनातन धर्म अतिप्राचीन असून, प्राचीन काळात भारत एक पुढारलेला देश होता. भारतीय संस्कृतीचा पाया विज्ञानावर आधारित असल्याचे नव्याने सांगण्याची गरज नाही. ज्याकाळी पाश्चात्त्यांना कपडे घालायचीही चाड नव्हती तेव्हाच भारतीयांनी अध्यात्मासह विज्ञानातही भरारी घेतली होती. त्यामुळेच भारतीय अध्यात्म आणि विज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे महान शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कलाम सांगायचे. डॉ. होमी भाभा यांनी भारताच्या अणुयुगाची पायाभरणी केली आणि डॉ. अब्दुल कलाम यांनी त्यावर कळस चढविला.
 
 
Dharm, Sanskriti and Vigyan
 
भारतीय ऋषी-मुनी केवळ अध्यात्मातच पारंगत नव्हते, तर विज्ञानातही त्यांचा वरचष्मा होता. ब्रह्मांडाला वेळेची गती लागू होत नाही; हे आज विज्ञानाने सिद्ध केले आहे. अर्थातच ब्रह्मांडात जेव्हा एक दिवसाचा काळ लोटतो तेव्हा पृथ्वीवर कितीतरी वर्षे उलटून गेलेली असतात. ही बाब मात्र भारतीयांनी प्राचीन काळातच सिद्ध केलेली होती. तसे अनेक दाखले हिंदू धर्मग्रंथांमध्ये आढळतील. मानधाता नावाचा राजा अयोध्येत राज्य करायचा. त्याने ऋषी-मुनींच्या विज्ञानाचा लाभ घेऊन संपूर्ण भूतलावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. ही बाब देवगुरू बृहस्पती यांनी इंद्राला पटवून दिल्यानंतर इंद्राने राजा मानधाताशी युद्ध टाळले होते. लवणासुराचा वध करण्याची जबाबदारी जेव्हा प्रभू रामाने शत्रुघ्नावर सोपविली तेव्हा मानधाताचा उल्लेख रामायणात आला आहे.
 
 
Dharm, Sanskriti and Vigyan : श्वापेनहावर हा जर्मन तत्त्ववेत्ता बायबलला जगातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ मानायचा. परंतु, जेव्हा त्याने वैदिक तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला तेव्हा त्याने हजारो वर्षांपूर्वीच भारतीयांनी अध्यात्मासह विज्ञानातही यश मिळविल्याचा निष्कर्ष काढला आणि शेवटी त्याने बायबलचे मूळ वैदिक तत्त्वज्ञानातच असल्याचे ठासून सांगितले. 1901 पर्यंत झाडाझुडपांमध्ये जीव असतो, हेसुद्धा जगाला ठावूक नव्हते. भारताचे महान शास्त्रज्ञ डॉ. जगदीशचंद्र बोस यांनी झाडाझुडपांनाही जीव असतो, हे सोदाहरण सिद्ध केले. यासाठी त्यांना आपला प्राणसुद्धा डावावर लावावा लागला. भारताच्या कुठल्याच परंपरेचे मूळ अंधश्रद्धेत नाही. परंतु, कालांतराने खूळचट समजुती चिकटल्या आणि या देशाची अपरिमित हानी झाली. हिंदू आपल्या घरासमोर आजही तुळशीच्या रोपट्याची पूजा करतात. तुळशीचे रोपटे बहुगुणी आहेत. या रोपट्यातून सदैव प्राणवायू झरतो. आता भारताने सर्वच अंगांनी कात टाकली आहे. भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोने संपूर्ण जगात आपला दबदबा निर्माण केला आहे. डीआरडीओ ही संस्थासुद्धा भारताचे संरक्षण क्षेत्र मजबूत करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. शेकडो वर्षांची मरगळ झटकून देश विकासाच्या दिशेने अग्रेसर झालेला आहे. देशाची ऊर्जितावस्था सुरू झाली असून, स्वामी विवेकानंदांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आधुनिक पिढीवर येऊन पडली आहे.
 
 
Dharm, Sanskriti and Vigyan : जीवनवाहिनी गंगेचे पाणी भारतीय खूप पवित्र मानतात. आज गंगा दूषित झाली असली तरीही तिचे सत्त्व आणि तत्त्व मात्र कमी झालेले नाही. अमेरिकन विचारवंत मार्क ट्वेन याने 1896 मध्येच गंगेच्या पाण्याचे मूल्यमापन करून भारतीयांच्या आस्थेचा पुरस्कार केलेला आहे. भारतीय अध्यात्माने मोक्षप्राप्ती हे एकमेव उद्दिष्ट मनुष्य जीवनाचे मानले आहे. भारतीयांचा दृष्टिकोन विश्वकल्याणाचा आहे. त्यामुळेच विश्वगुरू होण्याचा अधिकार फक्त भारताला प्राप्त आहे. संपूर्ण जग भौतिक सुखासाठी झटत असताना ज्ञानेश्वर माउलीने विश्वकल्याणाची मागणी ईश्वरापुढे केली आहे. ही भारतीयांच्या हृदयाची विशालता होय. प्रभू श्रीराम हे भारतीयांचे आराध्य दैवत. प्रभू श्रीरामासारखा युगपुरुष जगात झालेला नाही. म्हणूनच त्यांना पुरुषोत्तम म्हणून गौरविले जाते. अशा या युगावतार प्रभू रामाचे राज्य पुन्हा प्रस्थापित करण्याचा संकल्प संपूर्ण भारतीयांनी केलेला आहे. प्राचीन काळात भारत इतका समृद्ध होता, की सर्व प्रकारच्या विद्या, कला आणि शास्त्रे शिकविण्याची सुविधा ऋषी-मुनींनी उपलब्ध केलेली होती. मोठमोठी शैक्षणिक विद्यापीठे त्यावेळी भारतात अस्तित्वात होती. ही परंपरा आपल्यापर्यंत येऊन ठेपली आहे. आता पुन्हा त्याच दिशेने मार्गक्रमण करण्याची जबाबदारी आधुनिक पिढीची आहे. भारत जेव्हा विश्वगुरूपदी आरूढ होईल तेव्हा संपूर्ण जगाचे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. 
 
- 9881716027