दगाबाज वृत्ती कोणाची?

    दिनांक :30-Mar-2024
Total Views |
मुंबई वार्तापत्र
- नागेश दाचेवार
LokSabha Elections : भारतीय जनता पक्षाने आमच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा अकांडतांडव काही लोक करत असल्याचे मागील काळात आपण बघितलेच आहे. शपथा घेऊन खोटं बोलणारी प्रवृत्ती आपण बघितली आहे. वेळोवेळी भारतीय जनता पक्ष खोटारडा आहे. भारतीय जनता पक्षाने आमच्या सोबत दगा केला. दिलेला शब्द पाळला नाही. आमच्या पाठीत भाजपाने खंजीर खुपसला. अशी रडारड अनेकवेळा महाराष्ट्राने ऐकली आणि बघितली आहे. मात्र, म्हणतात ना ‘कालाय तस्मै नमः’ काळाच्या ओघात यांचे पितळ उघडे पडले आहे. याच लोकांचा खोटारडेपणाचा मूळ स्वभाव असल्याचे या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सिद्ध झाले आहे. यावेळी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या काळूबाळूच्या जोडीला उघडे पाडणारे भारतीय जनता पक्षाचे नेते नसून, त्यांच्याच समविचार पक्षाचे आतापर्यंत महाविकास आघाडीत असणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडर आहेत. तर, बोलतात एक आणि करतात एक, ‘हम बोले सो कायदा’ अशी अडेल भूमिका घेणारे कोण आहेत याचा पर्दाफाश आता यांच्या आघाडीतील मोठा भाऊ असलेला घटकपक्ष काँग्रेसने केला आहे. त्यामुळे मुळात आघाडी धर्म असो किंवा मग युती धर्म, याला न जुमानता मुजोरी, अरेरावी करणारे दगाबाज वृत्तीचे कोण आहेत, हे आता यानिमित्ताने महाराष्ट्राला कळून चुकले आहे.
 
 
Uddhav Thackeray and Sanjay Raut
 
LokSabha Elections  : महायुतीमध्ये असताना भाजपाने पाठीत खंजीर खुपसल्याच्या गमजा आजवर मारल्या गेल्या. ठीक आहे भाजपा दगाबाज आहे, दिलेला शब्द पाळत नाही, पाठीत खंजीर खुपसला त्यामुळे तुमचं भाजपासोबत जमलं नाही आणि तुम्ही काडीमोड केला. आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या नेत्यांच्या नावानं शिमगा केला. ही बाब पण समजून घेऊ. पण अलिकडे गेल्या सहा महिन्यांपासून लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीमार्फत लढविण्यासाठी जागावाटपांच्या बैठकांवर बैठका होताना दिसत आहे. काही जागांवर एकमत झाले आणि काही जागांबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. तोडगा निघालेला नाही. असे असताना काँग्रेससारख्या महाविकास आघाडीतील राष्ट्रीय पक्ष असलेल्या मोठ्या भावाला फाट्यावर मारून त्यांच्या एक नव्हे तर दोन जागांवर आपले उमेदवार परस्पर जाहीर करून टाकणे याला कोणता आघाडी धर्म म्हणायचा? बरं उद्धव ठाकरेंबरोबर आपले श्रद्धास्थान मानणार्‍या शरद पवारांना अपेक्षित असलेल्या मुंबईतील एका जागेवर आपलीच उमेदवारी जाहीर करणे याला काय म्हणायचे. बरं तुमचा ताळमेळ चांगला आहे.
 
 
तुमच्यात एकवाक्यता आहे. तर, मग चर्चेतून समाधान काढून नंतर जागा जाहीर करायला काय अडचण होती. पण नाही मुजोरी हा यांच्या रक्तातला स्वभावगुण आहे. हा प्रकार पाठीत खंजीर खुपसण्याच्या श्रेणीत मोडत नाही का? कधी वंचित बहुजन आघाडीला बाजूला ठेवून बैठका घेता. तर, कधी काँग्रेसला बाजूला ठेवून, पवार आणि ठाकरे एकट्यात काथ्याकूट करतात. हे न समजायला काँग्रेसला काय दुधखुळी समजलात की काय? कितीही दुर्गती झाली तरी, काँग्रेसच्या 46 जागा आहेत सध्याच्या मावळत्या लोकसभेच्या सभागृहात. दुसरा सर्वात मोठा पक्ष आहे काँग्रेस. ठाकरेंचे किती 19 तेदेखील मोदींच्या जिवावर निवडून आलेले. आताची स्थिती काय तर, नावाला 6 खासदार. कोणाला डोळे दाखवताय्? हा पवारांना दाखवलेत तर एक वेळ ठीक तरी आहे. पण तरीदेखील डोळे दाखविण्यापेक्षा, कमी लेखण्यापेक्षा समन्वयाने, समजुतदारीने मार्ग काढल्यास लक्ष्य साध्य करणं सोपं असतं. मुळात आपमतलबी, स्वार्थी लोकांना सर्वांना सोबत घेऊन जाणे जमतच नाही. वरून दुसर्‍यांच्या डोक्यावर खापर फोडण्याची, ‘विक्टीम कार्ड’ खेळण्याची सवय तर, नसानसात भिनली आहे.
 
 
बरं यावेळी काँग्रेससोबतच गद्दारी केलेली नसून, संविधान वाचविण्यासाठी, LokSabha Elections  लोकशाही वाचविण्यासाठी निवडणूक लढण्याची भाषा करणारे त्याच संविधान निर्मात्याच्या नातवासोबत ‘डर्टी पॉलिटिक्स’ करताना दिसले. असा आरोप कोणी भाजपावाले वगैरे करत नाही आहेत. तर दस्तुरखुद्द बाबासाहेबांचे नातू बाळासाहेब अर्थात प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. समाजमाध्यमांवर त्यांनी एक यांना समजेल अशा त्यांच्याच भाषेत मार्मिक पोस्ट लिहिली असून, त्याला साजेसं चित्र देखील पोस्ट केलं आहे. यात काय म्हटलं आहे त्यांनी. ‘‘संजय, किती खोटं बोलशील!’’ तसं यावेळी पोस्टमध्ये त्यांनी संजय राऊतला पहिल्यांदाच खोटारडा म्हटलेलं नाही. यापूर्वी दोनतीन वेळा राऊतांनी खोटं बोलणं बंद करावं, असा इशारा आंबेडकरांनी दिला होता. खोटं बोलणं बंद करा, असं आंबेडकरांनी सांगणे म्हणजे राऊत खोटारडे आहेत आणि ते नेहमी खोटं बोलतात, असाच त्याचा अर्थ निघतो. आता आंबेडकरांनी म्हटलं म्हणजे राऊत खोटारडे आहेत, असे सिद्ध होत नाही, असे दाखले दिले जातीलही. मात्र, यावेळी सांगलीच्या जागा वाटपाचा तिढा सुटला असल्याचं राऊत खोटं बोलत असल्याचं म्हणणं काँग्रेसचं आहे.
 
 
 
LokSabha Elections  : तर, मुंबईतल्या जागावाटपाचा तिढा सुटला नसल्याचं शरद पवारांचं म्हणणं आहे. त्यामुळे शरद पवारांनीही एकप्रकारे राऊत खोटं बोलत असल्याचं सुचवलं आहे. आता काँग्रेसचे डझनभर नेते, शरद पवार गटाचे अर्धा डझन नेते आणि यांच्याशी असलेली युती तोडून, दगाफटका झाल्यानंतर काँग्रेसला आजही समर्थन देणारे प्रकाश आंबेडकर असे सर्वच्या सर्वच लोकं खोटं बोलत असावे आणि राऊत एकमेव राजा हरिश्चंद्राची औलाद असल्याने खरं बोलत असावे, असे समजाण्याइतकी महाराष्ट्रातील जनता मूर्ख नाही. तसंही पहिले भाजपाला छळलं, मुंबईकरांना छळलं, नंतर भाजपाला सोडलं, मुंबईकरांनादेखील वार्‍यावर सोडलं, हिंदुत्वाला सोडलं, दलितांच्या देवाच्या नातवाला छळलं, अपमान केला. आता अल्पसंख्यकांना मूर्ख बनिवण्याचा प्रयत्नात आहेत. पण ‘ये पब्लिक हे, सब जानती है...!’ जे होते ते चांगल्यासाठी म्हणतात ना ते खरंच आहे. कारण, भाजपासोबत युती तुटली नसती. उद्धव ठाकरे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेले नसते. तर, यांचा खरा चेहरा कधीच उघडा पडला नसता. आणि हे सतत महाराष्ट्राला भावनिक मुद्दे समोर करून मूर्ख बनवत राहिले असते. तसेही यांच्यावर महाराष्ट्राने कधी फार विश्वास टाकला नाहीच. तरीदेखील काही भागात ते लोकांना फूस लावण्यात यशस्वी झालेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, या काळातील काळूबाळूच्या जोडीचे राजकारण आणि विचार महाराष्ट्रातील जनतेने बघितल्यानंतर आंधळा विश्वास टाकलेल्या लोकांचे डोळे आता यानिमित्ताने उघडले असतील, यात शंका नाही. 
 
- 9270333886