जेणें वाढे अपकीर्ती। सर्वार्थी तें वर्जावें॥

    दिनांक :31-Mar-2024
Total Views |
तुका आकाशाएवढा
 
Saint Tukaram Maharaj : मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर त्याने त्याचे चांगले जीवन जगण्याचा आनंद कसा घ्यावा. सुख-समृद्धी कशी वाढवावी आणि हे सर्व करीत असताना इतरेजनांना त्याचा त्रास होऊ नये याकरिता काय करावे? मनाची शुद्धता कशासाठी ठेवावी. आपलं आचरण, नीती या संदर्भात महाराजांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून समाजाला सखोल असे मार्गदर्शन केले आहे. सदैव समाजाचा सुविचार करीत समाजमनाला कुविचारापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढंच काय, त्यांनी कमीत कमी शब्द, परंतु महान अर्थ असलेल्या अभंगाची रचना करून योग्य अशा शब्दात समजाविण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वांकडे समानतेच्या द़ृष्टीने पाहात होते. त्या माणसाचे ते गुण आहेत की अवगुण हे पाहात होते. जात पाहात नव्हते. यावरून त्यांच्या मनाची विशालता व मानवता लक्षात घेण्यासारखी आहे. जीवनात कार्य करीत असताना ते कसे करावे, त्याची काय आवश्यकता आहे. ते कशाकरिता लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. त्याचा खरोखर काय हेतू आहे. तो योग्य की अयोग्य हे पाहणे गरजेचे आहे.
 
 
tukaram-maharaj
 
आज आपण अनेक व्यवसाय करतो. तो नीतीने केल्यास आपलंच नव्हे तर आपल्या कुटुंबाचं, समाजाचं संपूर्ण जीवन आनंंदात जातं. याकरिता संतांनी अनेक वेळोवेळी आपणास उपदेश केलेला आहे. जे लोक संतांच्या उपदेशानुसार वागतात तेच आयुष्यात अधिकाधिक यशस्वी होताना दिसतात. ही बाब आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. याच संदर्भात चाकरी म्हणजेच दुसर्‍याकडे आपण नोकरी करीत असल्यास ती कशी करावी. त्यामध्ये प्रामाणिकता असावी याबाबत सविस्तरपणे संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून प्रबोधन केलेले आहे. महाराजांच्या काळात उत्तम शेती, मध्यम व्यवसाय, कनिष्ठ नोकरी असे होते. आज वेगळीच परिस्थिती आपल्या डोळ्यांसमोर दिसते. ती अशी की, उत्तम नोकरी, मध्यम व्यवसाय, कनिष्ठ शेती. वास्तविक पाहता जगाचा पोशिंदा म्हणून शेतकर्‍याकडे पाहिलं जातं. मग त्याच्या या अवस्थेस कोण जबाबदार आहे? या प्रश्नाचं उत्तर शोधणं आवश्यक आहे. शेतकर्‍याची अशी बिकट परिस्थिती वर्तमानातील आहे तसेच बाकी व्यवसायातसुद्धा कमी-जास्त स्वरूपात अशीच आहे. अशा या स्थितीत आपणास सामोरे जावे लागेल हे जगद्गुरू Saint Tukaram Maharaj संत तुकाराम महाराजांना आधीच समजले होते. एवढंच काय तर त्यांची वागणूक काय राहील किंवा कशी राहील हे माहीत होते म्हणूनच नोकराचे वर्तन कसे असावे याबाबत त्यांनी आपणास प्रबोधन केले आहे. आपण पाहतच आहोत की, जागोजागी भ्रष्टाचार वाढलेला आहे. भ्रष्टाचार हाच शिष्टाचार होत असल्या कारणामुळे समाजस्वास्थ बिघडत चाललेलं आहे; नव्हे बिघडलेलं आहे. गमतीची गोष्ट अशी की, हा वाढता भ्रष्टाचार कुठेतरी थांबावा असे सर्वांनाच वाटते. परंतु पाहिजे त्या प्रमाणत तो काही कमी होताना दिसत नाही. तर, असे का होते तर त्याचं उत्तर साधं व सोपं आहे; ते असे की, मी काही केले तर चालेल, परंतु दुसर्‍याने मात्र चांगले वागावे. ही प्रवृत्ती जास्त प्रमाणात आढळते. वास्तविक पाहता भ्रष्टाचार दूर करायचा असेल तर त्याची स्वत:पासून सुरुवात करावी लागते तेव्हा कुठं भ्रष्टाचार मुक्त जीवन आपण जगू शकतो. तेव्हा कुठं प्रामाणिक श्रमाचे मोल आपण समजू शकतो.
 
 
माणसानं जीवन जगत असताना आपल्या ध्येय प्राप्तीकरिता प्रयत्न जरूर करावे. त्याशिवाय प्रगती शक्यच नाही. प्रगती करावयाची असताना सावधानताही बाळगावी. जेणेकरून आपलं हित साधताना दुसर्‍याचे नुकसान होणार नाही याकडे लक्ष द्यावे. असे लक्षपूर्वक कार्य केल्यास आपली भरभराट होण्यास काही कालावधी लागत नाही. लक्षपूर्वक कार्य केल्यास आपल्याकडे इतरेजनाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. परिणाम मग असा होतो की, आपली आपोआप कीर्ती वाढते तसेच भविष्याच्या द़ृष्टीने अधिक रचनात्मक व कल्पनाशील, प्रगतिशील, सक्षमपणे कार्य पार पाडता येऊन आपली कार्यक्षमतेत वाढ होण्यास मदत होते. या सर्व बाबी आपण जाणीवपूर्वक लक्षात घेतल्यास असे दिसते येते की, ज्या गोष्टीमुळे अपकीर्ती वाढत असेल असे कोणतेही कार्य आपण करू नये; ते संपूर्णपणे टाळावे. केवळ टाळून चालणार नाही तर आपली अपकीर्ती होईल असे कार्य संपूर्ण आयुष्यातही करण्याचा मनातच काय तर स्वप्नातही कधीकाळी असा विचार आणू नये. तो पूर्णपणे सोडून द्यावा. अशा प्रकारचे जीवनोपयोगी मार्गदर्शन सकलजनास प्रस्तुत अभंगातून जगद्गुरू Saint Tukaram Maharaj संत तुकाराम महाराज करताना दिसतात. जगताना कोणतं वागणं टाळावं याबाबतचा मौलिक सल्ला देत असताना महाराज म्हणतात की,
जेणें वाढे अपकीर्ती। सर्वार्थी तें वर्जावें॥
सत्य रुचे भलेपण। वचन तें जगासी॥
होईजेतें दूर त्यागें। वाउगें तें सारावें॥
तुका म्हणे खोटें वर्म। निंद्यकर्म काळिमा॥
अ. क्र. 1351.
 
 
Saint Tukaram Maharaj : व्यवहार करताना तो खोटा नसावा. चुकीचा नसावा. दुसर्‍याची फसवणूक होईल असा व्यवहार करू नये. त्यामुळे जगाचा विश्वास तुमच्यावर राहणार नाही. आजही या विचाराची नितांत आवश्यकता आहे. कारण आपण रोज कुठल्या ना कुठल्या वर्तमानपत्रात फसविल्याच्या अनेक बातम्या सातत्याने वाचत असतो. विशेष बाब अशी की, फसविणारे आपल्या अगदी जवळचेच निघतात. याचा प्रत्यय आपल्यालाही आला असेल; ते म्हणजे आपणास असत्य सांगून फसवणूक झाल्याचे लक्षात आले असेल. त्यामुळे आपण दु:खी होतो. एकदा का आपले असत्य लक्षात आले तर शेवटपर्यंत आपल्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नसतो. जसे एकच प्लॉट, एखाद्या भागातील जमीन, गुंतवणूक करण्याच्या बाबतीत, या व अशा अनेक गोष्टीचे अनेकांना केलेली फसवणूक आपण ऐकलेली, पाहिलेली, अनुभवलेली आहे. असे होऊ नये याकरिता महाराजांनी उत्तम व्यवहार करताना सत्य बोलून असे व्यवहार करावे याबाबत मार्गदर्शन केले आहे. असे चोख व्यवहार केल्यास आपला विश्वास वाढतो. चारचौघात आपली किंमत वाढते. कारण जगाला खरे बोलणे नेहमीच आवडते. शेवटी सत्याचाच विजय होतो. म्हणून आपले आचरण चांगले ठेवण्यासाठी सत्य बोलून ते कृतीत आणल्यास अधिक प्रभाव पडतो आणि असेच शुद्ध आचरण ठेवणार्‍यास जगात मान्यता मिळते. म्हणूनच सत्य बोलणार्‍या माणसांचाच आदर केला जात असतो. आपलं बोलणं सत्य असल्यामुळेच तेच जगाला आवडतं. तेच चांगलं असतं. खोटंं बोलणार्‍याच्या मागं सुरुवातीला काही लोक असतीलही, परंतु वर्तणूक लक्षात आली की, मग कुणीही सोबत नसतं. होतो तो त्याचा फक्त अनादरच! असत्य मार्गाने मिळविलेल्या मधून कधीही पूर्ण समाधान वा सुख कधीच प्राप्त होत नाही. होणार्‍या पश्चात्तापालाच त्याला सामोरे जावे लागते. म्हणूनच सत्य बोलणे. ते आचरणात आणणे हेच श्रेष्ठ ठरते. शेवटी वाईट वाईटच असते. सत्याच्याच मागे जग उभं राहते. म्हणून सत्य आचरणात आणावं. सत्य वचन आचरणात आणावं. त्यामुळे आपण सुखी व समाधानी जीवन जगू शकतो व इतरेजनासही सुखी व समाधानी ठेवू शकतो. याकरिता आपणास आपल्या वर्तनात सुधारणा करणे जरूरीचे आहे.
 
 
Saint Tukaram Maharaj : असत्य आहे ते सोडून द्यावे लागणार आहे. सत्याचा मार्ग निवडावा लागणार आहे. आपलं जे काही व्यक्तिमत्त्व असेल ते परिपूर्ण सत्याच्या सोबतीला घेऊन बनवावे. त्या आधारावरच आपण दूर व्हावे. दुरत्व प्राप्त करण्याकरिता आचरण शुद्ध ठेवावे लागेल. म्हणूनच महाराज अंत:करणाच्या शुद्धीवर सतत भर देताना दिसतात. नारळाच्या, फणसाच्या किंवा ऊसाच्या आतील रसाचे मोल जे असते तेच असते खरे सत्य. शिंदळी स्त्रीबाबत तिच्या भ्रष्ट वर्तनामुळे ‘आपण बुडती पति बुडविती। दोन्ही कुळे नेती अध:पात॥’ तसेच अशा स्त्रियांप्रमाणेच भ्रष्टाचारी अनाचारी माणसे कधीही सुखी किंवा समाधानी होत नाही.
 
 
न्याय, नीती, मनाची शुद्धता यावी यासाठी समाज मनाला उद्बोधन करताना संत तुकाराम महाराज म्हणतात की, ‘जेणे वाढें अपकीर्ती। सर्वार्थी ते वजावे॥’ अशा प्रकारे समाजातील दोषांवर प्रकाश टाकत समाजाला सन्मार्गाची दिशा दाखवत सत्याने चालल्यास त्याच आधारावर दूर होऊन ज्यामुळे अपकीर्ती होईल असे कर्म प्रत्येक माणसाने टाळावे. व्यर्थ आहे ते दूर करावे. शेवटी सत्याचा महिमा सांगताना Saint Tukaram Maharaj संत तुकाराम महाराज म्हणतात की, खोटे काम कधीही करू नये. असे काम करणार्‍याचा समाज निषेध करीत असतो. त्याचा आदर कुणीही करीत नाही. खोटे कार्य निंद्य असते. याआधी चांगले काम केले असल्यास त्याला काळिमा फासला जातो. त्यामुळे चांगली असलेली प्रतिमा मलिन होण्यास फार अवधी लागत नाही. नगराचे सगर अन् सगराचे नगर होण्यास काही कालावधी लागत नाही. म्हणून जे कर्म निषेधार्ह आहे त्याच्या वाट्याला कधीही जाऊ नये. असे केल्यास आपली बदनामी होऊ शकते. म्हणून अशा दुष्कृत्यापासून लांब राहावं; जेणेकरून आपल्या जीवनाला काळिमा कुणी फासणार नाही.
 
- प्रा. मधुकर वडोदे
- 9422200007