रविवार, 31 मार्च ते शनिवार, 6 एप्रिल 2024

    दिनांक :31-Mar-2024
Total Views |
साप्ताहिक राशिभविष्य 
 
 
saptahik rashi bhavishya
 
मेष (Aries) : यशासाठी मेहनत घ्यावी लागेल
Weekly Horoscope : हा आठवडा आपणास सामान्य जाण्याचे संकेत आहेत. सप्ताहारंभीच्या काही ग्रहयोगामुळे आपणास प्रत्येकच कामात सफलतेसाठी बरीच मेहनत घ्यावी लागेल, असे दिसते. काही कामात विशेषतः सरकारी कामात कमालीचा विलंब लागू शकतो. परंतु धीर न सोडता प्रयत्न सुरू ठेवल्यास अंतिमतः यश आपल्याच पदरी पडणार आहे, याची खात्री बाळगता येईल. काही मंडळींना आरोग्यविषयक काही कुरबुरीची शक्यता आहे. त्यामुळे पथ्यपाणी व्यवस्थित सांभाळून योग्य काळजी घेतली पाहिजे. या सप्ताहात आपली आर्थिक स्थिती उत्तम राहणार आहे.
शुभ दिनांक - 31, 2, 3, 5.
 
 
वृषभ (Taurus) : सढळ हाताने खर्च होणार
या आठवड्याच्या प्रारंभी लाभलेली ग्रहस्थिती पाहता हा सप्ताह आपणास बव्हंशी खर्चिक जाण्याची शक्यता आहे. हा खर्च आपणच स्वतःवर ओढवून घेतलेला राहील असे वाटते. सढळ हाताने खर्च करण्याची आपली सवय बळावेल. सरकारी किंवा अन्यही क्षेत्रातील अडलेली कामे पूर्णत्वास जातील. आठवड्याच्या अखेरीस आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. अडलेला पैसा परत मिळेल. एखादी मोठी संधी, मोठा करार-व्यवहार संभवतो. व्यवसायातील अडचणी दूर होतील. मोठे व्यवहार घडून अपेक्षित लाभ संभवतो.
शुभ दिनांक - 1, 3, 4, 5.
 
 
मिथुन (Gemini) : धीम्या गतीने वाटचाल सुरू
Weekly Horoscope : या आठवड्याच्या सुरुवातीला लाभलेले ग्रहमान पाहता आपल्या कर्मस्थानातील अस्वस्थता, काहीसे नैराश्य, कार्यालयीन कामातील विलंब काहीसा वाढून दगदग आणि एवढे करूनही हाती काही न लागण्याची स्थिती राहण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी ही स्थिती निश्चितच बदलेल. पण सुरुवातीची वाटचाल धीम्या गतीने राहील. मात्र ही वाटचाल सकारात्मकतेच्या दिशेने राहील ही समाधानाची बाजू. आर्थिकदृष्ट्या हा काळ काहीसा अधिक खर्च करायला लावू शकतो; मात्र तो आपणांस त्याचा आनंदही देईल.
शुभ दिनांक - 2, 3, 5, 6.
 
 
कर्क (Cancer) : मोठे निर्णय घेताना सावध
या आठवड्याच्या सुरुवातीला लाभलेली ग्रहस्थिती सध्याच्या वातावरणात फारशी अनुकूल नाही, असे म्हणावे लागेल. या आठवड्याच्या पूर्वार्धात आपणास कोणतेही मोठे निर्णय घेताना पुरेपूर सावधगिरी बाळगायला हवी. आर्थिक फसवणूक, दिशाभूल करण्याचे प्रयत्न होतील. त्यांना बळी पडू नका. कोणावरही, विशेषतः आर्थिक व्यवहारात अज्ञात व्यक्तीवर विसंबून राहणे, दुसर्‍यावर विश्वास टाकणे धोक्याचे राहील. व्यवसायात असलेल्या मंडळींनी जरा जपून पावले उचलावीत. नवे उपक्रम हाती घेणार असाल तर थोडे थांबा. परिस्थितीचा अंदाज घेऊनच पुढे पाऊल टाकावे.
शुभ दिनांक - 31, 4, 5, 6.
 
 
सिंह (Leo) : कामे पूर्ण होण्यास विलंब
Weekly Horoscope :  या आठवड्याच्या सुरुवातीला लाभलेले ग्रहमान पाहता आपणास हा सप्ताह व पुढचे काही दिवस काहीसे संघर्षमय जाण्याची शक्यता आहे. लहानशा कामातही यशासाठी आपणास बराच प्रयत्न करावा लागू शकतो. कामेही विलंबाने पूर्णत्वास जातील. खरे तर या काळात आपणास स्वतःकडे लक्ष देण्याची गरज आहे. आरोग्यासंबंधात काळजी घ्यावी लागेल. पोटाचे त्रास, कमरेचे त्रास, स्पॉन्डिलायटिसचा त्रास असणार्‍यांनी काळजी घेणे जरूरी आहे. सध्याचे ग्रहमान एकूणच तापदायक आहे. कुटुंबातही सामंजस्य राखावे लागेल.
शुभ दिनांक - 1, 2, 4, 6.
 
 
कन्या (Virgo) : अचानक आर्थिक लाभ संभव
एकंदरीत ग्रहमान पाहता या आठवड्याचा पूर्वार्ध आपणास अधिक उत्तम जाणार आहे. या तुलनेने उत्तरार्धात मात्र आपणास काही त्रास, मनस्ताप यांचा सामना करावा लागू शकतो. या दरम्यान आपणास काही अचानक लाभ होण्याचीदेखील शक्यता आहे. नोकरीत असणार्‍यांना चांगले इन्सेंटिव्ह, वेतन वाढ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात असलेल्यांना नवे उपक्रम सुरू करता येतील. नव्या व्यवसायात किंवा नव्या क्षेत्रात पदार्पण करता येऊ शकेल. आर्थिक घडी मजबूत होईल. उत्पन्नाचे नवे स्रोत उपलब्ध होऊ शकतील.
शुभ दिनांक - 31, 2, 3, 4.
 
 
तूळ (Libra) : कार्यात यश देणारा सप्ताह
Weekly Horoscope :  हा आठवडा आपणास प्रामुख्याने सकारात्मक आणि हाती घेतलेल्या कार्यात यश देणारा ठरावा. या सप्ताहाच्या प्रारंभीच या राशीच्या अनेकमंडळींची योजलेली कामे होताना दिसू लागतील. विवाहेच्छू युवक-युवतींना विवाहाचे उत्तम योग लाभू शकतील. नोकरी- व्यवसायासाठी देखील हे ग्रहमान या राशीच्या मंडळींना अतिशय उत्तम असणार आहे. निश्चित योजना आखून व्यावसायिक पावले उचलली तर ती भरपूर फायदा देऊ शकतील. सप्ताहाच्या उत्तरार्धात काहींना आरोग्याची काळजी घेणे आवश्यक राहील.
शुभ दिनांक - 2, 3, 4, 5.
 
 
वृश्चिक (Scorpio) : परिस्थितीशी झुंजतच मार्ग
या आठवड्याच्या सुरुवातीला लाभलेली ग्रहस्थिती पाहता या सप्ताहात आपणास प्राप्त परिस्थितीशी मिळवून घेत किंवा झुंज देत मार्ग काढावा लागणार आहे. दगदग व धावपळ वाढेल. गुप्त शत्रूंच्या कारवाया नोकरी व व्यवसायात आपल्या मार्गात काही अडचणी निर्माण करू शकतात. प्रतिठा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल. आर्थिक अंदाजपत्रक काहीसे बिघडू शकते. किंबहुना आपण काहीशा आर्थिक अडचणीत सापडू शकता. काही आकस्मिक खर्च मनस्ताप देतील. आर्थिक व्यवहार पूर्ण सावधगिरीने करावेत. कोणावरही विसंबून राहू नये.
शुभ दिनांक - 1, 4, 5, 6.
 
 
धनु (Sagittarius) : कार्यक्षेत्रात संमिश्र स्थिती
Weekly Horoscope :  हा आठवडा व्यावसायिक आणि कार्यक्षेत्रात चढ-उताराची स्थिती दर्शवीत आहे. त्याचप्रमाणे या सप्ताहात लाभलेले ग्रहमान आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी फारसे चांगले नाही. अतिशय व्यग्रता, काही महत्त्वाच्या निर्णयाच्या प्रसंगी दोलायमान स्थिती, एखाद्याच्या सांगण्यावरून विचार न करता भूमिका ठरवणे वगैरे अघटित या काळात आपल्या बाबतीत घडू शकते. ज्येष्ठांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल. करायला जावे एक आणि व्हावे विपरीत असा अनुभव येण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत संमिश्र स्थिती कायम राहील.
शुभ दिनांक - 2, 3, 4, 6.
 
 
मकर (Capricorn) : कार्यक्षेत्रात गाफील राहू नका
या आठवड्याच्या सुरुवातीला लाभलेली ग्रहस्थिती ही आपली जणू परीक्षा पाहात आहे, असे दिसते. आपल्या पूर्वरचित कामगिरीवर काहीसे पाणी फेरण्याचे काम हे ग्रहयोग करणार आहेत. त्यामुळे गाफील राहणे, स्वप्न रंजनात रममाण होणे आपणास व्यावसायिकदृष्ट्या परवडणारे नाही. महत्त्वाच्या कामांमध्ये अडचणी येणे, काम पूर्णत्वास न जाणे किंवा ऐनवेळेवर काम फिसकटून पदरी अपयश पडणे असे सध्या घडत असावे. त्यामुळे काही व्यावहारिक व धोरणात्मक भूमिका अंगीकारणे आवश्यक ठरेल. आर्थिक आघाडीवर अस्वस्थता राहील.
शुभ दिनांक - 31, 3, 4, 5.
 
 
कुंभ (Aquarius) : छुप्या शत्रूंपासून सावध राहा
Weekly Horoscope :  या आठवड्याच्या प्रारंभी लाभलेली ग्रहस्थिती ही बरीच संमिश्र स्वरूपाची असल्याचे दिसते. सुरुवातीस काही चांगले तर उत्तरार्धात प्रामुख्याने विलंबकारी अनुभव येऊ लागतील. काही कुटुंबात या आठवड्यात संततीसंबंधात काही सुखवर्धक व प्रगतिकारक योग लाभू शकतात. सामाजिक व राजकीय आघाडीवर आपली विशेष प्रतिमा निर्माण होऊ शकते. आपल्या कार्याची योग्य दखल घेतली जाईल. त्याचे कौतुक होईल. महत्त्वाची कामे करताना ती स्वतःच्या निगराणी खालीच पूर्णत्वास न्यावी. छुपे शत्रू कोणत्या क्षणी दगा देतील याचा नेम नाही.
शुभ दिनांक - 31, 2, 3, 5.
 
 
मीन (Pisces) : आपसातील नाराजी टाळायला हवी
Weekly Horoscope :  या आठवड्याच्या प्रारंभी लाभलेली ग्रहस्थिती पाहता या सप्ताहात बव्हंशी विपरीत स्थितीत आपण सापडला आहात, असा अनुभव येऊ शकतो. साडेसातीचा पहिला टप्पा आपणास सुरू आहे. त्यात सध्याचे योग पाहता सध्याचा काळ फारसा प्रसन्न असेल असे वाटत नाही. महत्त्वाची कामे पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्याला जोरकस प्रयत्न करावे लागतील. याची मानसिक तयारी ठेवावी लागेल. कुटुंबात मतभेद, भाऊबंदकीची प्रकरणे, आपसातील नाराजी या काळात प्रकर्षाने जाणवेल. आपली प्रतिष्ठा जपावयास पाहिजे. आर्थिक आघाडीवर धीम्या गतीने सुधाराचे योग आहेत.
शुभ दिनांक - 1, 3, 5, 6.
 
- मिलिन्द माधव ठेंगडी/ज्योतिष शास्त्री, 8600105746