वणी,
जगाच्या अर्थकारणात 1820 पर्यंत भारताचा मोलाचा वाटा होता. इंग्रजांनी या देशातील ही अफाट संपत्ती लुटून नेली. मात्र आज त्या इंग्रजी सत्तेची अवस्था केविलवाणी झाली आहे. औद्योगिक क्रांतीची सुरुवात करणार्या देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. अर्थ आणि काम यांच्या मागे लागलेल्या अमेरिकेसारख्या देशातील युवक निराश उद्विग्न आहे. युरोपची अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी भारतीय बुद्धिवंतांना आवाहन केले जात आहे. भारताने अर्थ आणि काम या दोन्ही गोष्टी धर्माधिष्ठित असायला हव्यात यावर भर दिला. महाभारताच्या सभापर्वत विदुरनीतीत आलेल्या अर्थचिंतनाच्या आधारेच जगाचे आर्थिक प्रश्न सुटू शकतात आणि भारत आर्थिक महासत्ता बनू शकते. असे विचार गोंडवना विद्यापीठ गडचिरोलीचे कुलगुरू Dr. Prashant Bokare डॉ. प्रशांत बोकारे यांनी व्यक्त केले. शिक्षण प्रसारक मंडळ वणी संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयात आयोजित प्राचार्य राम शेवाळकर स्मृती व्याख्यानात ते ‘महाभारतातील अर्थकारण’ या विषयावर बोलत होते.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार, सचिव सुभाष देशमुख, सहसचिव अशोक सोनटक्के, संचालक उमापती कुचनकार, सुरेश शुक्ल, अनिल जयस्वाल, नरेश मुणोत, प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे उपस्थित होते. प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी व्याख्यानमालेच्या इतिहासाला उजाळा दिला. आपल्या अत्यंत अभ्यासपूर्ण विषयात महाभारतातील विविध श्लोकांचा संदर्भ घेत Dr. Prashant Bokare डॉ. प्रशांत बोकारे यांनी यज्ञ, दान व उदरभरणासाठी पुरेसे धन आहे का, या प्रश्नातच पैशाकडे पाहण्याची भारतीय भूमिका समजून घेता येते असे म्हणत, तू धनाच्या लोभात पडून कामोपासना तर करीत नाहीस ना ? या प्रश्नातून भारतीय जीवन दर्शन प्रगट होते हे अधोरेखित केले. आर्य चाणक्य, धनानंद, चंद्रगुप्त, बिंबिसार अशा विविध व्यक्तिमत्त्वांच्या जीवनाचा परामर्श घेत त्यांनी आपल्या विषयाचे प्रतिपादन केले. अध्यक्षीय मनोगतात विजय मुकेवार यांनी भारतीय चिंतनाच्या आधारे भारत कसा आर्थिक महासत्ता होऊ शकतो हे विशद केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. मनोज जंत्रे यांनी केले. तर आभारप्रदर्शन अशोक सोनटक्के यांनी केले. लोकमान्य टिळक महाविद्यालय, औषधी निर्माणशास्त्र विभाग व शिक्षण प्रसारक विद्यालयाच्या शिक्षक व कर्मचार्यांसह वणीतील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.