तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
Bharat Vidyalaya : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानात नवरगाव येथील भारत विद्यालयाने जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार पटकावला आहे.
विद्यार्थी, शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी यांच्यात शाळेविषयी सकारात्मक आणि आपुलकीची भावना निर्माण व्हावे, तसेच विद्यार्थ्यांना शिकताना प्रेरणादायी वातावरणाची निर्मिती व्हावी, यासाठी हे विशेष अभिमान राबविण्यात आले. या अभियानात जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद व खासगी शाळा सहभागी झाल्या होत्या. त्यातील नवरगाव येथील भारत विद्यालयाने अव्वल स्थान प्राप्त केले. ही शाळा 1950 साली स्थापन झाली असून, पुढील वर्षात शाळा अमृत वर्षात पदार्पण करीत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात क्रमांक एकची शाळा म्हणून भारत विद्यालयाचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.
या यशाबद्दल भारतीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंतराव बोरकर, सचिव सदानंद बोरकर यांनी मुख्याध्यापिका शैवाली वैद्य आणि सर्व शिक्षक तथा विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.