नागपूर,
Ashok Kolhatkar नागपूर महानगर पालिकेचे माजी जनसंपर्क अधिकारी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे ज्येष्ठ संचालक अशोक कोल्हटकर यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण, दलितमित्र पुरस्कार जाहीर करण्यात आला. समाजकार्य, पत्रकारिता, साहित्य, धर्म, विद्यार्थी क्षेत्र व विविध चळवळीत उल्लेेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. समता जेसिसचे सचिव व रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून देखील ते काम पाहात आहेत.
अशोक कोल्हटकर यांना यापूर्वी दलित साहित्य अकादमी नवी दिल्लीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, उत्कृष्ट जनसंपर्क अधिकारी पुरस्कार, संविधान फाऊंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान सन्मान पुरस्कार, समता सैनिक दलातर्फे समता योद्धा पुरस्कार, रिपब्लिकन मित्र पुरस्कार, महात्मा जोतिबा फुले समता पुरस्काराने देखील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.Ashok Kolhatkar गेल्या २८ वर्षांपासून ते पवित्र दीक्षा भूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनी भाविकांना निःशुल्क पाणीवाटप, औषध वितरण, अल्पाहार, शैक्षणिक साहित्य वितरित करीत आहेत. मनपाचे जनसंपर्क अधिकारी असताना सर्व कार्यालयात संविधान प्रास्ताविक फ्रेम लावण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी बेझनबाग हर्षवर्धन बुद्ध विहार येथे संविधान प्रास्ताविक शिलालेख व संविधान पार्क तयार करण्यात पुढाकार घेतला. या सर्व कार्याची दखल घेऊन शासनाने त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल हितचिंतक व मित्र परिवाराने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
सौजन्य:अशोक कोल्हटकर, संपर्क मित्र