दत्तात्रेय काळे
उमरखेड,
Mobile Addiction : पूर्वी खेळले जाणारे मैदानी आणि बैठेही खेळ आज मोबाईलमुळे लोप पावत चालले आहेत. मोबाईलच्या या डिजिटल युगात मुलांच्या सर्वांगीण विकासात खेळाला अधिक महत्त्व आहे. विविध खेळांमुळे विद्याथ्र्यांची योग्य वयातच शारीरिक वाढ होते. तसेच वैयक्तिक व सांघिक खेळामुळे व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्व, निर्णयक्षमता, चातुर्य व सांघिक वृत्तीतही वाढ होण्यास मदत होते.
मात्र, काही वर्षांपासून मुले मैदानी खेळाऐवजी मोबाईलच्या जाळ्यात अडकत आहेत. विटीदांडू, गोट्या, भोवरा, आंधळी कोशिंबीर, लगोरी, कबड्डी, खो-खो यांसारखे खेळ नामशेष होत चालले आहेत. म्हणून वाटते, ‘मैदाने पडली ओस आणखी किती दिवस चालेल मोबाईलचा जोश..'
काही वर्षांपूर्वी उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या की, मुलांमध्ये आनंदाचे वातावरण असायचे. मोबाईलचा संबंधच नसलेली ही पिढी मैदानी खेळात रंगताना दिसत होती. विविध खेळ खेळण्यात जणू दिवसच कमी पडायचा. जुने खेळ खेळण्यासाठी पैसे खर्च करून साधनांचीही गरज नव्हती. उन्हाळा आला की, हे खेळ मोठ्या प्रमाणात खेळले जात. सध्या गोट्या, विटीदांडू या ग्रामीण खेळांची ‘क्रेझ' लोप पावत आहे.
आधुनिक काळातील मुले जुने खेळ विसरत चालले आहेत. नवनवीन, बौद्धिक खेळ खेळण्याकडे मुलांचा मोठा ओढा असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. परंतु, मराठी मातीतील अस्सल, ग्रामीण भागातील विविध खेळ शरीराला तंदुरुस्त ठेवणारे होते. परंतु, कालौघात मुले मैदानी खेळांऐवजी मोबाईलकडे आकर्षित होत असल्याचे चित्र आहे.
मोबाईलच्या व्यसनाने वाढली डोकेदुखी
शहरासह ग्रामीण भागातही मुलांना आज मोबाइलचे व्यसन जडले आहे. मोबाईल येण्याआधी मैदानी खेळात व्यस्त असलेली मुले आज मोबाईलमध्ये घुसून असल्याचे दिसून येतात. सततच्या मोबाइल वापरामुळे मुलांच्या पालकांची डोकेदुखी वाढली आहे. मुलांना मोबाइलपासून दूर ठेवणे, हे पालकांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.
खेळांच्या जागी मोबाईल
आता मैदानी खेळांची जागा व्हिडिओ गेम, मोबाईल व टीव्हीसारख्या वस्तूंनी घेतली आहे. प्रत्येक वयोगटातील मुले मैदानी खेळांपेक्षा त्याकडेच लक्ष देत आहेत. बाकीच्या खेळांपेक्षा विटीदांडू हा खेळ केव्हाच बाद झाला आहे. परंतु, मुलांना पूर्वीचे मैदानी खेळ समजावून सांगत त्यांना खेळांकडे आकृष्ट करणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून त्यांचे शारिरीक व मानसिक आरोग्य चांगले राहील.
आरोग्यावर विपरित परिणाम
सतत मोबाईलमुळे लहान वयातच मुलांना चष्मा लागत आहे. तसेच मैदानावरील खेळाकडे सातत्याने मुले दुर्लक्ष करत असल्याने, लहान वयातच मुलांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या गोष्टींकडे पालकांनी लक्ष देऊन मुलांना मैदानी खेळ खेळण्यास प्रवृत्त करावे, जेणेकरून मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होणार नाही.