दक्षिणेला वेदना देणारा काँग्रेसचा द़ृष्टिकोन

    दिनांक :12-Apr-2024
Total Views |
रोकठोक
- हितेश शंकर
Kachativu island : सध्या कच्चातिवू बेटाची सर्वत्र खूप चर्चा होत आहे. विशेषत: जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या रॅली व प्रचार सभांमधून तसेच संसदेतही याचा उल्लेख केला आहे. आताच हा मुद्दा का उपस्थित केला जात आहे, असे काही लोक म्हणत आहेत. वास्तविक, या मुद्याकडे लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात बघण्याची आवश्यकता नाही. हा राष्ट्रीय मुद्दा आहे. तसेच हा निर्णय बदलण्याची किंवा श्रीलंकेला अडचणीत आणण्याची कोणतीही स्थिती किंवा आग्रह नाही. उलट ‘कच्चातिवू’ हा एक असा संवेदनशील संदर्भ बिंदू आहे, जो आम्हाला राष्ट्रीय समस्यांकडे कसे पहावे हे सांगतो.
 
 
Shreelanka-Bet
 
Kachativu island : कच्चातिवू बेट हे एकेकाळी भारताचाच एक भाग होते, जे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1974 मध्ये श्रीलंकेला दिले होते. याच्याशी संबंधित आणखी एक घटना आहे. 10 मे 1961 रोजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू म्हणाले होते, ‘मी या छोट्याशा बेटाला अजिबात महत्त्व देत नाही आणि त्या बेटावरील आमचा दावा सोडण्यास मला अजिबात संकोच वाटणार नाही. हा मुद्दा अनिश्चित काळासाठी प्रलंबित राहणे आणि पुन्हा संसदेत मांडणे मला पसंत नाही’. प्रश्न त्या चिमुकल्या बेटाचा नाही, तर प्रचंड दुर्लक्षाने, उपेक्षेने भरलेल्या या अहंकारी शैलीचा आहे. तुम्ही लोकशाही देशात संसद आणि तिथल्या लोकांच्या मतांनुसार, जनभावनेनुसार बोलले तर ठीक आहे, पण लोकशाहीत एका व्यक्तीच्या आवडीनिवडीला काहीही अर्थ नसतो. नेहरूंच्या विधानात अहंकाराची भावना दिसून येते. स्वत:लाच सर्वोच्च समजणे हा एका परिवाराचा दृष्टिकोन असू शकतो. परंतु समाजाचा, एका लोकशाही देशाचा हा दृष्टिकोन कधीच असू शकत नाही.
 
 
Kachativu island : कच्चातिवू बेटाच्या मुद्यावर काँग्रेसने संपूर्ण देशाला अंधारात ठेवले. हे बेट श्रीलंकेकडे सोपवताना या क्षेत्राचे रोजगार किंवा धोरणात्मक दृष्टिकोनातून काय महत्त्व आहे हे पाहिले गेले नाही. बर्‍याचदा कोणत्याही देशासाठी कधी कधी एखादी लहानशी जागाही सामरिक अथवा धोरणात्मकदृष्ट्या खूप महत्त्वाची असते. या संदर्भात लक्षद्वीप, मिनिकॉय बेटशृंखला किंवा पश्चिमेकडील वेरावळचे उदाहरण घेता येईल. मत्स्यपालन, पर्यावरण संरक्षण इत्यादींच्या दृष्टिकोनातून ही अतिशय महत्त्वाची ठिकाणे आहेत. त्याचप्रमाणे कच्चातिवूची कथा आहे. रामेश्वरमजवळ जेव्हा मासे कमी प्रमाणात जाळ्यात अडकायचे तेव्हा मच्छीमार पुढे कच्चातिवूपर्यंत जायचे. तेथे मासे मुबलक प्रमाणात आहेत. आता अनेक वेळा मच्छीमार तेथे गेल्यावर त्यांना पकडण्यात येते. हे लक्षात घेऊन काही तडजोड वगैरे केली असती तर कदाचित आज अशी परिस्थिती उद्भवली नसती. काँग्रेस सरकारच्या या निर्णयाचे तामिळनाडूतील मच्छीमारांना आजही दु:ख आहे. या निर्णयाचे परिणाम आजही या मच्छीमारांना भोगावे लागत आहेत. हे बेट श्रीलंकेतील नेदुनथीवू आणि भारतातील रामेश्वरम यांच्या मध्ये आहे आणि याचा उपयोग पारंपरिकपणे दोन्ही बाजूचे मच्छीमार करीत होते.
 
 
आज मुद्दा कोणताही राष्ट्रीय निर्णय उलथून टाकण्याचा नाही, तर या प्रकरणात दाखवलेल्या राजकीय अदूरदर्शीपणाकडे लक्ष वेधण्याचा आहे. कच्चातिवू बेट श्रीलंकेकडे सोपविण्यासंदर्भात संसदेत कोणतीही चर्चा झाली नव्हती, ही वस्तुस्थिती आहे. याचा अर्थ ‘मी म्हणतो तेच बरोबर’ असाच होतो. म्हणजेच स्वत:ला सर्वांत चतुर, हुशार, बुद्धिमान आणि सर्वोच्च समजण्याची जी विचारसरणी नेहरूंची होती तीच विचारसरणी इंदिरा गांधींची देखील होती. कदाचित त्यामुळेच मच्छिमारांच्या पारंपरिक येण्याजाण्याचा मार्ग व रोजगाराला राजकारणाच्या माध्यमातून बाधा आणणारा हा मुद्दा आजही त्रस्त करतो. 1974 चे हे प्रकरण त्याच वर्षी संपुष्टात आले नाही. 1991 मध्ये तामिळनाडूच्या करुणानिधी सरकारने त्याविरोधात प्रस्ताव पारित केला होता. 1997 मध्ये जयललिता तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या. तेव्हा त्यांनी या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली होती. राष्ट्रीय स्तरावर निर्णय घेताना या बेटाबद्दलच्या जनभावना आणि लोकांना त्याविषयी वाटणारी जवळीक हे मुद्दे लक्षात घेण्यात आले नाहीत, हाच मुख्य मुद्दा आहे. कदाचित हे प्रकरण चर्चेतून सोडवता आले असते. परंतु घाईघाईने घेतलेल्या निर्णयामुळे श्रीलंका आणि तामिळनाडूच्या लोकांमध्ये तणाव निर्माण करणारा हा एक कायमचा मुद्दा बनला.
 
 
Kachativu island : सत्तेत असलेल्या कोणत्याही राजकीय पक्षाने हा विचार केला पाहिजे की जेव्हा ते कोणताही संवेदनशील राष्ट्रीय निर्णय घेतात तेव्हा व्यापक सहमती निर्माण करणे आवश्यक असते. तसे, दक्षिण भारताला वेदना देणार्‍या काँग्रेसच्या अदूरदर्शी विचारसरणीचे हे एकमेव उदाहरण नाही. जरा आठवून पहा. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे खासदार डीके सुरेश यांनी ‘दक्षिणेतील राज्यांसाठी वेगळा देश निर्माण झाला पाहिजे’ असे वादग्रस्त विधान केले होते. यामुळे संपूर्ण देशात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली होती. काँग्रेसविरोधी जनभावना अधिकच तीव्र होऊ लागली. प्रकरण अंगाशी येत असल्याचे पाहून काँग्रेस नेत्यांची पळापळ सुरू झाली. सुरेश यांनी उधळलेल्या या मुक्ताफळांमुळे पक्षाचे मोठे राजकीय नुकसान होऊ शकते, हे लक्षात घेऊन काँग्रेसने या विधानापासून स्वत:ला दूर ठेवले व ‘ते’ सुरेश यांचे व्यक्तिगत मत असल्याची सारवासारव केली. खरेतर या आक्षेपार्ह व फुटीरतावादी विधानानंतर काँग्रेसने त्या नेत्याविरुद्ध कठोर कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, काँग्रेसने तसे काहीच केले नाही.
 
 
प्रश्न असा आहे - एकीकडे राहुल गांधी भारत जोडो यात्रा काढतात तर दुसरीकडे त्यांचे नेते थेट भारत तोडणारी आणि उत्तर व दक्षिणेची फाळणी करणारी चिथावणीखोर विधाने करतात. मात्र, राहुल गांधी तोंडातून ब्र देखील काढत नाहीत. एवढेच नव्हे तर ते देखील या देशाला संघराज्य व्यवस्थेने बांधलेला राज्यांचा केवळ समूह मानतात. राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेसारख्या कोणत्याही गोष्टीवर त्यांचा विश्वास नाही. ब्रिटिशांची अशी विचारसरणी असेल, पण या देशाने ज्यांना निवडून दिले त्यांच्याकडून अशा विचारसरणीची मुळीच अपेक्षा नाही. ‘फोडा आणि राज्य करा’ या ब्रिटिशांच्या विचारसरणीनुसार मार्गक्रमण करण्याचे काँग्रेसला काय कारण आहे?
 
 
भारत एक देश होता, आहे आणि नेहमीच राहील. पण काँग्रेसला बहुधा असे वाटत नसावे. कारण हा पक्ष उत्तर व दक्षिण भारत दृष्टिकोनातून देशाकडे पाहतो. प्रत्येक राज्याच्या राजकारणाकडे वेगळ्या नजरेने पाहतो. हिंदुत्वाला छेद देत दक्षिण भारतात सत्ता मिळवण्याचा प्रयत्नही काँग्रेसने केला आहे. 2018 मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी काँग्रेसने वेगळी चाल खेळली होती. कर्नाटक सरकारने लिंगायत समाजाला वेगळ्या पंथाचा दर्जा देण्याचा विचार केला होता. त्या दृष्टीने हालचालीही सुरू झाल्या होत्या. मात्र, काँग्रेसच्या या निर्णयाला तेथे विरोध झाला. लिंगायत हे हिंदू धर्मापेक्षा वेगळे नाहीत, असे खुद्द कर्नाटकवासीय आणि लिंगायतांनी सांगितले होते. भारत नेहमीच एक राहिला आहे. अध्यात्माच्या अंगणात एक प्राचीन संस्कृती येथे विकसित झाली. सुदूर दक्षिण तामिळनाडूतील अपर्णा म्हणजेच पार्वतीच्या मंदिराकडे राजकीय मतभेदांच्या पलीकडे, भारतीय एकतेच्या दृष्टिकोनातून पहा, या देशाच्या आध्यात्मिक पायाच्या दृष्टिकोनातून पहा. कन्याकुमारी आणखी वेगळे काय आहे? अपर्णा अर्थात देवी पार्वती दक्षिणेत राहून सुदूर उत्तरेला असलेल्या कैलासपती म्हणजेच महादेवाची तपश्चर्या करते. उत्तर-दक्षिणेत शिव परिवाराची पूजा केली जाते. आध्यात्मिक, सांस्कृतिकदृष्ट्या आमच्या पूर्वजांच्या माध्यमातून हा देश सुरुवातीपासूनच एक आहे. जर तुम्ही ब्रिटिशांच्या दृष्टिकोनातून या देशाकडे बघितले तर ब्रिटिशांप्रमाणेच तुमची गत होईल.
 
 
Kachativu island : सरस्वतीला काल्पनिक म्हणणारे, संस्कृत आणि तामिळ यांच्यातील नाते कृत्रिम म्हणणारे, आर्य-द्रविड सिद्धांत निर्माण करणारे जर या देशाच्या मुळाशी जोडले गेले असते, तर अहंकाराने इथल्या लोकांमध्ये फूट पाडणे आणि मनमानी निर्णय घेणे त्यांनी टाळले असते. त्यामुळेच कच्चातिवू हे केवळ एका बेटाचे नाव नसून मदमत्त राजकारण्यांनी या देशाला दिलेली वेदना आणि त्यातून मिळालेला धडा आहे.
(पांचजन्यवरून साभार)