धर्मरक्षणार्थ बलिदान देणारे श्रीगुरू तेग बहादूर

    दिनांक :12-Apr-2024
Total Views |
संघर्ष गाथा
- योगेश कुमार गोयल
Sriguru Tegh Bahadur : अमृतसर येथे दि. 1 एप्रिल 1621 रोजी माता नानकीच्या पोटी जन्मलेल्या गुरू तेग बहादूर यांचे बालपणीचे नाव ‘त्यागमल’ होते, ज्यांनी धर्म आणि आदर्शांचे रक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती दिली. वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी त्यांनी मोगलांविरुद्धच्या युद्धात वडिलांसोबत पराक्रम गाजविला. आपल्या पुत्राच्या या शौर्याने प्रभावित होऊन त्यांच्या वडिलांनी त्यांना ‘तेग बहादूर’ (तलवारीचा धनी) असे नाव दिले. शिखांचे आठवे गुरू हरिकृष्ण राय यांच्या अकाली मृत्यूनंतर गुरू तेग बहादूरजी यांना नववे गुरू बनवण्यात आले. ‘धर्माचा मार्ग हाच सत्याचा आणि विजयाचा मार्ग आहे’ हे त्यांच्या जीवनातील पहिले तत्त्वज्ञान होते. श्री गुरू तेग बहादूरजी नेहमी सत्याच्या मार्गावर चालणार्‍या लोकांमध्ये राहत होते. त्यांनी केवळ धर्माचेच रक्षण केले असे नाही तर देशात धार्मिक स्वातंत्र्याचा मार्गही मोकळा केला. हिंदू आणि काश्मिरी पंडितांना मदत करून धर्माचे रक्षण करताना त्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले.
 
 
Sriguru Tegh Bahadur
 
क्रूर मोगल बादशाह औरंगजेबाने श्री गुरू तेग बहादूर यांना हिंदूंना मदत केल्याबद्दल आणि इस्लाम धर्म न स्वीकारल्याबद्दल त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आणि त्यांचा शिरच्छेद केला होता. त्या जुलमी, क्रूर आणि धर्मांध मोगल बादशहाच्या धर्मविरोधी आणि वैचारिक स्वातंत्र्याची दडपशाही करण्याच्या धोरणाविरुद्ध गुरू तेग बहादूर यांचे बलिदान ही एक अभूतपूर्व ऐतिहासिक घटना होती. जागतिक इतिहासात धर्म आणि मानवीय मूल्ये, आदर्श आणि तत्त्वांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्‍यांमध्ये गुरू तेग बहादूर यांचे स्थान अनन्यसाधारण आहे आणि एक धर्मरक्षक म्हणून संपूर्ण जग त्यांचे महान बलिदान कधीही विसरू शकणार नाही.
 
 
Sriguru Tegh Bahadur : त्यावेळी भारतावर मोगल बादशहा औरंगजेबाचे राज्य होते. तो काळ असा होता जेव्हा कट्टरता, धर्मांधता आणि क्रूरतेने इस्लामचा प्रचार-प्रसार केला जात होता. सर्वत्र अन्याय, अत्याचार व दहशतीचे साम्राज्य होते आणि रक्ताचे पाट वाहून लोकांना धर्मांतर करण्यास भाग पाडले जात होते. सरकारी कामकाजात कोणत्याही उच्च पदावर हिंदूंची नियुक्ती करू नये आणि हिंदूंवर ‘जिझिया’ (कर) लादला जावा, असा आदेश औरंगजेबाने दिला. त्यानंतर सर्वत्र हिंदूंविरुद्ध अत्याचाराची मालिकाच सुरू झाली. अनेक मंदिरे पाडून तेथे मशिदी उभारण्यात आल्या आणि मंदिरांचे पुजारी व साधू-संतांची हत्या करण्यात आली. हिंदूंवरील सतत वाढत जाणारे भीषण अत्याचार आणि नवनवीन जाचक कर लादल्यामुळे भयभीत झालेल्या अनेक हिंदूंनी त्या काळात नाईलाजाने इस्लाम धर्म स्वीकारला, अर्थात त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले गेले. औरंगजेबाच्या अत्याचाराच्या काळात, काश्मीरचे काही पंडित मदतीच्या आशेने आणि विश्वासाने गुरू तेग बहादूर यांच्याकडे आले आणि त्यांच्यावर सुरू असलेल्या अत्याचाराची कहाणी गुरू तेगबहादूर यांना सांगितली. ‘एकतर मुसलमान धर्म स्वीकारणे अथवा मृत्यूला कवटाळणे’ हे केवळ दोनच पर्याय आमच्याकडे उरले आहेत असे या काश्मिरी हिंदूंनी त्यांना सांगितले. त्यांची पीडा, त्यांच्या वेदना ऐकून गुरुजींनी गुरू नानकांच्या ओळींचा वारंवार पुनरुच्चार केला. गुरू तेग बहादूर म्हणाले:-
जे तउ प्रेम खेलण का चाउ।
सिर धर तली गली मेरी आउ॥
इत मारग पैर धरो जै।
सिर दीजै कणि न कीजै॥
 
Sriguru Tegh Bahadur : ते म्हणाले की हे भय सरकारचे आहे, त्यांच्या शक्तीचे आहे, परंतु या बाह्य भीतीपेक्षा अधिक भीती आमच्या मनाची आहे, आमची आत्मिक शक्ती दुर्बल, कमकुवत झाली आहे, आमचे आत्मबल-आत्मविश्वास नष्ट झाला आहे आणि हे आत्मबळ प्राप्त केल्याशिवाय हा समाज भयमुक्त होणार नाही आणि भयमुक्त झाल्याशिवाय हा समाज अन्याय, अत्याचाराचा प्रतिकार करू शकणार नाही. ते म्हणाले, ‘सदैव आमच्याजवळ निवास करणारा परमात्माच आम्हाला एवढे बळ प्रदान करेल की आम्ही त्या बळावर निर्भय होऊन अन्याय, अत्याचारांचा प्रतिकार करू शकू. एका जीवाचे बलिदान अनेक जिवांना या मार्गावर आणेल’. लोकांना फार काही समजले नाही. तेव्हा त्यांनी विचारले की या परिस्थितीत आम्ही काय करावे? तेव्हा गुरू तेग बहादूर यांनी स्मित करीत सांगितले की तुम्ही सर्व जण बादशहाला सांगा की आमचा पीर तेग बहादूर आहे, जर तो मुसलमान झाला तर आम्ही सर्व जण इस्लाम स्वीकारू.
 
 
काश्मिरी पंडितांनी जेव्हा काश्मीरचा सुभेदार शेर अफगाण याच्यामार्फत औरंगजेबाला हा संदेश पाठविला तेव्हा औरंगजेब अतिशय खवळला. त्याने गुरू तेग बहादूर यांना दिल्लीला बोलावून त्यांचे परमप्रिय शिष्य मतिदास, दयालदास आणि सतीदास यांच्यासह कैद केले आणि तीनही शिष्यांना सांगितले की जर तुम्ही इस्लाम कबुल केला नाही तर तुमची हत्या केली जाईल. भाई मतिदास यांनी त्याला उत्तर दिले की, ‘शरीर नश्वर आहे आणि आत्मा अमर आहे. कुणीही या अविनाशी आत्म्याचा नाश करू शकत नाही.’ हे ऐकून औरंगजेबाने मतिदास यांना करवतीने कापण्याचा आदेश दिला. औरंगजेबाच्या आदेशावरून जल्लादांनी भाई मतिदास यांना दोन फळ्यांमध्ये बांधून त्यांच्या डोक्यावर एक करवत ठेवली आणि त्या करवतीने त्यांना चिरून टाकले आणि त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे केले. परंतु करवतीने कापले जात असतानाही अजिबात भयभीत न होता, विचलित न होता ते ‘श्री जपुजी साहिब’ चा पाठ करत राहिले. आता पुढची पाळी होती भाई दयालदास यांची. पण त्यांनीही इस्लाम स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिल्यानंतर क्रूर औरंगजेबाने त्यांना उकळत्या तेलाच्या कढईत टाकून ठार मारण्याची आज्ञा दिली. बादशहाच्या आज्ञेवरून सैनिकांनी त्यांचे हातपाय बांधून उकळत्या तेलाच्या कढईत फेकून त्यांना अतिशय वेदनादायी मृत्यू दिला. पण भाई दयालदासही आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत ‘श्री जपुजी साहिब’चा पाठ करीत राहिले. पुढे भाई सतीदासांची पाळी आली. परंतु त्यांनीही अतिशय निर्धारपूर्वक औरंगजेबाचे इस्लाम स्वीकारण्याचे फर्मान नाकारले. अखेर क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडून त्या क्रूर, अत्याचारी मोगल बादशहाने भाई सतीदासांना कापसात गुंडाळून जिवंत जाळण्याचा हुकूम दिला. भाई सतीदासांचे शरीर कापरासारखे जळू लागले पण त्यांनी त्या अवस्थेत देखील ‘श्री जपुजी साहिब’ चा पाठ सुरूच ठेवला.
 
 
Sriguru Tegh Bahadur : 22 नोव्हेंबर 1675 रोजी औरंगजेबाच्या आदेशावरून काझी गुरू तेग बहादूर यांना म्हणाला, ‘हिंदूंचे पीर (नेते)! तुमच्यासमोर केवळ तीनच मार्ग आहेत. पहिला, इस्लामचा स्वीकार करा, दुसरा चमत्कार दाखवा आणि तिसरा, मृत्यू पत्करण्यास तयार व्हा. तुम्हाला या तीन मार्गांपैकी एक निवडावा लागेल’. मोगल बादशहा औरंगजेबाच्या अन्याय, अत्याचारांपुढे मान न झुकवता गुरू तेग बहादूर यांनी धर्म आणि आदर्शांचे रक्षण करीत तिसरा मार्ग निवडला. क्रूर औरंगजेबाला हे कसे बरे सहन होणार होते? त्याने गुरू तेग बहादूर यांचा शिरच्छेद करण्याचा आदेश दिला. तो 24 नोव्हेंबरचा दिवस होता. चांदणी चौकातील मोकळ्या मैदानात एका विशाल वृक्षाखाली गुरू तेग बहादूर समाधीत लीन झाले होते. त्यावेळी औरंगजेबाचा जल्लाद जलालुद्दीन हातात तलवार घेऊन उभा होता. अखेर काझीने इशारा करताच त्या जल्लादाने गुरू तेग बहादूर यांचे शिर धडावेगळे केले. त्यानंतर सर्वत्र एकच आकांत उडाला. अशा प्रकारे प्राण गेला तरी स्वधर्माचा त्याग न करणार्‍या आणि इतरांना धर्मांतरापासून वाचवण्यासाठी गुरू तेग बहादूर आणि त्यांच्या तीन सर्वांत प्रिय शिष्यांनी हसत हसत आपल्या प्राणांची आहुती दिली.
 
 
धन्य आहेत भारताच्या पावन भूमीवर जन्म घेणारे आणि दुसर्‍यांच्या सेवेसाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे उदार मनाचे, शूर आणि निर्भय महापुरुष. हिंदुस्थान आणि हिंदू धर्माचे रक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती देणारे गुरू तेग बहादूर यांना तेव्हापासून ‘हिंद की चादर गुरू तेग बहादूर’ या नावाने ओळखले जाते. त्यांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. म्हणूनच त्यांना ‘हिंद की चादर’ म्हटले जाते.
(पांचजन्यवरून साभार)