कोणती फाईल उघडली... कोणती नस दाबली?

    दिनांक :13-Apr-2024
Total Views |
मुंबई वार्तापत्र
- नागेश दाचेवार
Mahavikas Aghadi : अजित पवार, प्रफुल्ल पटेल महायुतीत सामील झाले. अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडली अन् भाजपात प्रवेश केला. राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला. यांची कोणती फाईल उघडली... कोणती नस दाबली? असा सवाल आता महाविकास आघाडीचे नेते करू लागले आहेत. राज ठाकरेंच्या निमित्ताने विषय चर्चेत आला असला, तरी याठिकाणी एका गोष्टीचं नवल आहे. महाविकास आघाडीतला अर्थात विरोधी पक्षातील कोणताही नेता भाजपामध्ये प्रवेश केला की तो भ्रष्टाचारीच निघतो. बरं; हे विरोधकांचे राजकीय विरोधक असलेले सत्ताधारी नव्हे, तर खुद्द ज्यांचा नेता आहे, तेच लोक दाव्याने सांगतात. त्यामुळे येथे एक प्रश्न असा निर्माण होतो की, उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी आणि काँग्रेस पक्षाने किती भ्रष्ट नेते पोसून ठेवले आहेत की, यांचे पक्षच भ्रष्टाचार्‍यांचे माहेरघर आहे? कारण यांच्या पक्षाचे प्रमुखच भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. उद्धव ठाकरेंचे कोर्लईतील 19 बोगस बंगले, अनधिकृत जागा, मेहुणे श्रीधर पाटणकरांच्या जप्त झालेल्या 11 अनधिकृत सदनिका, मुंबई महापालिकेतील कोट्यवधींचा मनी ट्रेल, मातोश्री-2 च्या उभारणीत भ्रष्टाचार, कोविड सेंटर घोटाळ्यात, बॉडी बॅगसारख्या घोटाळ्यांत थेट ठाकरेंचे नाव येणे. सहकारी कारखान्यातील भ्रष्टाचारात पवार कुटुंबाचं म्हणजे शरद पवारांचं नाव येते. लवासामध्येदेखील यांचंच नाव आणि काँग्रेसचे तर मालक-मालकीण दोघेही भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील आरोपीच असून ते जामिनावर आहेत. त्यामुळे कदाचित पक्ष प्रमुखांच्या पावलावर पाऊल टाकून खालचे नेते-कार्यकर्ते कदाचित चालत असतील, असा निष्कर्ष निघाल्यास त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही.
 
 
Mahavikas Aghadi
 
Mahavikas Aghadi : संयुक्त शिवसेनेत एकूण 56 आमदार आणि 19 खासदार होते. एकनाथ शिंदेंसोबत 40 आमदार आणि 13 खासदार पक्ष सोडून गेले. यातील किती लोकांवर ईडीची कारवाई किंवा अन्य केंद्रीय यंत्रणांची कारवाई झालेली होती अथवा सुरू होती. प्रताप सरनाईकसारख्या दोन-चार लोकांवर कारवाई झालेलीही असेल, पण शहाजीबापू पाटलांसारख्या अत्यंत सामान्य आमदारांपासून 30-35 आमदारांवर तर ईडीची, सीबीआयची कुठलीही कारवाई झालेली नव्हती. बरं; या उठावाच्या नंतर जे लोकं उद्धव ठाकरेंना सोडून शिंदेंकडे गेले त्यापैकी किती लोकांवर ईडी, सीबीआयचा दबाव होता. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे, आमदार विप्लव बाजोरिया, मनीषा कायंदे, आमश्या पाडवी यांच्यावर कधी ईडी, सीबीआयची कारवाई झाली? याउलट संजय राऊत गुन्हे दाखल होऊन 10 महिने तुरुंगाची हवा खाऊन जामिनावर आहेत. अमोल कीर्तिकरांसारखे घोटाळ्याचा आरोप असलेले लोक अजूनही उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत. हे बघता खरे घोटाळेबाज ठाकरेंच्या सोबतच आहेत आणि याच घोटाळेबाजांना सोबत घेऊन निष्कलंक लोकांवर आरोप करण्याचा धंदा चालवलाय् ठाकरे टोळीने. स्वतः घोटाळेबाज आणि 54 आमदारांमध्ये 40 आमदार भ्रष्ट, 19 मधले 13 खासदार भ्रष्ट असतील तर यांच्या पक्षाच्या प्रमुखांपासून 90 टक्के लोक भ्रष्ट होते तर! म्हणजे आजवर भ्रष्ट, वसुलीबाज लोकांच्या जिवावर पक्ष चालवला. भ्रष्टांचे सरदार म्हणून वावरलात. म्हणून यांना लोक खंडणी गोळा करणारे म्हणत असावेत कदाचित. अशा भ्रष्ट लोकांना घेऊन ठाकरेंनी, मराठी माणूस आणि मुंबई, महाराष्ट्राच्या भावनांशी खेळून आपला पक्ष चालवणे म्हणजे ही एकप्रकारे फसवणूकच केली म्हणायची.
 
 
Mahavikas Aghadi : अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळांसारखे बोटावर मोजण्याइतके लोक सोडले तर 40 पैकी अन्य कुठल्या राष्ट्रवादीच्या आमदारावर ईडीची कारवाई झाली? हा ज्या अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल होऊन तुरुंगाची हवा खाऊन जामिनावर बाहेर आहेत, ते मात्र यांच्यासोबत आहेत. आणि, ते निर्दोष आहेत. त्यांच्यावर सूडभावनेतून कारवाई झालेली आहे. त्यावेळी अनिल देशमुख आणि अमोल कीर्तिकरांनी जर भाजपात प्रवेश केला तर लागलीच क्षणाचाही विलंब न करता ते भ्रष्ट नेते होतील... हा आहे यांच्या दोगल्या प्रवृत्तीचा गुणधर्म.
 
 
Mahavikas Aghadi : महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण हे एकमेव उदाहरण सोडले, तर अन्य कुठल्या काँग्रेसी नेत्यावर ईडी, सीबीआयची कारवाई झालेली आहे? आमदार राजू पारवे, माजी मंत्री बाबा सिद्दिकी, माजी खासदार मिलिंद देवरा, माजी खासदार संजय निरुपम, माजी आमदार अमर राजूरकर, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश सरचिटणीस राजू वाघमारे या लोकांवर कधी केंद्रीय यंत्रणांनी कारवाई केली? केंद्रीय यंत्रणांचे साधे नोटीस तरी या लोकांना मिळाले आहेत का? मग यांच्यावर कोणत्या ईडी-सीबीआयचा दबाव होता? आपल्या नेतृत्व क्षमतेवर कोणी बोट उचलू नये यासाठी निव्वळ आपल्या अपयशाचे, आपल्या नेतृत्वातील कमजोरीचे खापर दुसर्‍यावर फोडण्याचा हा प्रकार आहे. आपल्या सोयीने एखाद्याला भ्रष्ट आणि निर्दोष ठरविण्याचा यांचा धंदा आहे. अर्थात सोबत असतील तर एखादा जामिनावर असलेला आरोपीदेखील नुसता जामीन मिळाल्या मिळाल्या तो निर्दोष असतो, ‘सत्यमेव जयते’ असते आणि एखादा नेता ज्याला निव्वळ चौकशीचा नोटीस मिळाला असेल आणि तो दुसर्‍या पक्षाचा असेल किंवा यांना सोडून गेलेला असेल तर तो त्याच ठिकाणी दोषी ठरत असतो. ही आहे यांची दोगली आणि स्वार्थी नीती.
 
 
मुळात ईडी-सीबीआयसारख्या यंत्रणांचा केंद्र सरकार दुरुपयोग करीत असल्याचा डांगोरा पिटणार्‍या Mahavikas Aghadi महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केवळ तीन वर्षे सत्ता हातात दिली तर सरकारी यंत्रणांचा कसा दुरुपयोग केला, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. सरकारी वकील प्रवीण चव्हाणने भाजपा नेते गिरीश महाजनांना फसविण्याचे षडयंत्र कसे रचले होते. कसा गांजा टाकायचा, कसा चाकू प्लांट करायचा, याचे धडे पोलिसांना देऊन निर्दोष व्यक्तींना कसे अडकवायचे... हा सगळा प्रकार कोणत्या मोठ्या साहेबांच्या सांगण्यावरून वकील चव्हाण करीत होता, हे फडणवीसांनी विधिमंडळात पुराव्यानिशी सांगितले तेव्हा अवघ्या महाराष्ट्राने बघितले होते. त्यामुळे कसं असतं ना, चोराला दुसराही चोरच दिसतो. अशातला हा प्रकार आहे. त्यामुळे आपण जसं वागतो तसंच जग वागत असेल, असा अंदाज लावून हवेत गोळीबार करण्याचा मविआ नेत्यांचा प्रकार आहे. जनतेची दिशाभूल एकदा करता येते, वारंवार करता येत नाही. आता जनतेने दोगल्या भ्रष्ट, बदल्याच्या, सुडाच्या राजकारणाच्या नीतीला चांगल्याने ओळखले आणि बघितले असल्याने, 4 जूनला कोण भ्रष्ट आणि कोण एकनिष्ठ याचा निकाल लावतील, यात शंका नाही. 
 
- 9270333886