ईडीची फक्त 3 टक्के प्रकरणे राजकीय नेत्यांशी संबंधित : पंतप्रधान मोदी

    दिनांक :13-Apr-2024
Total Views |
नवी दिल्ली, 
ईडी ज्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करीत आहे, त्यापैकी केवळ 3 टक्के प्रकरणे नेत्यांशी संबंधित आहेत. उर्वरित 97 टक्के खटले अधिकारी आणि गुन्हेगारांविरुद्ध असल्याचे PM Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. एका हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान म्हणाले की, ईडीने 2014 पूर्वी केवळ 34 लाख रुपयांची रोकड जप्त केली होती, तर भाजपा सरकारच्या काळात 2,200 कोटी रुपयांहून अधिक रोकड जप्त करण्यात आली आहे.
 
 
pm modi dksl
 
मोदी म्हणाले, ज्यांच्यावर ईडीची टांगती तलवार आहे, ते आम्ही केवळ राजकीय भ्रष्टाचाराच्या विरोधात असल्याचा नरेटिव्ह पसरवत आहेत. ईडीने अनेक भ्रष्ट अधिकार्‍यांना अटक केली. अवैध फंडिंगशी संबंधित गुन्हेगार आणि ड्रग्ज विक्रेत्यांची हजारो कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांमध्येही आम्ही कारवाई करीत आहोत. देशातील जनतेला पहिल्यांदाच भाजपा मॉडेल आणि काँग्रेस मॉडेलची तुलना करण्याची संधी मिळाली आहे. या दोघांमधला फरक देशच नाही, तर जगाला दिसत आहे. ज्यांना भ्रष्ट व्यवस्थेत आपले फायदे दिसत आहेत, ते ईडीला विरोध करीत आहेत, असेही मोदी म्हणाले.
 
 
2014 पूर्वी ईडीने केवळ 5,000 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. गेल्या 10 वर्षांत ही रक्कम एक लाख कोटींहून अधिक झाली आहे. 2014 मध्ये सरकार स्थापन केल्यानंतर लगेच आम्ही भ्रष्टाचाराविरोधात पावले उचलली, असे सांगून PM Narendra Modi  मोदी म्हणाले की, आम्ही सेंट्रल रिक्रूटमेंटमध्ये ग्रुप सी आणि ग्रुप डीच्या मुलाखती पूर्ण केल्या. आम्ही अस्तित्वात नसलेल्या 10 कोटींहून अधिक बनावट लाभार्थींची नावे काढून टाकली. असे करून सरकारने 2 लाख 75 हजार कोटी रुपये चुकीच्या व्यक्तींच्या हातात जाण्यापासून वाचवले. या निवडणुकीबाबत मतदारांमध्ये उत्साह नसल्याचा समज असल्याचे मोदींना मुलाखतीत विचारण्यात आले. यावर तुम्ही काय सांगाल, तेव्हा मोदी म्हणाले, संथपणा निवडणुकीत नाही, तर विरोधकांमध्ये आहे. यावेळी पुन्हा रालोआचे सरकार स्थापन होणार, हे त्यांना माहीत आहे. निवडणुकीच्या प्रचारापासूनही ते टाळाटाळ करीत आहेत.