अकोला,
Patur Taluka-Damage Inspection : जिल्ह्यातील पातूर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतीचे भयंकर नुकसान केले आहे. तेथील शेतीच्या नुकसानीची पाहणी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी शुक्रवार 12 एप्रिल रोजी केली. नुकसानग्रस्तांना आवश्यक मदत मिळण्यासाठी पंचनाम्याची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकार्यांनी संबंधित अधिकार्यांना यावेळी दिले.
जिल्हाधिकार्यांनी पातूर तालुक्यातील अंबाशी, देऊळगाव, जांभरून आदी गावांमध्ये भेट देऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. पातूरचे तहसीलदार राहुल वानखडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.
परिसरात आंब्याची झाडे, लिंबू बगीचे, उन्हाळी भुईमूग, कांदा आदी विविध पिकांचे अवेळी पावसाने नुकसान झाल्याचे दिसून येते. त्याचे सर्व तपशीलासह काटेकोर पंचनामे करावेत.
एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिकार्यांनी यावेळी दिले. यावेळी त्यांनी परिसरातील शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.