प्रत्येक भावात राम

    दिनांक :14-Apr-2024
Total Views |
- मंगेश पाठक
Ramnavami festival : अलिकडेच देशाने दिवाळी नसतानाही दिवाळी साजरी केली. राम जन्मभूमीचा प्रश्न कायमचा मार्गी लागला आणि रामललाला आपल्या मूळ स्थानी सन्मानपूर्वक प्रतिष्ठापित करण्याचे अनेक वर्षांचे आणि अनेक पिढ्यांनी पाहिलेले स्वप्न साकार झाले. तेव्हापासून सुरू झालेला रामनामाचा गजर थांबलेला नाही आणि थांबणारही नाही. श्रीराम नवमीच्या निमित्ताने रामजप उच्चरवात सुरू आहे.
 
 
ram-lala1
 
रामाने आपल्या संपूर्ण जीवितकार्यात कळीकाळाला पुरून उरतील, अशी तत्त्वे स्थापित केली. आपल्या आचरणातून अनेक सिद्धांत मांडले. आदर्शाचे अनेक मापदंड या देवतेच्या प्रत्येक कृतीतून दिसतात. म्हणूनच भारतीय समाज अन्नाप्रमाणेच या मौलिक विचारांवर वाढला आणि पोसला आहे, असेही आपण म्हणू शकतो. प्रत्येक नातेसंबंधांमधली गुंफण म्हटली तर किती जटिल आणि म्हटली तर किती सोपी असते, हे रामचरित्रामध्ये स्पष्टपणे दिसते. स्वत: वनवास भोगूनही दुसर्‍याच्या मदतीसाठी सज्ज असणारा, स्वत: दु:ख, पत्नी आणि अपत्यांचा वियोग सहन करून जनतेच्या मनातील शंका मिटवणारा, पराजय राहून प्रजेला आश्वस्त करणारा हा राजा आजही समाजाच्या मनात अढळस्थान राखून आहे. म्हणूनच त्याने सांगितलेल्या आदर्शांचे पालन करण्याचा नियम करीत उत्साहाने रामनवमी साजरी करू या.
 
 
Ramnavami festival : दरवर्षी राम जन्माचा सोहळा म्हणजे आनंदाचा बहर असतो. मंदिरांमध्ये, घराघरांतून दुपारी बरोबर 12 वाजता राम जन्माचा सोहळा आनंदात पार पडतो. तो फारच प्रेक्षणीय असतो. विशेषत: स्त्रीवर्गात उत्साहाला उधाण आलेले असते. रंगीत भरजरी साड्या नेसून, आभूषणे मिरवत, केसांमध्ये गजरे माळलेल्या सर्व वयोगटातल्या स्त्रिया राम जन्माचा सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करतात. देवळात मध्यभागी रंगीत पाळणा सुवासिक, रंगीबेरंगी फुलांनी सजवलेला असतो. त्याची दोरीसुद्धा फुलांनी, झिरमिळ्यांनी वेढलेली असते. देवळातल्या रंगीबेरंगी पताका आणि खांबावर सोडलेल्या फुलांच्या माळांमुळे देवळातील मंगल वातावरणात भर पडते. बहुतेक ठिकाणी राम जन्माच्या तास-दोन तास आधी प्रभू रामचंद्रावर कीर्तन सुरू होते. त्यासोबत कौसल्या मातेच्या डोहाळ्यांवरची मधुर गाणी गायली जातात. राम जन्माची वेळ झाली की, दुपारी 12 वाजता, देवळात सजवलेल्या पाळण्यात प्रभू रामचंद्रांची मूर्ती ठेवली जाते. पाळण्याची दोरी हलक्या हातांनी मागे-पुढे करत, झोके देत रामजन्माची गाणी म्हणतात! ‘राम जन्मला गं सखी, राम जन्मला’ हे राम जन्माचे गाणे अत्यंत लोकप्रिय आहे. प्रत्येक ठिकाणी मंदिरांमधून हे गाणे मोठ्या आवाजात लावले जाते. त्यातील आनंदाच्या वात्सल्यपूर्ण भावना आणि मंदिरातल्या पाळण्याची दोरी हलवणार्‍या सुवासिनी यांचा दृश्य मेळ पाहणार्‍याच्या मनात आनंदलहरी उठवून जातो. खरेच परमेश्वररूपी राम माणसात जन्माला आला आहे की काय, असा मंगलमय भास होतो. त्यावेळी त्या सुखाचा अनुभव प्रत्येक भाविक घेत असतो. म्हणून आजही राम जन्माच्या सोहळ्याची पूर्वापार आवड उत्सवाच्या निमित्ताने जोपासली जाते.
 
 
Ramnavami festival : राम जन्मानंतर मोठ्या आनंदात उपस्थितांना प्रसाद म्हणून सुंठवडा आणि साखर-फुटाणे वाटले जातात. विविध सण वेगवेगळ्या प्रकारे, आनंद घेत साजरा करण्याची समृद्ध परंपरा भारताइतकी कुठेही नसेल. प्रत्येक देवदेवतेचा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होतो. प्रभू रामचंद्रांबद्दल भारतीयांना अमर्याद आत्मीयता आहे. याचे मूळ कारण म्हणजे प्रत्येकाला चराचराचा कारभार निर्वेध चालावा, असे वाटत असते. किंबहुना, तशी प्रत्येक सजीवाची इच्छा असते. जगात सर्व काही छान चालावे, आदर्शवाद समोर ठेवून जगरहाटी पुढे चालावी, सर्वांच्या पदरात न्यायाचे सारखेच दान पडावे आणि त्यासाठी संरक्षण देणारा दयाळू आणि प्रेमळ राजा असावा, अशी आशा सर्वसामान्यांना असते. असा एक राजा एकेकाळी अस्तित्वात होता, असे रामायणातल्या कथांमधून, ग्रंथांमधून स्पष्ट झाले आणि प्रत्येक माणूस त्या राजापुढे मनोमन नतमस्तक झाला. त्याच्या चरणस्पर्शासाठी अधीर झाला. अयोध्येचा राजा प्रभू रामचंद्र प्रत्येक भारतीयाच्या हृदयसिंहासनावर कायमचा आरूढ झाला.
 
 
काय नव्हते या अलौकिक शक्तिशाली राजाच्या व्यक्तिमत्त्वामध्ये? त्रेतायुगामध्ये कौसल्या राणीच्या पोटी जन्मलेला हा पुत्र महापराक्रमी होता. वसिष्ठ ऋषींच्या आश्रमातल्या यज्ञात अडथळा आणू पाहणार्‍या राक्षसांचा त्याने कुमारवयात असतानाच संहार केला. त्याच वेळी प्रभू रामचंद्रांच्या पराक्रमी गुणाची ग्वाही पिता दशरथ राजाला मिळाली होती. वास्तविक प्रभू रामचंद्र हा दशावतारांमधला पाचवा अवतार मानला जातो. पृथ्वीवर एखाद्या दुष्ट शक्तीचे अराजक माजले तर ईश्वर वेगवेगळ्या रूपात अवतार घेऊन दुष्टांचा विनाश करतो. तसेच प्रभू रामचंद्रांनीही लंकेचा उन्मत्त राजा असलेल्या रावणाचा संहार करण्यासाठी जन्म घेतला, अशी कथा सर्वश्रुत आहे. मुलावरील अपार विश्वासापोटी दशरथाने राज्य कारभार प्रभू रामचंद्रांवर सोपवला होता. पण त्याच जनतेने त्यांची प्राणप्रिय पत्नी सीतामाईच्या चारित्र्याला बोल लावले तेव्हा तो जनतेवर किंचितही रागावला नाही; उलट जनतेच्या मनातील न्यायदानाची भावना सुरक्षित राहावी यासाठी त्याने प्रिय पत्नीचा त्याग केला! जनतेसाठी स्वत:च्या सुखाचा त्याग करणारा दुसरा राजा पुराणात नाही. एक माणूस म्हणून जन्माला आल्यावर या ईश्वराने माणसाच्या आदर्शवादाच्या मर्यादा प्रसंगी जिवाचे, सर्व सुखांचे मोल देऊन सांभाळल्या. म्हणून माणसातल्या या सर्वोत्तम पुरुषाला ‘मर्यादा पुरुषोत्तम’ हा सन्मान मिळाला.
 
 
Ramnavami festival : हा राजा इतका गुणी असूनही संसारसुखापासून वंचित राहिला. पत्नी-विरहाचे दु:ख त्याने अबोलपणे सहन केले. ज्योतिष विद्येच्या दृष्टीने म्हणतात की, प्रभू रामचंद्रांच्या जन्माच्या वेळी सूर्य मेष राशीत नवव्या स्थानावर असल्यामुळे प्रभू रामचंद्रांना गृहसौख्य मिळाले नाही. सूर्य 10 व्या स्थानात असता तर रामाला हे सुख मिळाले असते, असा एकवचनी, एकपत्नी आणि एकबाणी राम अत्यंत लोकप्रिय असूनही त्याला वनवासात जावे लागले. माता कैकयी सावत्र असूनही तिच्या एका शब्दाच्या आदेशानुसार त्याने तत्क्षणी वनवासाची वाट धरली. त्यावेळीही त्याने कैकयी मातेला किंचितही दूषण न देता पित्याची समजूत काढली. प्रत्येक वेळी रामाच्या चरित्रात ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, स्वत:च्या दुर्दैवी आयुष्याबद्दल त्याने कधीही कोणालाही बोल लावले नाहीत; उलट स्वत:चे प्रारब्ध समजून प्राप्त परिस्थितीचा आनंदाने स्वीकार केला. विशाल मनाची अन् सहनशीलतेची दिव्य प्रतिमाच जणू ती!
 
 
आजची सामाजिक परिस्थिती लक्षात घेता रामचरित्राच्या अभ्यासाची गरज प्रकर्षाने जाणवते. आज चौकटीत अडकणार्‍या तरुणाईला तत्त्वनिष्ठ रामाच्या आयुष्याचा आदर्श पुढे ठेवण्याची आवश्यकता आहे. जवळ संपत्ती असली की, नशेच्या आहारी जाऊन, माता-पित्यांना बदनाम करणार्‍या तरुणांना प्रभू रामचंद्रांच्या माता-पित्यांप्रती प्रेमाचे उदाहरण द्यायला हवे. आपल्या व्यसनाधीन आयुष्याने आई-वडिलांना चिंतेत टाकणार्‍या या पिढीला, माता कैकयीच्या एका आज्ञेखातर वनवासात जाणार्‍या रामाची गोष्ट सांगायला हवी. आई-वडिलांची आज्ञा पाळणे हे मुलांचे कर्तव्य, त्यांचा शब्द मोडणे म्हणजे पाप हे समजून घ्यायला हवे. कारण आई-वडील सांगतात ते हिताचेच असते, याचा प्रत्यय आल्याशिवाय राहात नाही! म्हणतात ना, कैकयीला रामाला वनवासात पाठवण्याची बुद्धी का झाली? तर, त्यानंतर वनवासातील सीताहरणाची घटना घडून त्या निमित्ताने रावणाचा विनाश व्हावा, असा ईश्वरी संकेत होता. हे नाट्य ईश्वराने घडवलं.
 
 
रामकथेतील बंधुप्रेमाच्या कहाणीचा गोडवाही अवीट आहे. भरताला राज्याभिषेकाचा आग्रह करून, प्रभू रामचंद्रांनी भावंडावर किती प्रेम करावे, याचा दाखलाच दिला आहे. आज संपत्तीच्या वाटणीवरून भावाभावांमध्ये दुरावा निर्माण झालेला दिसतो. कित्येकदा तर मारामार्‍या, खुनापर्यंत मजल जाते. अशा वेळी रामायणातल्या बंधुप्रेमाचा आदर्श स्वीकारण्यात आपण कितपत यशस्वी झालो, असा प्रश्न पडतो. रामायणासारखे आदर्शवादी ग्रंथ पूजनीय म्हणून केवळ डोक्याला लावून नमस्कार करणे पुरेसे नाही. त्यातला आदर्शवाद प्रत्यक्षात आणणे हीच त्या ग्रंथाची खरी पूजा ठरेल. अशा आदर्शवादाची आठवण ठेवण्यासाठीच साजरा करावा, हा Ramnavami festival रामनवमीचा उत्सव! आधी उल्लेख केल्याप्रमाणे यंदा तर प्रभू रामचंद्र आपल्या मूळ स्थानी विराजमान झाले आहेत. त्या भव्य मंदिराचा लौकिक देश-विदेशामध्ये पोहोचत आहे. भक्तगण मोठ्या संख्येने आपल्या प्रिय देवतेच्या दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. सावळा रामचंद्र त्यांना सुहास्य वदनाने दर्शन देत आहे. खरे सांगायचे तर या घटनेने रामललाला आपले स्थान मिळाले आहेच; त्याचबरोबर देशाला आपली हरवलेली अस्मिताही गवसली आहे. त्यामुळेच यंदाची रामनवमी अस्मिताजतनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण म्हणायला हवी.
 
-पुणे