जडणघडण मर्यादा पुरुषोत्तमाची!

    दिनांक :14-Apr-2024
Total Views |
- डॉ. साधना कुलकर्णी
सध्या प्रभू Shriram श्रीरामाचे नवरात्र सुरू आहे. जो तो आपल्या परीने श्रीरामाची उपासना करीत आहे. या वर्षीच्या रामनवमीला अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेची पृष्ठभूमी लाभली आहे. त्यामुळे येत्या राम जन्मोत्सवाला ऊर्जा, भक्ती, पूजन यांचा परमोच्च आविष्कार समाजात दिसून येईल, यात शंका नाही. प्रभू श्रीरामाला भारतीय जनमानसात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याची प्रचीती अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठेच्या प्रसंगी आली आहेच. ‘रामायण’ या महाकाव्याची निर्मिती त्रेतायुगात झाली. त्यानंतर द्वापार युग सुरू झाले आणि आता आपण कलियुगात आहोत. पण आजही रामायणाचे गारुड तसेच आहे; किंबहुना ते वाढताना दिसत आहे. याचे काय कारण असावे?
 
 
ram
 
Shriram : भारतीय संस्कृतीची मशागत होण्यामध्ये रामायणाचा सिंहाचा वाटा आहे. दुसरे असे की, ही विजय गाथा आहे. धर्माचा अधर्मावर, सद्गुणाचा दुर्गुणावर, सन्नीतीचा अनीतीवर विजय रामायणात आहेच; पण तो केवळ शस्त्रसामर्थ्याने नाही तर श्रेष्ठ सदाचरणाने प्राप्त झाला आहे. त्यामुळे युगानुयुगे रामायणातून सदाचरणाची प्रेरणा मिळत आली आहे. तिसरे कारण म्हणजे रामायणातील पात्रांनी आदर्शांचे मापदंड प्रस्थापित केले आहेत. हे आदर्श आणि सिद्धांत काळाच्या प्रत्येक लाटेच्या कसोटीवर खरे उतरले आहेत. त्यामुळे आजही रामकथा कालसुसंगत आहे. चौथे कारण म्हणजे रामराज्य हे मूल्यांचे राज्य आहे. कर्तव्याच्या तुलनेत वैयक्तिक मोह, भावना, प्रेम यांना महत्त्व न देता, केवळ प्रजाहिताला या राज्यात प्राधान्य दिले आहे. आजच्या काळात अशा रामराज्याच्या स्मरणानेही समाजाला आत्मिक समाधान लाभते. पाचवे कारण म्हणजे प्रभू श्रीराम ही एक व्यक्ती किंवा ईश्वर नाही तर राम ही वृत्ती आहे, विचार आहे, आचरण आहे. एवढेच नाही तर राम हे तत्त्व आहे. असा हा राम प्रत्येकाच्या हृदयात असतो. रामकथेत तो ‘आत्माराम’ जागृत करण्याची शक्ती आहे. त्यामुळे रामायण हे भारतीयांच्या रक्त मांसपेशीत रुजले आहे आणि पिढी-दर-पिढी ते त्याच उत्कटतेने झिरपते आहे. आचार्य विनोबा भावे म्हणतात, ‘माझा राम आधी विश्वनंदन आहे आणि मागाहून दशरथनंदन आहे.’
 
 
रामायणातील सगळी पात्रे आपल्याला खूप जवळची वाटतात. यातील राजस्त्रियांच्या चरित्रात डोकावून बघितले तर स्त्रीशक्तीची असामान्य रूपे आपल्याला स्तिमित करतात. मातृशक्ती, त्याग, समर्पण, निष्ठा, संयम इत्यादी गुणांचा उत्तुंग आविष्कार म्हणजे Shriram रामायणातील स्त्रिया. रघुकुलातील राजांनी आपल्या शस्त्रसामर्थ्याने रणभूमीवर विजय मिळविला. त्याच वेळी या राजस्त्रियांनाही अनेक लढ्यांना सामोरे जावे लागले; तेही राजमहालाच्या चार भिंतीत आणि शस्त्रांशिवाय. कुणी वासनांध वृत्तीशी, कुणी विश्वासघाताशी, कुणी संशयपिशाच्चाशी, कुणी उपेक्षेशी तर कुणी नियतीच्या अगम्य खेळीशी लढा दिला आहे. ही लढाई त्यांना कधी आप्तस्वकीयांशी तर कधी स्वतःशीही करावी लागली आहे. या युद्धात धैर्य, संयम, विवेक, मर्यादा, पातिव्रत्य, श्रद्धा या शस्त्रांद्वारे त्यांनी यश मिळविले आहे. या विजयाची नोंद घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण रामायणाची उत्तुंगता या राजस्त्रियांमुळे कमालीची उंचावली आहे. वास्तविक, या प्रत्येक राजस्त्रीच्या ललाटावर नियतीने एका अटळ व्यथेचा शिक्का मारून ठेवला आहे. प्रत्येकीच्या राजवैभवी जीवनाला वेदनेची किनार आहे. राणी कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रेला सुरुवातीला अपत्यहीनतेचे शल्य उरात बाळगून जगण्याला सामोरे जावे लागले. यात नियतीचा काय हेतू असावा? पुढे स्वतःच्या गुणांनी रमवणारा आणि ज्याच्या कथेत योगी रमतात असा राम, सुलक्षणांनी युक्त लक्ष्मण, विश्वाचे भरणपोषण करणारा भरत आणि शत्रूंचा नाश करणारा शत्रुघ्न अशा चार अलौकिक आणि दिव्य पुत्रांची प्राप्ती तीनही राण्यांना झाली.
 
 
हे चारही पुत्र यथावकाश राजनीती, युद्धनीती, प्रजा धर्म, कर्तव्यनिष्ठा यांचे धडे ऋषिवरांच्या मार्गदर्शनात गिरवत होते. त्याच वेळी त्यांच्यातला ॠजू, समंजस, सात्त्विक, प्रेमळ, संयमी, निश्चयी असा माणूस घडत होता तो त्यांच्या तीनही मातांच्या संस्कारांमुळे. सद्गुणांनी परिपूर्ण अशा पुत्रांची जडणघडण, ज्यांना आज आपण भावनिक बुद्ध्यांक किंवा ‘सॉफ्ट स्किल्स’ म्हणतो; त्याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. बालवयात पुत्रांवर या उन्नत भावनांचे रोपण करण्याचे श्रेय या तीनही मातांचे आहे. रामायणातला हा एक अतिशय महत्त्वाचा पैलू आहे. वाल्मीकि रामायणात रामाचे 72 गुण सांगितले आहेत.
 
 
Shriram : राणी कौसल्या ही मातृत्वाचे प्रतीक म्हणून नेहमीच गौरवली जाते. तिरुपती बालाजी मंदिरात देवाला जागे करताना ‘कौसल्या सुप्रजा रामा, पूर्वा संध्या प्रवर्तते’ या भूपाळीमध्ये पहिला उल्लेख कौसल्या मातेचा आला आहे. वनवासाला जाणार्‍या रामाला बघून ती कोसळते, उन्मळून पडते; पण रामानेच समजूत घालून तिला शांत केले आहे. राजधर्म आणि कुलधर्माचे भान ठेवून ती कमालीच्या धैर्याने या प्रसंगाला सामोरी गेली. कैकेयीचा अपराध तिने शांतपणे पोटात घातला. संतप्त झालेल्या भरताला तिने आत्मीयतेने, प्रेमाने कर्तव्याची जाणीव करून दिली. रामाला तिने 14 वर्षे आपल्या नजरेत साठवून ठेवले असून वनवासातल्या रामाला तिच्या दिव्यदृष्टीतून प्रेम आणि बळ मिळाले आहे. म्हणूनच रामरक्षेत ‘कौसल्येयो दृशो: पातुं’ असे म्हटले आहे.
 
 
राणी कैकेयी ही युद्धनिपूण, बुद्धिमान आणि निग्रही आहे. राजा दशरथाला तिने अनेकदा राज्य कारभारात योग्य सल्ला दिला. तिचे श्रीरामावर भरतापेक्षाही अधिक प्रेम आहे. रामाच्या राज्याभिषेकाच्या वार्तेने ती आनंदून गेली आहे. अशा वेळी या असामान्य राजस्त्रीला मत्सराची बाधा कशी होऊ शकते, हा प्रश्न नेहमीच पडतो. पण याचे उत्तर कैकेयीच्या आईमध्ये तर दडले नसावे? राजा अश्वपती आणि शुभलक्षणा यांची ही कन्या. राजा अश्वपतीला पक्ष्यांची भाषा अवगत होती, पण त्यांचे संभाषण कोणालाही सांगण्याची त्याला अनुमती नव्हती. हे संभाषण सांगितल्यास अश्वपतीचा मृत्यू अटळ होता. एकदा राणी शुभलक्षणाने हे संभाषण सांगण्याचा हट्ट राजाजवळ धरला. या हट्टापायी माझा मृत्यू होऊ शकतो, असे राजाने तिला समजावून सांगितले. तेव्हा राणीचे उत्तर होते, ‘मग तुम्ही मरा, पण मला संभाषण सांगा.’ अश्वपती राजाने अशा राणीचा त्याग केला आहे. त्यामुळे कैकेयीला मातृसुख मिळाले नाही. पण कदाचित आईचा आततायी, अविवेकी स्वभाव तिच्यात उतरला असावा का? अर्थातच रामायण घडण्यासाठी कैकेयीचा मत्सरभाव जागृत होणे हे विधिलिखितच होते. पण नंतर काही काळाने आपल्या कृत्याचा तिला पश्चात्तापही झाला आहे. महत्त्वाचे हे की, या प्रसंगामुळे भरताने कैकेयीची निर्भर्त्सना केली आहे. मात्र, रामाच्या मनातील तिचे स्थान अजिबात डळमळीत झालेले नाही. कायम सन्मार्गाने जाणारी ती राणी सुमित्रा. सौमित्र तिचा पुत्र. पण त्याआधी तो रामाचा उजवा हात, रामाचा बहिश्चर प्राण आणि रामाची सावली आहे, हे ती जाणून आहे. त्यामुळे रामासोबत वनवासात जाण्याच्या निश्चयापासून ती लक्ष्मणाला परावृत्त करत नाही. Shriram रामाचे संरक्षण करण्याची क्षमता लक्ष्मणातच आहे, हे तिला पक्के ठाऊक आहे. कर्तव्य आणि ममता यांच्यात निवड करायची झाल्यास ममतेला मागे सारणे हा सुमित्रेचा स्वभाव लक्ष्मणातही पूर्णतः उतरला आहे. विवेकी आणि खंबीर असलेली सुमित्रा राजमहालाच्या एका अभेद्य भिंतीप्रमाणे कुटुंबीयांना आधार देत राहिली. पुत्रवियोगाने राजा दशरथाचे प्राण गेले, पण तीनही राण्या पुत्रवियोग आणि पतिवियोग होऊनही चिवटपणे झुंज देत राहिल्या. श्रीरामांच्या अस्तित्वातून स्वतःची शक्ती एकवटत राहिल्या.
 
 
लक्ष्मणाची पत्नी उर्मिला ही सीतेची लहान बहीण आहे. श्रीराम आणि लक्ष्मण यांच्यातील अद्वैत समजून घेणे आणि ते पचवणे हे उर्मिलेतील पत्नीला किती अवघड झाले असेल? सीतेप्रमाणे तीदेखील वनवासात जाण्याचा हट्ट करू शकली असती, पण तिने तसे केले नाही. वनवासात श्रीराम आणि सीतेचे रक्षण करण्याचे लक्ष्मणाचे कर्तव्य आहे, हे ती जाणून आहे आणि त्या कर्तव्याच्या आड येण्याचे संस्कार तिच्यावर नाहीत. उर्मिलाच्या मूकसंमतीची खात्री असल्यामुळे तिचा पाठिंबा हे लक्ष्मणाचे बळ आहे. लक्ष्मण आणि उर्मिलेमधील अव्यक्त असे परस्पर सामंजस्य हे खरे त्यांच्या नात्याचे बलस्थान आहे. उर्मिलेने महालात राहून वनवास भोगला आहे. शांत तेवणार्‍या ज्योतीप्रमाणे तिने चौदा वर्षे अखंड जळून वनवासातल्या स्वकीयांना आश्वस्त केले आहे.
 
 
रामायणाची महानायिका म्हणजे सीता. ‘सहचारिणी’ हे नाते तिने सर्वोच्च उंचीवर नेऊन ठेवले. Shriram श्रीरामाबरोबर सीता काया, वाचा, मन आणि आत्म्याच्या स्तरावर एकरूप झाली आहे. श्रीराम वनवासाला निघाले त्यावेळी वसिष्ठ ऋषींनी सीतेला राजगादीवर बसण्याची सूचना केली होती. यावरूनच तिचे सामर्थ्य लक्षात येते. वनवासात अनेक तात्त्विक मुद्यांवर सीता आणि श्रीरामाच्या चर्चा झाल्या आहेत. अशोकवनात असलेल्या सीतेच्या जवळपासही रावण फिरकू शकला नाही, याला कारण सीतेचे प्रखर तेज. पती श्रीराम आणि राजा श्रीराम यात सीतेने कधीही गल्लत केलेली नाही. पती आणि राजा यातील सीमारेषेची तिला अचूक जाण आहे. ‘प्रजेसाठी निर्णय घेताना राजा श्रीरामांनी माझ्यावर अन्याय केलाही असेल कदाचित, पण पती श्रीरामांनी मला एक क्षणही अंतर दिले नाही’ असे म्हणणारी सीता ही कायम वंदनीय आहे.
 
 
रामनवमीच्या निमित्ताने Shriram श्रीरामांच्या जीवनात आलेल्या स्त्रियांचेही स्मरण करणे गरजेचे आहे, कारण ‘रामलला’ ते ‘पुरुषोत्तम’ या प्रवासात राजस्त्रियांच्या भूमिकांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रभाव हा पुरुषोत्तमाच्या व्यक्तिमत्त्वासाठी नक्कीच साह्यभूत ठरला आहे. बालवयात रामाच्या जडणघडणीला तीन मातांनी आकार दिला तर पुढे श्रीरामांनी आपल्या आचरणातून या स्त्रियांना समृद्ध केले. परस्परपूरक अशी ही नाती आहेत. या स्त्रियांच्या आयुष्यात अनेक संकटे, वादळे आली. पण त्यावर धैर्याने, निष्ठेने, श्रद्धेने मात करण्याची शक्ती त्यांना पुरुषोत्तमाच्या प्रभावाने प्राप्त झाली आहे. त्यांच्या अलौकिक चरित्राचा कालप्रवाहावर पडलेला अमीट ठसा आजही वंदनीय, चिंतनीय आणि मार्गदर्शक आहे.