मंडीतून प्रत्येकी तीनवेळा वीरभद्रसिंह आणि प्रतिभासिंह खासदार

    दिनांक :14-Apr-2024
Total Views |
नवी दिल्ली, 
Virbhadra Singh - Pratibha Singh : मंडी लोकसभा मतदारसंघाशी विक‘मादित्यसिंह यांच्या घराण्याचा 53 वर्षांपासून संबंध आहे. या मतदारसंघातून त्यांचे वडील वीरभद्रसिंह आणि आई प्रतिभासिंह यांनी प्रत्येकी तीन वेळा लोकसभेची निवडणूक जिंकली आहे. वीरभद्रसिंह यांनी 1971 मध्ये पहिली लोकसभा निवडणूक काँग्रेस उमेदवार मंडी मतदारसंघातून लढवली आणि जिंकली. 1977 मध्ये जनता पक्षाच्या लाटेत मात्र त्यांचा पराभव झाला. 1980 च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून ते दुसर्‍यांदा जिंकले. 1983 खासदार असतानाच काँग्रेसच्या नेतृत्वाने त्यांना मुख्यमंत्री म्हणून हिमाचलमध्ये पाठवले. प्रदीर्घ काळ हिमाचलचे मुख्यमंत्रिपद सांभाळल्यानंतर वीरभद्रसिंह यांनी 2009 मध्ये तिसर्‍यांदा मंडीमधून लोकसभेची निवडणूक लढवली आणि विशेष म्हणजे, 2012 मध्ये पुन्हा त्यांची हिमाचलचे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. यावेळी पुन्हा एकदा त्यांना खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला.
 
 
Virbhadra Singh
 
Virbhadra Singh - Pratibha Singh : प्रतिभासिंह यांनी 1998 मध्ये पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली; मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. 2004 मध्ये प्रतिभासिंह यांनी दुसर्‍यांदा मंडीतून निवडणूक लढवली आणि जिंकली. यावेळी पहिल्यांदा त्या लोकसभेत गेल्या. 2012 मध्ये वीरभद्रसिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर मंडीत झालेली पोटनिवडणूक प्रतिभासिंह यांनी लढवली आणि जिंकली. यावेळी त्या दुसर्‍यांदा खासदार झाल्या. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 2021 मध्ये मंडीत झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत प्रतिभासिंह विजयी झाल्या आणि तिसर्‍यांदा खासदार बनल्या. सध्या त्या मंडीच्या खासदार आहेत. मंडी हा वीरभद्रसिंह घराण्याचा बालेकिल्ला मानला जात असला, तरी या मतदारसंघात एकदा वडील वीरभद्रसिंह तर दोनदा त्यांच्या आई प्रतिभासिंह पराभूतही झाल्या आहेत. त्यामुळे विक्रमादित्यसिंह कोणता विक्रम करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष राहणार आहे.