शाकाहार महागला; सोने-घरे वधारली

    दिनांक :14-Apr-2024
Total Views |
अर्थचक्र 
- महेश देशपांडे
सरत्या आठवड्यामध्ये World Bank जागतिक बँकेने भारताच्या विकास दराचा ताजा अंदाज पुढे आणला. यामुळे अर्थक्षेत्राचे नवे चित्र समोर आले. दरम्यान, देशात शाकाहारी भोजन महागले असून मांसाहारी जेवण स्वस्त झाले, हे सांगणारी एक पाहणी समोर आली. याच सुमारास लक्झरियस घराच्या मागणीत वाढ होत असून त्या तुलनेमध्ये परवडणारी घरे कमी प्रमाणात विकली गेली तसेच सोन्याला चांगलीच झळाळी आल्याचेही स्पष्ट झाले. जागतिक बँकेने अलिकडेच 2024 साठी भारताच्या आर्थिक वाढीचा (जीडीपी वाढ) अंदाज 1.2 टक्क्यांनी वाढवून 7.5 टक्के केला आहे. जागतिक बँकेच्या मते सेवा आणि औद्योगिक क्षेत्रातील तेजीमुळे भारताची उत्पादन वाढ 2024 या आर्थिक वर्षात 7.5 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते. या काळात उत्पादन वाढ आणि एकत्रीकरणामुळे वित्तीय तूट आणि सरकारवरील कर्ज कमी होईल. अहवालानुसार, 2023 च्या तिसर्‍या तिमाहीमध्ये (ऑक्टोबर-डिसेंबर) आर्थिक व्यवहारांची वाढ 8.3 टक्के होती. गुंतवणूक आणि सरकारी उपभोगात सातत्याने होणारी वाढ यामुळे हे घडत आहे.
 
 
house-sale
 
अलिकडील सर्वेक्षण डेटामधील मजबूत कामगिरी पुढे चालू राहण्याची शक्यता आहे. अहवालानुसार, 2023 च्या मध्यापासून महागाई रिझर्व्ह बँकेच्या दोन ते सहा टक्क्यांच्या लक्ष्य श्रेणीत राहिली आहे. तथापि, अन्नधान्याची महागाई वाढली आहे. ‘एल निनो’मुळे कमी होणारे पिकांचे उत्पादन हे त्यामागील एक महत्त्वाचे कारण आहे. जानेवारीच्या सुरुवातीला World Bank जागतिक बँकेने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी भारताचा सकल देशांतर्गत उत्पादनवाढीचा अंदाज 6.4 टक्के राखला होता. बँकेने आपल्या सहामाही ‘ग्लोबल इकॉनॉमिक रिपोर्ट’मध्ये हा अंदाज जाहीर केला आहे. जागतिक बँकेने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढीचा अंदाज 6.5 टक्के ठेवला आहे. जागतिक बँकेने असेही म्हटले आहे की, जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा विकास वेगाने होईल.
 
 
World Bank : जागतिक बँकेचा हा अंदाज प्रामुख्याने देशांतर्गत मागणीतील मजबूत वाढ, सार्वजनिक पायाभूत सुविधांवरील खर्च आणि खाजगी क्षेत्रातील पतवाढीमुळे प्रभावित आहे. ‘फिच’ या जागतिक रेटिंग एजन्सीने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज 6.5 टक्क्यांवरून सात टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. मजबूत देशांतर्गत मागणी आणि वाढीव गुंतवणुकीमुळे भारताच्या आर्थिक विकासाला पाठिंबा मिळेल, असे ‘फिच’ने म्हटले आहे. रेटिंग एजन्सीने 2024 च्या अखेरीस किरकोळ महागाई दर चार टक्क्यांपर्यंत घसरण्याचा अंदाज वर्तवला आहे. रिझर्व्ह बँक जुलै ते डिसेंबर दरम्यान रेपो दरात 0.5 टक्के कपात करेल, अशी ‘फिच’ची अपेक्षा आहे. ‘नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस’ (एनएसओ) च्या अधिकृत डेटाने ऑक्टोबर-डिसेंबर या कालावधीत देशाचा जीडीपी 8.4 टक्क्यांनी वाढल्याचे दर्शविल्यानंतर ‘फिच’च्या अंदाजातील हा बदल जवळजवळ दोन आठवड्यांनंतर आला आहे. उत्पादन आणि खाण क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळे हे वाढले आहे.
 
 
World Bank : गेल्या काही दिवसांमध्ये कांदा, टोमॅटो, बटाटा यासारख्या फळभाज्यांच्या किमतींमध्ये झालेल्या बदलामुळे शाहाकारी जेवण महागले आहे. याबाबत ‘क्रिसिल मार्केट इंटेलिजेंस अँड अ‍ॅनॅलिटिक्स’ या संस्थेने ‘रोटी राईस रेट इंडेक्स’ नावाने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार शाहाकारी जेवणाची थाळी गेल्या वर्षाच्या तुलनेत सात टक्क्यांनी महागली आहे. दुसरीकडे मांसाहारी जेवणाच्या थाळीच्या किमतीत मात्र घट झाली आहे. मार्च 2023 मध्ये शाहाकारी जेवणाच्या थाळीची किंमत सुमारे 25.5 रुपये होती. आता हीच किंमत मार्च 2024 मध्ये 27.3 टक्क्यांपर्यंत महागली आहे. व्हेज थाळीमध्ये साधारणपणे भाकरी, भाजी, भात, डाळ, दही, सॅलेड अशा प्रकारचे अन्नपदार्थ असतात. गेल्या काही दिवसांमध्ये फळभाज्या महागल्या आहेत. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत शाहाकारी जेवणाची थाळी महागल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, नॉन व्हेज थाळीची किंमत मात्र सात टक्क्यांनी कमी झाली आहे. कोंबड्यांची मागणी घटल्यामुळे सध्या ही किंमत कमी आहे, असे ‘क्रिसिल’चे म्हणणे आहे. नॉन व्हेज थाळीची किंमत मार्च 2023 मध्ये 59.2 रुपये होती. मार्च 2024 मध्ये ती 54.9 रुपयांपर्यंत कमी झाली. फेब्रुवारी महिन्यात या नॉन व्हेज थाळीची किंमत 54 रुपये होती.
 
 
कांदा आणि बटाट्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे सध्या व्हेज थाळी महागली आहे. ‘क्रिसिल’ संस्थेच्या म्हणण्यानुसार कांद्याचा दर 40, टोमॅटोचा दर 36 तर बटाट्याचा दर साधारण 22 टक्क्यांनी वधारला असल्यामुळे शाहाकारी थाळी महागली आहे. पुरेशा प्रमाणात पुरवठा नसल्यामुळे तांदूळ 14 तर डाळीचा दर 22 टक्क्यांनी वाढला आहे. दुसरीकडे, ब्रॉयलर कोंबडीच्या मांसाचा दर 16 टक्क्यांनी कमी झाला आहे. त्यामुळेच नॉन व्हेज थाळीच्या दरात घट झाली आहे. मार्च हा रमजानचा पवित्र महिना होता. या महिन्यात मात्र ब्रॉयरल कोंबडीच्या मांसात पाच टक्क्यांनी वाढ झाली होती. याच सुमारास घरांच्या किमतीत वाढ होत असल्याचे दिसून आले.
 
 
World Bank : अहवालातील माहितीनुसार जानेवारी 2024 ते मार्च 2024 या तिमाहीमध्ये घरांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे जास्त किमतीच्या घरांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. एक कोटींपेक्षा जास्त किमतीच्या घरांच्या विक्रीत 51 टक्क्यांची वाढ झाली तर 50 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या घरांच्या विक्रीत घट झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. ‘नाईट फ्रँक’च्या अहवालानुसार पहिल्या तिमाहीमध्ये घरांच्या विक्रीत नऊ टक्क्यांची वाढ झाली. जानेवारी ते मार्चदरम्यान 86,345 घरांची विक्री झाली. ही विक्री गेल्या सहा वर्षांमधील कोणत्याही तिमाहीतील दुसर्‍या क्रमांकाची विक्री आहे. याआधी ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 या तिमाहीमध्ये घरांची सर्वाधिक विक्री झाली होती. अहवालानुसार, मोठ्या 8 शहरांमध्येच 86 हजार 345 घरांची विक्री झाली आहे. त्यापैकी 23 हजार 743 घरांची विक्री एकट्या मुंबईत झाली. ही विक्री मागील वर्षीच्या तुलनेत 17 टक्क्यांनी जास्त आहे. म्हणजे गृहविक्रीच्या बाबतीत मुंबई शहर सर्व शहरांपेक्षा आघाडीवर आहे.
 
 
दरम्यान, आठ शहरांमध्ये विक्री झालेल्या 86,345 घरांपैकी 40 टक्के घरे ही एक कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतींची आहेत. विक्री झालेल्या एकूण घरांपैकी 34 हजार 895 घरांची किंमत एक कोटी रुपयांपेक्षा अधिक होती. दुसरीकडे 50 लाख रुपयांपेक्षा कमी किमतींच्या घरांच्या विक्रीत 10 टक्क्यांची घट झाली. घरांच्या वाढत्या किमती आणि महागडी कर्ज यामुळे 50 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या घरांच्या विक्रीत घट झाली. जानेवारी 2024 ते मार्च 2024 या तिमाहीमध्ये घरांच्या विक्रीत मुंबई आघाडीवर असली, तरी मागील वर्षीच्या तुलनेत हैदराबादमध्ये घरांच्या किमतीत 13 टक्क्यांची वाढ झाली आहे.
 
 
World Bank : दिवसेंदिवस सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ होत आहे. एमसीएक्सवर सोन्याचे दर 70 हजार रुपयांच्या आसपास पोहोचले आहेत. सोन्याचा दर हा 69 हजार 805 रुपयांवर पोहोचला आहे तर चांदीचा दर 80 हजार रुपयांच्या आसपास म्हणजे 79 हजार 411 रुपयांवर गेला आहे. त्यामुळे सोने खरेदी करणार्‍यांच्या खिशाला कात्री लागत आहे. सध्या सोने खरेदी करणे अवघड झाले आहे. सोन्याने 70 हजार रुपयांचा टप्पा गाठला आहे. फेब्रुवारी महिन्यात अनेक केंद्रीय बँकांच्या सोने भांडारात 19 टन सोने वाढले आहे. यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. बँका मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करीत आहेत. यामुळे दरावर परिणाम होत आहे. ‘पीपल्स बँक ऑफ चायना’ ही बँक सोन्याची सर्वात मोठी खरेदीदार आहे. या बँकेत सोन्याच्या भांंडारात 2257 टन सोने आहे. गेल्या 16 महिन्यांपासून त्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. ‘नॅशनल बँक ऑफ कझाकिस्तान’मध्ये फेब्रुवारी महिन्यात सहा टन सोन्याची वृद्धी झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या सोने भंडारातही सहा टन सोन्याची वृद्धी झाली आहे. दरम्यान, ‘यूएस फेडरल रिझर्व्ह’च्या दरात कपात होण्याची शक्यता असल्यामुळे सोने-चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. एमसीएक्सवर सातत्याने सोन्याच्या दरात वाढ होत आहे. एमसीएक्सवर सोन्याचे दर गेल्या सहा महिन्यांमध्ये 23 टक्क्यांनी वाढले आहेत. दरातील ही वाढ मोठी मानली जात आहे तसेच अनेक लोक गुंतवणूक करण्यासाठी सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात करीत आहेत. दरात वाढ होत असल्याने सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरत आहे.
 
(लेखक आर्थिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)