हेमामालिनी मथुरेत हॅट्ट्रिक करण्याच्या तयारीत

    दिनांक :15-Apr-2024
Total Views |
श्यामकांत जहागीरदार
 
नवी दिल्ली, 
मथुरा लोकसभा मतदारसंघातून चित्रपट अभिनेत्री आणि भाजपा खासदार Hemamalini हेमामालिनी तिसर्‍यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्या विजयाची हॅट्ट्रिक करणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मथुरेत लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिलला मतदान आहे. काशी आणि अयोध्या झाल्यानंतर आता मथुरेच्या श्रीकृष्णजन्मभूमीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यातच ‘कृष्ण भी अब कहा मानने वाले है’, हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वाक्य बरेच काही सांगणारे आहे. यातून रामललानंतर भगवान कृष्णही आपली जन्मभूमी मुक्त करून घेऊ शकतील, असा अर्थ निघतो. त्यामुळे यावेळी मथुरा लोकसभा निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे.
 
 
Hemamalini
 
Hemamalini हेमामालिनी यांना भाजपाने मथुरा मतदारसंघातून तिसर्‍यांदा उमेदवारी दिली आहे. 2014 मध्ये सर्वप्रथम त्या येथून निवडणूक लढल्या आणि जिंकल्या. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत त्यांनी दुसर्‍यांदा विजय मिळवला. आता त्या सलग तिसर्‍या विजयाची म्हणजे हॅट्ट्रिक नोंदवण्याच्या तयारीत आहेत. बॉक्सर विजेंदरसिंह यांना काँग्रेस मथुरेतून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार होती, पण त्याच्या एकदिवस आधीच त्यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला. त्यामुळे नाईलाजाने काँग्रेसला दुसर्‍या पसंतीचे मुकेश धनगर यांना उमेदवारी द्यावी लागली. उमेदवार निवडतानाच काँग्रेसचा पहिला पराभव झाला. धनगरांना अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे म्हणून मुकेश धनगर गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नरत आहेत.
 
 
काँग्रेस नेते रणदीप सुर्जेवाला यांनी Hemamalini  हेमामालिनी यांच्याविरुद्ध वादग्रस्त विधान करून स्वत:ची आणि काँग्रेस पक्षाचीही अडचण करून टाकली. या विधानावरून तीव‘ जनक्षोभ उसळला. आमच्या मागण्या लोकसभेत, विधानसभेत माडण्यासाठी, त्या सोडवण्यासाठी आम्ही खासदार आणि आमदार निवडून देत असतो, असे सांगत सुर्जेवाला यांनी हेमामालिनी याचे नाव घेता अतिशय आक्षेपार्ह विधान केले होते. सुर्जेवाला यांना जे बोलायचे ते बोलू द्या; कारण मतदारसंघातील जनता माझ्यासोबत आहे. विरोधकांचे काम टीकाटिपण्णी करायचेच असते, माझ्यासाठी ते चांगले बोलूच शकत नाही, अशी अतिशय संयमित आणि प्रगल्भ प्रतिक्रिया हेमामालिनी यांनी दिली.