वर्धा,
Abhay Daga : नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल आज मंगळवार 16 रोजी जाहीर झाला. यात वर्धेतील प्रसिद्ध डॉक्टर दाम्पत्य डागा कुटुंबातील अभय याने युपीएससी परीक्षेत 185 वा क्रमांक मिळवून यश संपादन केले. अभयने सायबर गुन्हे किंवा त्यासंबंधित गुन्ह्यांची उकल करणारा पोलिस अधिकारी होण्याची इच्छा व्यक्त केली.

अभय येथील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मीना डागा यांचा मुलगा आहे. अभयने पोलिस अधिकारी म्हणजेच आयपीएस होण्याचे ठरवले आहे. कोणती श्रेणी दिली जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र मिळालेल्या पदावरून आयपीएस होण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. खुल्या गटासाठी महाराष्ट्रात दोन जागा आहेत. त्यात त्याला स्थान मिळेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला. अभयचे प्राथमिक शिक्षण लॉयड्स स्कूलमध्ये झाले आहे. त्यानंतर त्यांनी आयआयटी खडगपूरमधून माहिती तंत्रज्ञानात पाच वर्षांचे बीटेक आणि एमटेक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर वर्षभर अमेरिकेत राहून महाराष्ट्रात परतला. नोकरी करत असतानाच त्याने प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला. सेवेचा एक भाग म्हणून सायबर सुरक्षेबद्दल बरेच काही शिकता येते. गुन्ह्याचे स्वरूप बदलत आहे. नवीन गुन्हेगार तयार होत आहेत. त्यामुळे अशा गुन्हेगारांना शोधणे पोलिसांसमोर आव्हान आहे. गेल्या अडीच वर्षांत आपण पूर्ण वेळ अभ्यास, वाचन, व्यायाम इत्यादींवर केंद्रीत केल्याचे त्याने सांगितले.
कुटुंबातील प्रत्येक जण डॉक्टर आहे. साहजिकच अभयही डॉक्टर होणार असे वाटत होते. पण सुरुवातीपासूनच अभयने स्वतःचे वेगळे क्षेत्र निवडले. प्रशासकीय सेवेत काम करण्याचा निर्णय घेत त्याने दुसर्या परीक्षेत आणि पहिल्या मुलाखतीत 185 वा क्रमांक मिळवला. अभयने आपल्या यशाचे श्रेय वडील डॉ. राजेंद्र, आई डॉ. मीना, बहीण डॉ. साक्षी रेड्डी, डॉ. श्रीधर रेड्डी आणि आजी चंद्रकांता डागा यांना दिले आहे.