रामाचा आदर्श प्रत्येकांनी बाळगण्याची गरज : डॉ. वृषाली जोशी

रामस्मरण व्याख्यानमालेचा दुसरा दिवस

    दिनांक :16-Apr-2024
Total Views |
नागपूर,
Dr. Vrishali Joshi अयोध्येतील प्रभू रामचंद्र हे आपले दैवत आहे. आदर्श रामाची कथा प्रत्येक भारतीयांच्या मनात रुजली आहे. अशा रामाचा आदर्श प्रत्येकांनी बाळगण्याची खरी गरज विश्व मांगल्य सभेच्या राष्ट्रीय संघटन मंत्री डॉ. वृषाली जोशी यांनी व्यकत केली. रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात केशवनगर सांस्कृतिक सभा आणि कलासंगम, कला व सांस्कृतिक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने सुनील देवउपाध्ये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या.
 
 
Dr. Vrishali Joshi
 
कुटुंबवत्सल राम हा व्याख्यानमालेचा विषय होता. Dr. Vrishali Joshi याप्रसंगी अध्यक्षस्थानी कवयित्री आणि सामाजिक कार्यकर्ता ज्योत्स्ना पंडित, कलासंगमच्या साधना उन्हाळे, सारिका चिंचमलातपुरे, केशवनगर सांस्कृतिक सभेचे सचिव प्रकाश देशपांडे, उर्मिला सराफ आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. तसेच केशवनगर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘मेरे घर राम आये है’ हे गीत सादर करीत व्याख्यानमालेची सुरुवात झाली. व्याख्यानमालेत डॉ. वृषाली जोशी पुढे म्हणाल्या, लिलाविलासाचा एक भाग म्हणजे कुटुंबवत्सल राम होय.श्री राम हे भगवान विष्णूंचा सातवा अवतार असून कलियुगात रामचिंतन, रामस्मरणाशिवाय गती नाही.
सर्वांच्या रोमारोमात राम
आज सर्वांच्या रोमारोमात राम आहे. पण त्या चिंतनातून आपण आपल्या जीवनाकरिता काय उपयोग करतो, याचे चिंतन प्रत्येकांनी करणे आवश्यक झाले आहे. रघुकुल रीत सदा चलि आई, प्राण जाये पर बचन न जाई या प्रमाणे प्रत्येक तत्त्वाचा आदर्श सापडतो ते रामाचे कुटुंब आहे. कौटुंबिक जीवनात आई, पत्नी, पती, माता या शब्दांचा सुंदर अर्थ त्यांनी अनेक प्रसंग सांगून स्पष्ट करीत सांगितले.
मुलांवर चांगले संस्कार करावेत
मुलांच्या जडणघडणात आईंची भूमिका महत्वाची असते. शिवाजी महाराजांना जिजाबाईने चांगले संस्कार केल्यामुळेच शिवाजी महाराजांनी स्वराज्य मिळविले होते. प्रत्येक आई वडीलांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार करावेत. स्वत:चा विचार न करता आपल्या कुळाचा, आपल्या कुटुंबाचा विश्वाचा विचार करतो तो कुटुंबवत्सल राम होय. रामाने आपल्या कुळाचे पालन केले होते. रामनवमीच्या निमित्त्याने प्रत्येक कुटूंबाने आपले रितीरिवाज, परंपरा व कुळाचार पाळावा , असे आवाहन जोशी यांनी केले.
सभ्यता टिकविणारा पहिला आदर्श राजा
ज्योत्स्ना पंडित म्हणाल्या, राम हा मानवीय सभ्यता टिकविणारा पहिला आदर्श राजा आहे. त्याच्या वाणी आणि करणीत काही फरक नव्हता, म्हणून राम मर्यादा पुरुषोत्तम होता. कार्यक्रमाचे संचालन प्रकाश एदलाबादकर यांनी केले तर आभार मिलिंद भाकरे यांनी मानले.
व्याख्यानमालेचा आज समारोप
मंगळवार, 16 रोजी सायंकाळी 6.30 वाजता ‘बिंबब्रह्म आणि वास्तुब्रह्म’ या विषयावर भारतीय विद्या अभ्यासक प्रवीण योगी यांचे समारोपीय व्याख्यान होणार आहे.