भरकटलेली ‘ती’ वाघीण गवसली

सॅटेलाईट जीपीएस कॉलर लावून केले निसर्गमुक्त

    दिनांक :16-Apr-2024
Total Views |
गोंदिया, 
NT-3 Tiger नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील नागझिरा अभयारण्यातून 12 एप्रिलपासून संपर्काबाहेर असलेली एनटी-3 वाघीण आज, 15 एप्रिल रोजी मिळाली. तिला पुन्हा सॅटेलाईट जीपीएस कॉलर लावून व्हीएचएफ चमू व क्षेत्रीय वन अधिकारी व कर्मचार्‍यांकडून संनियंत्रण केले.
 
 
NT-3 Tiger
 
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात 11 एप्रिल रोजी सोडण्यात आलेली एनटी-3 वाघिणीची कॉलर आयडी बेवारस स्थितीत आढळल्याने ती संपर्काबाहेर गेली होती. वाघिणीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी लावलेली सॅटेलाईट जीपीएस कॉलर 12 एप्रिलपासून एकाच ठिकाणी सिग्नल देत होती. व्हीएचएफ चमू व क्षेत्रीय अधिकार्यांनी राबविलेल्या शोधमोहिमेत सॅटेलाईट जीपीएस कॉलर नागझिरा अभयारण्यातील कक्ष क्र. 95 मध्ये खाली पडलेला आढळला. NT-3 Tiger दरम्यान, वरिष्ठ अधिकारी व तज्ञांच्या मार्गदर्शनात व्हीएचएफ चमू व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचार्यांनी राबविलेल्या शोधमोहिमेत 15 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजता नागझिरा अभयारण्यात ज्या ठिकाणी निसर्ग मुक्त केले होते, त्या ठिकाणाहून 3 ते 4 किमी क्षेत्रात वाघीण आढळली. दरम्यान वाघिणीला ट्रॉक्युलाईज करुन पुन्हा सॅटेलाईट जीपीएस कॉलर लावून ज्या क्षेत्रात सोडले होते, त्याच क्षेत्रात निसर्गमुक्त करण्यात आले. निसर्गमुक्त केलेल्या वाघिणीच्या हालचालींवर सॅटेलाईट जीपीएस कॉलर तसेच व्हीएचएफ अँटेनामार्फत क्षेत्रीय स्तरावर सनियंत्रण सुरु आहे.
 
ही कार्यवाही ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रवीकांत खोब्रागडे व त्यांचा जलद कृती दल तसेच भारतीय वन्यजीव संस्था डेहराडूनचे सहायक संशोधकांच्या सहकार्याने पार पाडण्यात आली. या कारवाईत नागपूरच्या वनसंरक्षक (प्रा.) श्रीलक्ष्मी ए., नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीच क्षेत्र गोंदियाचे क्षेत्रसंचालक तथा उपवनसंरक्षक प्रमोदकुमार पंचभाई, उपसंचालक पवन जेफ यांच्या मार्गदर्शनात नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी, बायोलॉजिस्ट, जलद कृती दल, व्हीएचएफ चमुने महत्वाची भूमिका पार पाडली. ही कार्यवाही राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) माहिप गुप्ता, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पूर्व नागपूरचे डॉ. प्रविण चव्हाण, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदियाचे उपवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक जयरामेगौडा आर. यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आली.