निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचे प्रचारगीत प्रसारीत

    दिनांक :16-Apr-2024
Total Views |
मुंबई, 
Uddhav Thackeray : शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने नव्याने दिलेल्या मशाल या चिन्हाला घेऊन उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी एक प्रचारगीत प्रसारीत केले. शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले आणि ठाकरे गटला मशाल हे निवडणूक चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षनाव देण्यात आले. त्यामुळे यंदाच्या लोकसभेत मशाल चिन्ह लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मशाल गीत तयार केले आहे.
 
 
udhav
 
शिवसेना भवनात आज Uddhav Thackeray उद्धव ठाकरे यांची पत्रपरिषद झाली. यात ठाकरेंनी हे नवीन प्रचारगीत प्रसिद्ध केले. यावेळी ते म्हणाले, अंधेरीच्या पोटनिवडणुकीपासून मशाल चिन्हाने आमची विजयी सुरुवात झाली आहे. आता सार्वत्रिक निवडणुका आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात मशाल चिन्ह पोहोचले आहे. पण, मशाल ही केवळ चिन्ह म्हणून नाही तर, सरकारविरोधात असलेला असंतोष या मशालीच्या रूपाने भडकणार आहे. त्यात हुकूमशाही राजवट जळून खाक होईल.
 
 
मशालीचे नेमके चित्र कसे असणार, हे देखील तयार केले आहे. आगोदरच्या मशाल चिन्हात आणि आताच्या चिन्हात फरक आहे. हे मशाल चिन्ह ईव्हीएम आणि मतपत्रिकेवर असणार आहे. त्यामुळे मतदारांसमोर जाताना हे चित्र सोबत न्यावे, असे माझे शिवसैनिकांना आवाहन आहे. प्रचारात याच चिन्हाचा वापर करावा, असे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना माझे आवाहन आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
 
 
Uddhav Thackeray : जाहीरनामा संयुक्तपणे प्रसिद्ध केला जाणार आहे. राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न आमच्या जाहीरनाम्यात असणार आहेत. सध्या काँग्रेसने दिलेला जाहीरनामा सर्वसमावेशक आहे. पण, त्यात आणखी काही टाकायचे असेल तर आम्ही ते करू. जाहिरातींवर माझे काम चालू आहे. यानंतर आमच्या संयुक्त सभा असतील. एक संयुक्त जाहीरनामाही आम्ही प्रसिद्ध करणार आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.