प्रामाणिकता आणि वचनबद्धतेतून जनसेवेचे आदर्श मापदंड निर्माण करा

उपराष्ट्रपती जगदीप धनखड

    दिनांक :16-Apr-2024
Total Views |
-आर्थिक राष्ट्रवाद वाढीसाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता
- सुनिता मिणा ठरल्या ५ सुवर्ण पदकांच्या मानकरी
 
नागपूर, 
Jagdeep Dhankhad जग वेगाने बदलत आहे. तंत्रज्ञानाच्या कुशल उपयोगातून आज प्रत्यक्ष कर क्षेत्रातही मोठे बदल घडत आहेत. या बदलत्या परिस्थितीत सरकारी सेवक म्हणून शिस्त पूर्ण आचरण, कामातील सचोटी, नम्रता, नैतिकता आणि वचनबद्धतेच्या भावनेतून आपल्या कार्याचे आदर्श मापदंड निर्माण करा अशी साद उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी घातली. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीमध्ये (एनएडीटी) भारतीय महसूल सेवेच्या ७६व्या प्रशिक्षण तुकडीच्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून उपराष्ट्रपती धनखड बोलत होते. यावेळी उपराष्ट्रपती यांच्या सुविद्य पत्नी डॉ.सुदेश धनखड, राज्यपाल रमेश बैस, राज्यसभेचे महासचिव प्रमोदचंद्र मोदी, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता, प्रत्यक्ष कर विभागाच्या प्रशिक्षण महासंचालनालयाचे प्रधान महासंचालक सिमांचल दास, एनएडीटीचे महासंचालक आनंद बैरवार मंचावर उपस्थित होते.

jagdeep dhangad 
 
जग कागदी दस्तांपासून तंत्रज्ञानाच्या युगात प्रवेश करते झाले आहे. या बदलांमुळे करदात्यांसाठी सुलभ व पारदर्शी व्यवस्था उभी राहीली आहे. कर भरणा करणे अधिक सोपे झाले आहे. सर्व आर्थिक व्यवहार डिजीटाईज झाल्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराद्वारे कर प्रशासनात सुधारणा होत असून कर चोरीला आळा घालण्यास मोठी मदत होत असल्याचे उपराष्ट्रपतींनी सांगितले. तंत्रज्ञानाच्या प्रक्रियेत ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे डेटाबेस यंत्रणा उभारली जात आहे. यातून प्रत्यक्ष कर संकलन व कर भरण्याच्या व्यवहारात पारदर्शकता येत असून भ्रष्टाचाराला आळा बसला आहे. यामुळे करदात्यांचा सरकारी यंत्रणेवर विश्वास दृढ झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही विश्वासार्हता अधिक सक्षम करण्यासाठी भारतीय महसूल सेवेत रुजू होणाऱ्या नव्या अधिकाऱ्यांनी अधिक जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडावे असे उपराष्ट्रपती धनखड यांनी सांगितले. कर उत्पन्नासमवेत स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ कशी उपलब्ध करुन देता येईल याबाबत महसूल सेवेतील अधिकाऱ्यांनी उद्योजकांशी उत्तम समन्वय साधने आवश्यक आहे. त्यांच्यात आर्थिक राष्ट्रवादाची भावना जागृत करण्याचे आवाहन त्यांनी केले. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. देशांतर्गत उद्योजकतेला मोठी भरारी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
देशाच्या विकासात प्रत्यक्ष कराचे महत्व विषद करुन या यंत्रणेत काम करतांना घ्यावयाची काळजी व गांभीर्य राखत प्रत्यक्ष जबाबदारी पार पाडण्याविषयी त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. एनएडिटीच्या १६ महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीदरम्यान विविध क्षेत्रात सर्वोत्तम ठरलेल्या ७ प्रशिक्षणार्थ्यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते एकूण ११ सुवर्ण पदकांनी गौरविण्यात आले. सर्वोत्तम प्रशिक्षणार्थ्याच्या सुवर्ण पदकासह सुनिता मिणा यांनी सर्वाधिक ५ सुवर्ण पदक पटकाविली. उपराष्ट्रपतींनी आपल्या भाषणात सुनिता मिणा यांचे कौतुक केले.
तत्पूर्वी, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी स्वागतपर भाषणात मंडळाच्या प्रगतीचा आलेख मांडला. एनएडीटीच्या प्रशिक्षण कार्यक्रम संचालक लैना बालन यांनी ७६व्या तुकडीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी माहिती दिली. प्रशिक्षणार्थी झेबाखान मन्सुरी आणि धोनेपुडी विजयबाबू यांनी प्रशिक्षण कालावधीतील अनुभव कथन केले. प्रशिक्षणार्थी प्रिया सिंह यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.Jagdeep Dhankhad एनएडीटी ही भारतीय महसूल सेवेतील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी देशातील सर्वोच्च प्रशिक्षण संस्था आहे. संस्थेमधून प्रशिक्षण घेवून बाहेर पडणाऱ्या ७६ व्या तुकडीमध्ये भारतीय महसूल सेवेचे ५६ अधिकारी आणि रॉयल भुटान सेवेचे २ अशा एकूण ५८ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. डिसेंबर २०२२ मध्ये एनएडीटी मध्ये दाखल झालेल्या या अधिकाऱ्यांमध्ये २४ महिलांचा समावेश आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण भारतीय महसूल सेवेतील अधिकाऱ्यांना सेवेत रुजू होण्यापूर्वी एनएडीटीमध्ये १६ महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते.