तभा वृत्तसेवा
पुसद,
Dysp Pranita Kale : हा सत्कार सोहळा, शिक्षण हे नोकरीसाठी नसून ज्ञानप्राप्तीसाठी आहे. शिक्षणामुळे माणसातील अज्ञान नष्ट होण्यास मदत होते. आज पालकांच्या मुलांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. ते शिक्षणावर वारेमाप खर्च करत आहेत. काही पालकांकडून मुलांना ‘नोकरीसाठी शिका' असे प्रचलित होत आहे. परंतु हे चुकीचं आहे, असे सुनील साखरे म्हणाले.
डीवायएसपी म्हणून निवडल्या गेलेल्या नाभिक समाजातील प्रणिता काळे यांच्या सत्कारप्रसंगी पंचायत समितीचे निवृत्त विस्तार अधिकारी साखरे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक पंचफुला भालेकर अध्यक्षस्थानी होत्या. प्रणिताचे आई-बाबा प्रतिभा व कैलास काळे आणि मामा मंगेश हेही यावेळी उपस्थित होते. सुनील साखरे पुढे म्हनाले, शिक्षण आणि संस्कार, शिक्षण आणि ज्ञान यामुळे मानवाच्या जीवनात समाधान मिळते. परंतु या आधुनिक युगामध्ये अनेक पालक आपल्या मुलांना आपल्या मुलांच्या शिक्षणावर खूप खर्च करून मुलांसमोर अपेक्षांचा डोंगर उभा करून त्यांच्यावरही ओझे देत आहेत. हे थांबले पाहिजे.
प्रणिता काळे हिने आपल्या मनोगतामधून, नाभिक असलेले आपले वडील जर आपल्यासाठी चौदा तास उभे राहून कष्ट करत असतील तर आपणही त्यांच्यासाठी सोळा तास बसून अभ्यास का करू शकत नाही. मी सोळा ते अठरा तास दररोज अभ्यास करून आज डीवायएसपी पदावर विराजमान होत आहे, अशी भावना व्यक्त केली.
प्रत्येक विद्याथ्र्याने आपल्या आई-वडिलांच्या कष्टांकडेही लक्ष दिले पाहिजे. मी माझी पदवी मुक्त विद्यापीठातून घेतली आहे. माझं मत असे आहे की, तुम्ही स्वतःला ओळखा. मोठमोठे कॉलेजेस, मोठ्या इमारती म्हणजे शिक्षण नव्हे. मोबाईलचा वापर गरजेनुसारच हवा. जिथे जाणे आवश्यक आहे तिथेच जावे, विनाकारण वेळ खर्च करू नये, जीवन अनमोल आहे, त्याचा उपयोग सत्कर्मी लावावा, असेही प्रणिताने यावेळी सांगितले. संचालन व आभारप्रदर्शन श्याम जिरोणकर यांनी व प्रास्ताविक परशुराम नरवाडे यांनी केले. कार्यक्रमाला समाज बांधवांची मोठी उपस्थिती होती.