खोदकाम करून ठेवला रस्ता देत आहे अपघाताला निमंत्रण

    दिनांक :17-Apr-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
बाभुळगाव, 
excavation road-accident : बाभुळगाव धामणगाव रस्त्यावर नांदुरा गावाजवळ पंधरा दिवसांपूर्वी डांबर रस्ता पॅचेस लावण्याकरिता खोदून ठेवला आहे. हा रस्ता कधी दुरुस्त केला जाणार, असा साधा प्रश्न वाहनधारकांकडून विचारण्यात येत आहे. सतत वर्दळीचा बाभुळगाव धामणगाव अर्धा रस्ता साठ ते सत्तर फुटांपर्यंत खोदून ठेवण्यात आला आहे. यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना कमालीची कसरत करून आपले वाहन पुढे न्यावे लागत आहे.
 
 
acci
 
 
 
विशेष म्हणजे धामणगावकडून बाभुळगावकडे येणारी वाहने खोदलेला रस्ता पाहून चालक अचानकपणे उजव्या बाजूला वळवितात. यामुळे लहान मोठे अपघात नित्याची बाब झाली आहे. तेथे रस्ता दुरुस्तीचे फलकसुद्धा कंत्राटदाराकडून लावण्यात आलेले नाही. दरवर्षी होणाऱ्या रस्ता अपघाताची संख्या कमी करण्यासाठी शासन स्तरावर मोठे प्रयत्न केले जात आहेत. मात्र येथे उखडलेला रस्ता पॅचेस लावण्याकरिता पंधरा दिवसांपूर्वी खोदून ठेवण्यात आला आहे. रस्त्यातील गिट्टी वर आल्याने लहान-मोठे अपघात होत आहे. खोदून ठेवलेला हा रस्ता कधी दुरुस्त होईल, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे. संबंधित विभागाने लक्ष द्यावे व मोठा अपघात होण्यापूर्वी रस्ता दुरुस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.