सायबर पोलिस ठेवणार समाजमाध्यमांवर लक्ष

-मॉनिटरींग सेलची स्थापन -26 आक्षेपार्ह पोस्ट निर्दशनास

    दिनांक :18-Apr-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
अमरावती,
Cyber police : सण, उत्सव, सभा, मिरवणुका व लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने समाजमाध्यमांवर होणार्‍या घडामोडीकडे अमरावती शहर सायबर पोलिसांचे 24 तास लक्ष राहणार आहे. त्यासाठी मॉनिटरींग सेल स्थापन करण्यात आला आहे.
 
 
fjsIf
 
सोशल मिडीयावर अफवा न पसरविणेबाबत व अफवांवर विश्वास न ठेवण्याबाबत पोलिसांकडून नेहमी आवाहन करण्यात येते. शहरामध्ये आगामी काळात येणारे सण, उत्सव, सभा, मिरवणुका तसेच लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने शहरातील नागरिक व विशेष करून युवा वर्ग सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपले मत मतांतरे, भावना व्यक्त करताना किवा सोशल मिडीयावर कोणीतरी व्यक्त केलेल्या विचारांना समर्थन किया विरोध दर्शवितांना दिसून येतात. परंतु, सोशल मिडीयावर व्यक्त केलेले मत हे केवळ वैयक्तीक असून सुध्दा त्याचा परिणाम समाजातील प्रत्येक घटकावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी सोशल मिडीयावर व्यक्त केलेल्या मतांच्या परिणामी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेले आहेत.
 
सोशल मिडीयावर बहुतांशी वेळेस भ्रामक जाहिराती, अफवा, बदनामीकारक मजकुर प्रसारीत केल्याने सुध्दा समाजामध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता नाकरता येत नाही. या अनुषंगाने पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी व पोलिस उपायुक्त कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाणे सायबर येथे पोलिस निरीक्षक कल्याणी हुमणे यांच्या नेतृत्यात 1 अधिकारी व 2 पोलिस अंमलदारांचे सोशल मिडीया मॉनिटरींग सेल स्थापन करण्यात आले आहे. सदर सेलच्या माध्यमातून सोशल मिडीयावर घडणार्‍या घडामोडींवर 24 बाय 7 तत्वावर अविरतपणे लक्ष ठेवण्याचे कामकाज सुरु झाले आहे. सदर सोशल मिडीया मॉनिटरींग सेलच्या माध्यमातून मागील काळात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट करणारे युजर्सची यादी तयार करण्यात आली व त्यांच्याव्दारे सोशल मिडीयावर पोस्ट केलेल्या कंटेट वर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहेत.
 
मॉनिटरींग दरम्यान एकूण 26 आक्षेपार्ह पोस्ट निर्दशनास आल्या असून त्याबाबत संबंधीतांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. या बाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे. 17 एप्रिल रोजी वडाळी परीसरात राहणार्‍या इसमांमध्ये आपापसात वाद झाले होते व त्याबाबत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. सदर ठिकाणी शांतता आहे. त्याअनुषंगाने अमरावती शहरातील नागरिकांना याव्दारे आवाहन करण्यात येते की , सोशल मिडीयावर कोणीही आक्षेपार्ह पोस्ट करु नये तसेच अफवा पसरवू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये. वादग्रस्त पोस्ट निदर्शनास आल्यास व त्यावर प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद न देता तात्काळ सायबर पोलिस ठाणे व्हाटसअ‍ॅप मोबाईल क्रमांक 8329 476135 यावर माहिती पाठविण्यात यावी.