ईव्हीएम-व्हीव्हीपॅट पडताळणीवरील निर्णय सुरक्षित

18 Apr 2024 19:02:01
नवी दिल्ली,
EVM-VVPAT Verification : ईव्हीएममध्ये पडणाऱ्या प्रत्येक मताची व्हीव्हीपॅटच्या (व्होटर्स व्हेरिफाएबल पेपर ऑडिट ट्रेल) माध्यमातून तपासणी केली जावी, अशी मागणी करीत दाखल झालेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी निर्णय सुरक्षित ठेवला.
 
 
EVM
 
 
निवडणूक आयोगाने याचिकेवर सादर केलेले उत्तर ऐकून घेतल्यानंतर न्या. संजीव खन्ना आणि न्या. दीपांकर दत्ता यांचा समावेश असलेल्या न्यायासनाने निर्णय सुरक्षित ठेवला. व्हीव्हीपॅटवर पारदर्शक काचेऐवजी अपारदर्शक काच लावण्याचा आयोगाने २०१७ मध्ये घेतलेला निर्णय मागे घेण्याची मागणी याचिकाकत्र्यांनी केली आहे. या पारदर्शक काचेमधून मतदार सात सेकंदांसाठी दिवा लागलेला असताना स्लिप पाहू शकतो.
 
 
निवडणूक आयोगाच्या वतीने युक्तिवाद करताना ज्येष्ठ वकील मणिंदरसिंग यांनी ईव्हीएम कसे काम करते, याची प्रक्रिया स्पष्ट केली. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण आणि गोपाल शंकरनारायणन् यांना याचिकाकत्र्यांच्या वतीने युक्तिवाद केला. आज झालेल्या सुनावणीत केरळातील कासारगोड येथे झालेल्या मतदानाच्या कवायतीदरम्यान ईव्हीएमने एक अतिरिक्त मत दाखवल्याचा आरोप खोटा आहे, असे निवडणूक आयोगाने न्यायालयाला सांगितले.
 
 
भारतातील निवडणूक प्रक्रिया ही एक प्रचंड मोठे कार्य आहे आणि ही व्यवस्था खाली आणण्याचा प्रयत्न केला जाऊ नये, असे १६ मार्च रोजी झालेल्या सुनावणीत न्यायासनाने ईव्हीएमविरोधातील टीका खोडून काढताना तसेच पुन्हा मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याच्या मागणीवर म्हटले होते.
Powered By Sangraha 9.0