मणिपुरात काँग्रेस उमेदवाराचा वैयक्तिक जाहीरनामा

राज्यात एनआरसीला दिला पाठिंबा

    दिनांक :18-Apr-2024
Total Views |
इम्फाळ,
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी होत आहे. त्याच दिवशी मणिपूर राज्याच्या इनर आणि बाह्य मणिपूरच्या दोन्ही लोकसभा जागांसाठी मतदान होणार आहे. काँग्रेसने अंगोमचा बिमोल अकोईजाम यांना इनर मणिपूर मतदारसंघातून उमेदवारी दिली. ते दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) प्राध्यापकही आहेत. तेथे थौनओजम बसंत कुमार सिंह हे भाजपाकडून निवडणूक लढवत आहेत.
 
 
jasd
 
 
काँग्रेसने ५ एप्रिल रोजी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. यात अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. त्याचवेळी अंगोमचा बिमोल अकोइजाम यांनी लोकसभेसाठी आपला वैयक्तिक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यात नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स (एनआरसी) आणि राज्यातील लोकसंख्या धोरणासाठी समर्थन देण्याचे आश्वासनदेखील समाविष्ट आहे. एका वृत्तानुसार, अंगोमचा बिमोल अकोइजाम यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात म्हटले आहे की, नवीन मणिपूरसाठी नवीन राजकीय संस्कृती विकसित करणे, हे त्यांचे ध्येय आहे. मणिपूरच्या सर्व लोकांना फायदा होईल, अशा मुद्यांचा प्रचार करणे. मी सुसंवाद आणि समृद्धीच्या भविष्याची कल्पना करतो. जिथे प्रत्येकाची प्रगती होते.
 
 
अकोइजाम म्हणाले की, कायदेशीर नागरिकांची ओळख करण्यासाठी राज्याला संस्थात्मक यंत्रणांची गरज आहे. २००३ मध्ये जेव्हा एनआरसी दुरुस्ती संसदेत मांडण्यात आली, तेव्हा काँग्रेसने त्याला पाठिंबा दिला होता, त्यानंतर तो एकमताने मंजूर झाला. त्याचप्रमाणे २०२२ मध्ये राज्यात एनआरसीची मागणी करणारा ठराव मणिपूर विधानसभेत मंजूर करण्यात आला. काँग्रेसच्या आमदारांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. काँग्रेस एनआरसीच्या विरोधात आहे, असे म्हणणे चुकीचे आहे, असे सांगून अकोइजाम पुढे म्हणाले की, मी वैयक्तिकरीत्या एनआरसीच्या बाजूने आहे. तुम्ही याला काहीही म्हणू शकता. माझा विश्वास आहे की, आपल्याकडे अशी यंत्रणा असली पाहिजे, ज्याद्वारे हे ठरवता येईल की कोण राज्याचा कायदेशीर नागरिक आहे आणि कोण बाहेरचा आहे.