सुळे, कोल्हे, धंगेकरांचे शक्तिप्रदर्शन की कोपरा सभा?

18 Apr 2024 19:18:16
पुणे, 
Lok Sabha Election 2024 : पुण्यातील आजचा दिवस लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने फारच महत्त्वाचा आणि लक्षणीय ठरला. सुनेत्रा पवार, मुरलीधर मोहोळ आणि शिवाजीराव आढळराव पाटील या महायुतीच्या तीन उमेदवारांच्या अर्ज भरण्याच्या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हजर राहिले होते. तिथेच, महाविकास आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि रवींद्र धंगेकर यांच्या सभेला शरद पवार, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे बडे नेते हजर राहिले. सुळे, कोल्हे आणि धंगेकर यांचे अर्ज दाखल झाल्यानंतर जे सभेच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्यात आले, त्याला शक्तिप्रदर्शन म्हणावे की कोपरा सभा, असा सवाल उपस्थित केला जात आहे. कारण, या सभेला अपेक्षित गर्दी जमल्याचे चित्र दिसत नव्हते.
 
 
PAWAR
 
 
महायुती आणि महाविकास आघाडी यांनी शक्तिप्रदर्शन करीत पुण्यात बारामती, शिरूर आणि पुणे लोकसभा मतदारसंघांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले. त्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडी यांनी आपापल्या जाहीर सभा घेतल्या. या जाहीर सभांमध्ये हाय प्रोफाईल सभा महायुतीचीच ठरली. कारण, या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हजर राहिले. या सभेत सुनेत्रा पवार, मुरलीधर मोहोळ आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांचीदेखील भाषणे झाली.
 
 
 
 
या उलट महाविकास आघाडीच्या सभेत शरद पवार, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण हे मोठे नेते हजर राहिले. मोहन जोशी, शिवसेनेकडून सुषमा अंधारे, पवारांचे समर्थक प्रशांत जगताप वगैरे नेते हजर राहिले. पण, ही सभा एखाद्या कोपरा सभेसारखी झाली. कारण, या सभेचे स्टेज फारच छोटे होते आणि समोर गर्दीला बसायला खुच्र्यांची व्यवस्थादेखील नव्हती. महायुतीच्या स्टेजवर सुनेत्रा पवार, मुरलीधर मोहोळ आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांना जागा मिळाली, पण महाविकास आघाडीच्या स्टेजवर सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि रवींद्र धंगेकर या उमेदवारांनादेखील जागा मिळाली नाही. ते सभेत समोर खाली जमिनीवर बसले होते. जुन्नर तालुक्यातले सत्यजित शेरकर हे आधी श्रोत्यांमध्येच बसले होते. परंतु, प्रशांत जगताप यांनी त्यांना जाहीर आवाहन करीत व्यासपीठावर बोलावून घेतले. महाविकास आघाडीची छोटेखानीच सभा झाली, त्या तुलनेत महायुतीने मोठे शक्तिप्रदर्शन करून घेतले.
Powered By Sangraha 9.0