भारताने निवडणूक वर्षात आर्थिक शिस्त राखली

    दिनांक :19-Apr-2024
Total Views |
- आतंरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कौतुक
 
वॉशिंग्टन, 
निवडणूक वर्षात आर्थिक शिस्त राखल्याबद्दल International Monetary Fund आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) भारताचे कौतुक केले आणि भारतीय अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करीत असल्याचे गौरवोद्गार काढले. आयएमएफमधील आशिया आणि पॅसिफिक विभागाचे संचालक कृष्णा श्रीनिवासन् यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, भारताची अर्थव्यवस्था सध्या चांगली कामगिरी करीत आहे. 6.8 टक्के वाढ खूप चांगली आहे. महागाई कमी होत आहे. निवडणुकीच्या वर्षात माझ्यासाठी आर्थिक शिस्त राखणे खूप महत्त्वाचे आहे.
 
 
International Monetary Fund
 
International Monetary Fund : श्रीनिवासन् म्हणाले, या सरकारने शिस्त पाळली आहे. मला वाटते की, हे खूप महत्त्वाचे आहे; कारण शेवटी ठोस ‘मॅक‘ो फंडामेंटल्स’ हा आधार आहे, ज्यावर देश समृद्ध होतात आणि शाश्वत विकास साधतात. त्यामुळे ते टिकवून ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. भारताने गेल्या अनेक वर्षांत अनेक आव्हानांचा सामना केला आणि त्यावर यशस्वीपणे मात केली आहे. ती जगातील सर्वांत वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत आहे, असे सांगत श्रीनिवासन् म्हणाले, खरे तर, 2024-25 या आर्थिक वर्षात आम्ही खाजगी वापर आणि सार्वजनिक गुंतवणुकीच्या नेतृत्वाखाली 6.8 टक्केवाढीचा अंदाज व्यक्त करत आहोत. महागाई हळूहळू कमी होत आहे. ती आता पाच टक्क्यांच्या खाली आहे. भारत हा जागतिक विकासात योगदान देणार्‍या प्रमुख देशांपैकी एक आहे. या वर्षी आम्हाला 6.8 टक्के आर्थिक वाढ अपेक्षित आहे. खाजगी उपभोग आणि मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गुंतवणुकीमुळे हे शक्य होईल. जागतिक विकासात भारताचा वाटा सुमारे 17 टक्के असेल, असेही श्रीनिवासन् यांनी सांगितले.