लोकशाहीच्या महोत्सवाचा आज पहिला टप्पा

-१०२ मतदारसंघात होणार मतदान -नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर, भंडारा-गोंदियाचा समावेश

    दिनांक :19-Apr-2024
Total Views |
नवी दिल्ली, 
Lok Sabha Election 2024 : जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीच्या महाउत्सवाला अर्थात् मतदान प्रक्रिकेला शुक्रवारपासून खऱ्या अर्थाने सुरुवात होत आहे. २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील १०२ लोकसभा मतदारसंघांत हे मतदान होत असून, यासाठी आयोगाने जय्यत तयारी केली आहे. महाराष्ट्रात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर, भंडारा-गोंदिया अशा पाच लोकसभा मतदारसंघांचा यात समावेश आहे.
 
 
VOTE
 
पहिल्या टप्प्यातील मतदानाने नितीन गडकरी, भूपेंद्र यादव, किरेन रिजिजू, सर्वानंद सोनोवाल, संजीव बलियान, डॉ. जितेंद्रसिंह, अर्जुनराम मेघवाल आणि एल. मुरुगन या आठ केंद्रीय मंत्र्यांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. पहिल्या टप्प्यात तामिळनाडूतील ३९, राजस्थानमधील १२, उत्तरप्रदेशातील ८, मध्यप्रदेशातील ६, महाराष्ट्र आणि उत्तराखंड प्रत्येकी ५, बिहार आणि आसामच्या प्रत्येकी ४, पश्चिम बंगालमधील ३, मेघालय, मणिपूर, अरुणाचलप्रदेश प्रत्येकी २, मिझोराम, नागालॅण्ड, सिक्कीम, त्रिपुरा, अंदमान-निकोबार, जम्मू-काश्मीर, लक्षद्वीप आणि पुदुचेरीतील प्रत्येकी एका मतदारसंघात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील १०२ मतदारसंघात १,६२५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. सात टप्प्यांत होणाऱ्या निवडणुकीची मतमोजणी ४ जूनला होणार आहे. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश विधानसभेसाठीही उद्या मतदान होणार आहे.
 
‘या' मतदारसंघांतही होणार मतदान
 
 
पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर, भंडारा-गोंदिया अशा पाच लोकसभा मतदारसंघांसोबतच, उत्तरप्रदेशातील नगीना, कैराना, पिलिभित, बिजनौर, रामपूर, मोरादाबाद, सहारनपूर आणि मुजफ्फरनगर या आठ मतदारसंघात, मध्यप्रदेशच्या सिधी, मंडला, छिंदवाडा, बालाघाट, शहाडोल आणि जबलपूर अशा सहा मतदारसंघात, बिहारच्या गया, जमुई, नवादा आणि औरंगाबाद या ४ मतदारसंघात, राजस्थानच्या चुरू, दौसा, नागौर, सीकर, झुंझुन, जयपूर, अलवरण जयपूर ग्रामीण, बिकानेर, गंगानगर, भरतपूर आणि करौली धौलपूर अशा १२ मतदारसंघात मतदान होणार आहे.