गोंदिया,
Lok Sabha Elections 2024 : अठराव्या लोकसभेसाठी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान झाले. रिंगणातील 18 उमेदवारांचे भवितव्य मशिनबद्ध झाले असून गोंदिया जिल्ह्यात सरासरी 65 टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील काही मतदान केंद्रावर तुरळक घटना वगळता मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.
जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, गोंदिया व तिरोडा विधानसभा तर गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील आमगाव या चार विधानसभा क्षेत्रातील 1284 मतदान केंद्रावर आज, 19 एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. अर्जुनी मोरगाव व आमगाव विधानसभा क्षेत्रात सकाळी 7 ते दुपारी 3 वाजतापर्यंत आणि गोंदिया व तिरोडा विधानसभा क्षेत्रात सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजतापर्यंत मतदान प्रक्रिया राबविण्यात आली.
उन्हाची तीव्रता लक्षात घेता मतदार सकाळच्या सत्रात मतदान केंद्रांवर गर्दी करतील, अशी अपेक्षा होती. मात्र सकाळी 11 वाजतापर्यंत केवळ 19.72 टक्के एवढीच मतदानाची टक्केवारी होती. मात्र दुपारनंतर प्रचंड उन असतानाही मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली. दुपारी 1 वाजतापर्यंत अर्जुनी मोरगाव 49.17 टक्के, तिरोडा 31.68 टक्के, गोंदिया 33.15 टक्के व आमगाव 48.65 टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्याची टक्केवारी 34.56 एवढी आहे. दुपारी 3 वाजतापर्यंत 44.12 टक्के मतदान झाले. त्यानंतर उन्हाची दाहकता कमी होताच मतदानात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. सायकांळ 5 वाजता अर्जुनी मोरगाव 53.20, तिरोडा 56.69, गोंदिया 56.11 तर आमगाव 3 वाजतापर्यंत 64.60 टक्के असे 56.12 टक्के मतदान झाले. सायंकाळ 6 वाजतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 65 टक्के मतदान झाले.
तिल्ली मोहगाव केंद्रावरील ईव्हीएम दोन तास बंद
गोरेगाव तालुक्यातील तिल्ली मोहगाव मतदान केंद्रावरील बूथ क्र. 48 वर तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. मतदान केल्यावर ईव्हीएम मशीन मधून व्हीव्हीपी पॅट स्लीप निघत नसल्याने मतदारांनी आक्षेप घेतला. त्यामुळे सकाळी 9.30 वाजतापासून मतदान प्रक्रिया बंद पडली. यावेळी 261 मतदान झाले होते. तांत्रिक पथकाने नवीन व्हीव्हीपी पॅट मशिन लावल्यावर दुपारी 11.30 वाजता मतदान सुरळीत झाले.
खा.पटेलांनी पहिल्यांदाच केले कमळाला मतदान
भाजपाच्या विरोधात असणारी राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये सहभागी झाली. भाजपने विद्यमान खा. सुनील मेंढे यांना पुन्हा तिकीट दिली. भाजपाच्या विरोधात लढणारे राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी पहिल्यांदाच भाजपला मतदान करीत सुनील मेंढे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी आज प्रसार माध्यमासमोर केले.
आसलपाणी केंद्रावर मद्यपी तीन कर्मचारी
तिरोडा विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या गोरेगाव तालुक्यातील आसलपाणी मतदान बूथवर पोलिग पार्टीतील तीन कर्मचारी दारू ढोसून असल्याचे आढळून आले. यामुळे त्यांना तत्काळ हटवून आरक्षित कर्मचार्यांना पाठविण्यात आले.
केंद्रावरील अव्यवस्थेची खा. पटेलांनी घेतली दखल
खा. प्रफुल्ल पटेल यांना मतदान केंद्रातील अव्यस्थेची व पोलिस कर्मचारी मतदारांसोबत करीत असलेल्या अरेरावीची माहिती माजी आ. राजेंद्र जैन यांनी दिली. याप्रकरणी खा. पटेल यांनी त्वरित उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील आणि पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली. तसेच मतदान केंद्रावर मतदार पावतीचे वितरण न करण्यात आल्यामुळे बहुतांश मतदारांना मतदानाचा हक्क न बजावताच परतावे लागले. याबाबतची तक्रार आपण जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे करणार असल्याचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
मतदानासाठी ज्येष्ठ नागरिकाचे आंदोलन
गोरेगाव तालुक्यातील बबई येथील मतदान केंद्रावर मतदानाची वेळ 3 वाजता संपल्यानंतर काही वेळाने मतदानाकरीता गेलेले 62 वर्षीय सुखराम रहागंडाले यांना मतदान करु दिले गेले नाही. त्यामुळे रहागंडाले यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. दरम्यान गोरेगावचे पोलिस निरीक्षक अजय भुसारी यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून त्यांची समजूत घालून खाली उतरवले.
भरनोली, राजोली केंद्रावर विक्रमी मतदान
अर्जुनी मोरगाव विधानसभेतील नक्षल प्रभावित संवेदनशील व गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या भरनोली व राजोरी मतदान केंद्रावर मतदारांनी मतदान करण्यासाठी एकच गर्दी करून दोन्ही केंद्रावर विक्रमी 70 ते 72 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे.
नवदाम्पत्यांनी बजावला मतदानाचा हक्क
लोकशाहीच्या या उत्सवादरम्यान आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करताना देवरी तालुक्यातील सोनारटोला व गोरेगाव तालुक्यातील देऊटोला येथे नवदाम्पत्यांनी मतदानाचा हक्क बजावला.