बिर्ला यांनी पहिले मिथक तोडले, दुसरे तोडण्याच्या तयारीत

    दिनांक :19-Apr-2024
Total Views |
नवी दिल्ली, 
Lok Sabha Elections 2024 : ओम बिर्ला यांच्यासमोर कोट्यातून विजयाची हॅट्ट्रिक करतानाच, लोकसभा सभापतींना सलग दुसऱ्यांदा पक्षाची उमेदवारी मिळत नाही आणि उमेदवारी मिळाली तरी तो दुसऱ्यांदा जिंकत नाही, हे मिथक तोडण्याच मोठे आव्हान आहे.
 
 
birlaaa...
 
 
 
यातील पहिले आव्हान म्हणजे, लोकसभा सभापतींना सलग दुसऱ्यांदा उमेदवारी मिळत नाही. हे आव्हान त्यांनी यशस्वीपणे पेलले आहे. कोटा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा आणि लोकसभा सभापती म्हणून पहिल्यांदा उमेदवारी मिळवली आहे. गेल्या २५ वर्षांचा आढावा घेतला तर लोकसभा सभापतींच्या बाबतीत तो दुसऱ्यांदा सभागृहात येत नाही, असा दुर्देवी इतिहास आहे. जीएमसी बलायोगी १९९९ मध्ये अध्यक्ष झाले, पण २००१ मध्ये हेलिकॉप्टर अपघातात त्यांचे निधन झाले. त्यांच्या जागेवर शिवसेनेचे मनोहर जोशी लोकसभेचे सभापती झाले. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना उमेदवाी तर मिळाली; मात्र ते निवडून येऊ शकले नाही.
 
 
२००४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर माकपचे सोमनाथ चटर्जी लोकसभेचे सभापती झाले. पाच वर्षांच्या सभापतिपदाचा कार्यकाळ त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला, पण २००९ मध्ये माकपने त्यांना लोकसभेची उमेदवारीच दिली नाही. २००९ मध्ये काँग्रेसच्या मीराकुमार लोकसभेच्या सभापती झाल्या. लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती म्हणून त्यांच्या नावाची नोंद झाली. सभापती म्हणून पाच वर्षांचा कार्यकाळही त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला. पण, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
 
 
 
२०१४ मध्ये देशात भाजपाच्या नेतृत्वातील रालोआ सरकार आले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन यांची लोकसभा सभापती म्हणून निवड झाली. महाजन यांनी पाच वर्षे अतिशय प्रभावीपणे पद सांभाळले. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारीच मिळाली नाही. २०१९ मध्ये मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाने दुसऱ्यांदा बहुमत मिळवले आणि ओम बिर्ला यांच्या गळ्यात लोकसभा सभापतिपदाची माळ पडली. पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ त्यांनीही यशस्वीपणे पूर्ण केला.
 
 
 
लोकसभा सभापतींना सलग दुसऱ्यांदा उमेदवारी मिळत नाही, हे मिथक त्यांनी तोडले. आता लोकसभा सभापती दुसऱ्यांदा जिंकून लोकसभेत येतो, हे बिर्ला यांना सिद्ध करायचे आहे. या बाबतचे दुसरे मिथकही ते तोडतील आणि निवडणूक जिंकतील, यात शंका नाही.