ओम बिर्ला विजयाची हॅट्ट्रिक करण्याच्या मार्गावर

श्यामकांत जहागीरदार

    दिनांक :19-Apr-2024
Total Views |
नवी दिल्ली, 
Lok Sabha Elections 2024 : राजस्थानच्या कोटा बुंदी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचे सभापती ओम बिर्ला तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यावेळी विजयाची हॅट्ट्रिक करण्याच्या तयारीने ते प्रचारात भिडले आहेत.
 
 
om birla
 
 
 
कोट्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे २६ एप्रिलला मतदान होत आहे. राजस्थान विधानसभेची निवडणूक तीनदा जिंकलेले बिर्ला लोकसभेची सलग तिसरी निवडणूक जिंकण्यासाठी मैदानात उतरले आहेत. कोट्यात बिर्ला यांचा सामना काँग्रेसचे प्रल्हाद गुंजल यांच्याशी आहे. गुंजल हे भाजपाचे बंडखोर नेते आहेत. विशेष म्हणजे, बिर्ला कोटा दक्षिण विधानसभा मतदारसंघातून तीनदा निवडणूक जिंकले, तर गुंजल कोटा उत्तर विधानसभा मतदारसंघातून दोनवेळा भाजपाचे आमदार होते. ३१ मार्चला त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसने त्यांना कोटातून उमेदवारीही दिली.
 
 
२००३ मध्ये बिर्ला पहिल्यांदा कोटा दक्षिणमधून विधानसभेवर विजयी झाले होते. २००८ मध्ये दुसèयांदा ते विधानसभेवर निवडून आले. २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत ते तिसऱ्यांदा आमदार झाले. आमदार असतानाच भाजपाने बिर्ला यांना २०१४ मध्ये लोकसभेची उमेदवारी दिली होती. लोकसभेची पहिली निवडणूक ते जिंकले. आतापर्यंत लढवलेली एकही निवडणूक न हरल्याचा बिर्ला यांचा इतिहास आहे.
 
 
कोटा मतदारसंघ हा तसा जनसंघ-भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या १७ निवडणुकीपैकी १० निवडणुकांत जनसंघ- भाजपाचे उमेदवार विजयी झाले. यात तीनवेळा जनसंघाचे तर सातवेळा भाजपाचे उमेदवार जिंकले. चारवेळा काँग्रेसने या मतदारसंघातून निवडणूक जिंकली. जनता पक्ष, भारतीय लोकदल आणि अपक्ष यांनी प्रत्येकी एकवेळा निवडणूक जिंकली. १९५२ आणि १९५७ ची निवडणूक काँग्रेसने जिंकली. १९६२, १९६७ आणि १९७१ अशा तीन सलग निवडणुका जनसंघाने जिंकल्या. कोटा लोकसभा मतदारसंघात एकूण ८ विधानसभा मतदारसंघ आहेत, यापैकी भाजपा आणि काँग्रेसकडे समसमान म्हणजे प्रत्येकी चार मतदारसंघ आहेत.