रामायण...तुमचं...आमचं...प्रत्येकाचं !

Ramayan-Chinmay Mission भाषेगणिक रामायणात कथावैविध्य

    दिनांक :20-Apr-2024
Total Views |
कव्हर स्टोरी
- रेवती जोशी-अंधारे
Ramayan-Chinmay Mission २२ जानेवारी २०२४ रोजी रामललाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर, देशभरात चैतन्याची लाट आली. यानिमित्ताने, श्रीराम चरित्र आणि रामायणातील कथासंदर्भांची नव्याने उजळणी सुरू झाली. राष्ट्र सेविका समितीच्या आद्य संचालिका वंदनीय मावशी केळकर यांनी रामकथांच्या माध्यमातून जनजागृती घडविल्याचा इतिहास फारसा जुना नाही. अजूनही दरवर्षी नागपुरात श्रीराम जन्मोत्सवाचा कार्यक्रम देवी अहल्या मंदीरात आयोजित केला जातो. यंदा या जन्मोत्सवात चिन्मय इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या अ‍ॅकडेमिक डायरेक्टर डॉ.गौरी माहुलीकर यांनी अनुषांगिक विचार मांडले. या पार्श्वभूमीवर, डॉ.माहुलीकर यांनी तरुण भारत प्रतिनिधीशी संवाद साधला.
 
Ramayan-Chinmay Mission
 
Ramayan-Chinmay Mission डॉ. गौरी माहुलीकर या उच्चविद्याविभूषित विदुषी ! मूळत: मुंबईच्या पण, आता चिन्मय मिशनच्या कार्यासाठी केरळातील एर्नाकुलम् येथे राहणाऱ्या डॉ.गौरी यांनी वर्ष २०१६ मध्ये श्रीलंकेत जाऊन रामायणात उल्लेख आलेल्या स्थानांचा अभ्यास केला. अशोकवाटीकेत सीतेने निर्माण केलेला झरा, हनुमानरायाची पावलं आणि इतरही प्राचीन संदर्भांचा अभ्यास करण्यासाठी त्या ४० दिवस तिथे मुक्कामी होत्या. आदि शंकराचार्य पुरस्कारासह, सावित्रीबाई फुले पुरस्कार आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत साधना पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. भारतीय तत्वज्ञान, संस्कृत भाषा, अद्वैत सिद्धांत, १०८ उपनिषदांचा इंग्रजीत अनुवाद अशा विविध क्षेत्रात सध्या त्यांचं कार्य सुरू आहे.
 
 
Ramayan-Chinmay Mission ‘मूळ वाल्मिकी रामायणात श्रीराम हा मानव राजपुत्र असून, क्वचित प्रसंगी त्याच्या देवत्वाचा उल्लेख आहे. त्याच्या कर्तृत्त्वाने तो देवपदापर्यंत जातो. तर, तुलसी रामायणात तत्कालिन परिस्थितीनुसार, देवाचा मानवी अवतार आणि मानवजातीचा तारणहार म्हणजे श्रीराम, असा संदर्भ आहे. जगभरातील भाषांमध्ये लिखित आणि मौखिक रामायण असून त्यांचे साामजिक, भौगोलिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संदर्भ भिन्न आहेत. कोण चूक किंवा बरोबर असा प्रश्न इथे उपस्थित होत नाही कारण, प्रत्येक समाजघटकाला राम आणि सीतेची गोष्ट आपली वाटत आली आहे. प्रत्येक भाषेगणिक रामायणात येणारे कथावैविध्य त्याचे सौंदर्य वाढवते,' डॉ.गौरी उत्स्फूर्तपणे सांगतात.
 
 
Ramayan-Chinmay Mission आपला मुद्दा अधिक उलगडून सांगताना त्यांनी तत्ववेत्ता अ‍ॅरिस्टॉटलची गोष्ट सांगितली. ‘अ‍ॅरिस्टॉटलकडे लाकडाचे काम करायला एक सुतार यायचा. तो एक विशिष्ट करवत वापरायचा. अ‍ॅरिस्टॉटल नेहमी हे बघत असायचा. एके दिवशी त्याने सुताराला विचारले, ही तुझी करवत किती जुनी आहे? तू नेहमी हीच वापरतोस का?' सुतार म्हणाला,‘हो ! माझ्याकडे हीच करवत आहे. सुतारकाम सुरू केल्यापासून मी हीच करवत वापरतो.' अ‍ॅरिस्टॉटलने पुन्हा विचारले,‘खरंच ! तीच करवत आहे का?' त्याने पुन्हा तोच प्रश्न विचारल्याने काहीसा गोंधळून सुतार म्हणाला की,‘हो ! म्हणजे मी चार-दोन वेळा त्या करवतीची मूठ बदलली आहे. साधारण ३ ते ४ वेळा पात्याला धार लावली आहे. आणि, एकदा ते पातं बदललं आहे. पण, माझी करवत तीच आहे.' सगळं बदललं तरी ज्याप्रमाणे सुताराची करवत तीच आहे कारण, ती त्याची आस्था आहे. असंच काहीसं रामायणाच्या बाबतीत आहे. भाषा, कथा, संदर्भ, भूगोल असं सारं काही बदललं तरी रामकथा कायम आहे आणि हेच आपल्या संस्कृतीचं सौंदर्य आहे,' डॉ.माहुलीकरांनी अभ्यासपूर्ण विवेचन केलं.
 
 
 
Ramayan-Chinmay Mission त्या पुढे सांगतात की, रामायणातील समाजाची मांडणी बहुपेडी आहे. अयोध्येतील नागरी समाज, वनवासी संस्कृती, भिल्ल समाज, वैषयिक वृत्तीचा समाज, ज्ञानी ऋषींचा समूह आणि नावाडी-कोळी-धोबी हे जनसामान्य रामायणात येतात. श्रीरामाच्या जीवनात त्यांचा या प्रत्येकाशी संबंध येतो आणि यातून श्रीरामाच्या नेतृत्त्वात सुसंघटीत समाजाची निर्मिती होत असल्याचं बघायला मिळतं. रामायणातील संदर्भ आजही सापेक्ष असून, मूल्यांवर आधारीत शिक्षण देण्यासाठी रामायणाचा अभ्यास महत्त्वाचा असल्याचं डॉ.गौरी सांगतात. उत्तर प्रदेशातील खेळकर विवाहगीतांमधून रामसीतेची गोष्ट दिसते. तर, केरळमध्ये सीता निसर्गकन्या, वर्ष १९७८ मध्ये प्रदर्शित ‘कांचनासीताङ्क या मल्याळी चित्रपटातील आदिवासी युवक असलेले श्रीराम, दक्षिणेत बहुसंख्येने आढळणाèया मंदीरांमधील एकल श्रीराम, साधारण १५०० वर्षे जुनी नालअंबलम् म्हणजेच चारही दशरथकुमारांची वेगवेगळी देवालयं आणि लोकगीतांमध्ये असणं हे सारे संदर्भ श्रीराम जनमानसात रुजल्याचे द्योतक आहेत.
 
 
 
Ramayan-Chinmay Mission ‘सीता इज नॉट अ व्हिक्टीम, शी इज अ व्हिक्टर' असं सांगून त्या म्हणतात की,‘अग्निपरीक्षा देण्याचा, अयोध्येचा त्याग करून वनवासात जाण्याचा आणि गर्भारपणात आश्रमातील निवासाचा निर्णय स्वत: सीतेचा आहे. ती श्रीरामाची चित्शक्ती आहे.ङ्क स्वत: वाल्मिकींकडे ज्या १३०० श्लोकाच्या ‘अद्भुत रामायण' रचनेचं कर्तृत्त्व आहे, त्यातही सीतेचं हे दुर्मिळ स्वरूप बघायला मिळतं. सहस्त्रानन हा दशाननाचा आणखी एक भाऊ ! रावणाच्या मृत्यूनंतर संतापलेल्या सहस्त्राननाने श्रीरामाला युद्धासाठी आव्हान दिलं. त्याच्या बाणांनी श्रीराम मूच्र्छित झाले आणि सीतामातेनं रौद्ररूप धारण केलं. तिच्या रोमारोमातून सहस्त्रावधी मातृका निर्माण झाल्या आणि त्यांनी सहस्त्राननाचा वध केला. सीतेचं हे भीषण आणि भयावह रूप श्रीरामाला साहवेना. त्यांनी सीतेला तिच्या मूळ, सौम्य रूपात परत येण्याचं आवाहन केलं, अशी कथा अद्भुत रामायणात असल्याचे डॉ.गौरी सांगतात. सीता ही श्रीरामाचे शक्तीस्थान आहे. स्वाभिमानी सीता ‘सक्षम एकल पालक' आहे, हेदेखील विसरता येणार नाही. आजच्या युवतींनी असं सामर्थ्य स्वत:मध्ये जागृत करण्याची गरज असल्याचं त्या म्हणाल्या.
 
 
 
Ramayan-Chinmay Mission नवीन शिक्षण धोरण २०२० मध्ये मुल्याधारीत शिक्षणाची तरतूद करण्यात आली असल्याचा संदर्भ देऊन त्या म्हणाल्या की, रामायणाचा अभ्यास आणि त्यावर विचारप्रक्रीया होणं आवश्यक आहे. रामायणात प्रतिनिधीक स्वरूपात आलेले संदर्भ समजून घेण्याची गरज आहे. ‘टॅटेमिस्टीक डेईटीज' अर्थात प्राण्यांच्या नैसर्गिक स्वरूपाचे पूजन करणे. ही संकल्पना समजून घेणं, भारतीय समाजासाठी आवश्यक आहे. भारतीयांसाठी राम-सीता परके नाहीत तर आपले आहेत. दैनंदिन जीवनातील नेतृत्त्वक्षमता, नातेसंबंधांचे आदर्श, दांपत्यजीवनातील प्रेम आणि विश्वास अशा जीवनमुल्यांची ओळख रामायणातून घडते. श्रीरामाचा हाच आदर्श आजच्या ‘सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास' या घोषणेच्या मुळाशी आहे. स्थळकाळसापेक्ष विविध आणि कदाचित वैचित्र्यपूर्ण कथा रामायणात जोडल्या गेल्या आहेत. त्या वाचनीय असून, त्यांचा आवर्जून अभ्यास करावा, अशा असल्याचं डॉ.गौरी सांगतात.
 
 
 
Ramayan-Chinmay Mission कर्नाटकात प्रचलित लोककथेनुसार रावणाच्या शिंकेतून जन्म झाला म्हणून तिला सीता हे नाव मिळालं. तर, ऋषींच्या रक्तापासून सीतेचा जन्म मंदोदरीच्या पोटी झाला आणि म्हणून तिला रक्तजा हे नाव मिळाल्याच्या कथाही सांगितल्या जातात. भिल्ल लोकगीतांमध्ये सीतेला कामगार गरोदर स्त्रीप्रमाणे दगडं बाजूला सारून मातीवर झोपण्याचा सल्ला देण्यात आलाय. इतर ठिकाणी तिचा उल्लेख सोनचाफ्याच्या रंगाचा वर्ण असलेली असा असला तरी, या लोकगीतांमध्ये मात्र तिला ‘सावळी' म्हटलेलं आहे. या सगळ्यातून राम आणि सीता हे तत्व समाजमनात किती खोलवर रुजलंय, हेच दिसून येतं. वर्षानुवर्षे आक्रमकांच्या गुलामगिरीत व्यग्र भारतीय समाजाला बांधून ठेवणारं सूत्र म्हणजे राम ! रामनामाचा तारकमंत्र भारतीयांचं कर्तृत्त्व जागविणारा ठरो, या शुभविचारांनी या संवादाचा समारोप झाला.
 
 
९८५०३३९२४०