विश्व मांगल्याचे मागणे :संत ज्ञानेश्वरांचे पसायदान

    दिनांक :21-Apr-2024
Total Views |
संत प्रबोधन
Saint Dnyaneshwar : संत ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ हा भगवद्गीतेवरील टीकाग्रंथ लिहून संस्कृतमधील ज्ञान मराठीमध्ये आणले व अवघ्या मराठी सारस्वताला वेगळ्या उंचीवर घेऊन गेले. संत साहित्याचा विचार जेव्हा आपण समग्रपणे करतो, तेव्हा संत ज्ञानेश्वरांचे ज्ञानेश्वरी ग्रंथ वैभव व संत तुकारामांची अभंग गाथा या दोन ग्रंथांना लक्षात घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. एकूणच मराठी साहित्याला श्रीमंत करणारे हे ग्रंथ आहेत. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये जो तत्त्वज्ञान, काव्यात्मभाव मांडला, त्याचे भावसौंदर्य व त्यांची लेखणी ही आगळ्यावेगळ्या सात्त्विक साहित्याचे लेणं आहे.
 
 
dnyaneswar
 
माझ्या मराठीची बोलू कौतुके।
ऐसी अक्षरे रसिके मिळविण॥
हा त्यांचा निर्धार मराठी भाषा संपन्न करण्याच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
 
 
ईये मराठीचिये नगरी।
ब्रह्म विद्येचा सुकाळु करी॥
अशा प्रकारे हा ग्रंथ निर्माण झाला. पण, त्यामधील 18 व्या अध्यायानंतर मांडलेले ‘पसायदान’ ही विश्व मांगल्य व विश्वशांतीची प्रार्थना आहे. विश्वकल्याणासाठी संतांचं हे मागणं आहे. संत स्वतःसाठी काही मागत नाहीत. जीवन जगताना अवघे जीवनच दुसर्‍यासाठी समर्पित जे करतात ते खर्‍या अर्थाने संत असतात. संकटकाळामध्ये जो कोणी धावून येतो, योग्य मार्ग दाखवितो, तो कुणीही असो तो संतांसमान असतो.
 
 
समाजाने आपल्याला काय दिले त्यापेक्षा समाजाला आपण काय देऊ शकतो, हाच अतिशय व्यापक विचार संत करतात. Saint Dnyaneshwar संत ज्ञानेश्वरांचे ‘पसायदान’ आता या शब्दापासून सुरुवात होऊन ज्ञानेश्वरीमध्ये आतापर्यंत जे लिहिले ते तत्त्वज्ञान असेल, कविता असेल, भावसौंदर्य असेल, पण आता शेवटी मी या जगाच्या मांगल्यासाठी, विश्वाच्या शांतीसाठी जी प्रार्थना करीत आहे, ते पसायदान ज्ञानेश्वरीमधून मांडलेले आहे. पसायदान म्हणजेच विश्व मांगल्याचे मागणं आहे. जेव्हा आपण कुणाला काही मागतो, तेव्हा विश्वात्मक देवाला संत ज्ञानेश्वर या विश्वाच्या शांतीची मागणी मागतात. त्या मागणीमध्ये ते दुष्टांचा दुष्टपणा निघून जावो, अशी मागणी करतात. दुष्ट संपवून टाकावे, असा भाव त्यांचा नाही. खळ प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे. वाईट लोकांचं वाईट वागणं संपलं पाहिजे, असा भाव ते यातून व्यक्त करतात. सर्व प्राणिमात्रांमध्ये परस्परांशी मैत्रीची वागणूक झाली पाहिजे. परस्परांशी मैत्र निर्माण झाले पाहिजे. फक्त माणसातच नव्हे, तर प्रत्येक भूतमात्रांमध्ये हे वागणं असावं; एवढी मोठी विश्वबंधुत्वाची भावना आपल्याला प्रथमत: पाहायला मिळते, ती संत ज्ञानेश्वरांच्या ‘ज्ञानेश्वरी’मध्ये. संत ज्ञानेश्वरांनी जे मागणं मागितलं ते अवघ्या विश्वाच्या कल्याणासाठी आहे. संतांची अवघी मांदियाळी हे महाराष्ट्र देशीचं संत वैभव आहे. प्रत्येक जीव हा सत्कर्मामध्ये रत असला पाहिजे, अशा प्रकारचं मागणंसुद्धा ते मागतात. ते प्रत्येक जिवाच्या हाती सत्कर्मच असेल, तर त्याला वाईट विचार सुचणार नाहीत. त्याच्या मुख आणि डोक्यामध्ये सात्त्विक, उच्च विचार असतील आणि हा वाग्यज्ञ मागताना ते आता या वर्तमान काळापासून सुरुवात करतात. आता हा शब्द वर्तमान काळवाचक आहे. आतापर्यंत जे झालं ते जाऊ द्या. परंतु, यापुढे माझ्या जीवनामध्ये या जगासाठी काहीतरी मागायचं आहे आणि ते मागणं जर काही असेल तर तेच ‘पसायदान’ आहे. या सर्व चराचरासाठी त्याच्या उत्थानासाठी, त्याच्या कल्याणासाठी, प्रत्येक जीवमात्राच्या जगण्याची उमेद देण्यासाठी मागणं मागतो. संत ज्ञानेश्वर ‘ज्ञानेश्वरी’मध्ये लिहितात-
 
तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्मकुसुमांची वीरा ।
पूजा केली होय अपारा । तोषालागीं ॥
माणसाचा स्वतःचा ईश्वर जर कोणता असेल तर ते स्वतःचे कर्म असतात. ती कर्माची, सत्कर्माची मागणी संत ज्ञानेश्वर पसायदानात मागतात. संतांकडे विवेक असतो. संत विवेकाने वागतात. ‘संत जेणे व्हावे, तिने जग बोलणे सोसावे’ अशी संतवाटिकेतील जाईची वेल असणारी छोटीशी मुक्ताईसुद्धा संत ज्ञानेश्वरांची समजूत काढते.
संत ज्ञानेश्वर म्हणतात-
 
चंद्र तेथे चंद्रिका । शंभू तेथे अंबिका ।
संत तेथे विवेका । असणे की जे ॥
ज्या ज्या ठिकाणी आकाशात चंद्र आहे त्या त्या ठिकाणी चांदण्या आहेतच, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ज्या ठिकाणी शंभू महादेव आहेत, त्या ठिकाणी अंबिका माता म्हणजे पार्वती उपस्थित आहे. ज्या ठिकाणी संत आहेत, त्या ठिकाणी विवेक आहे, विचार आहे आणि हे विवेकाचं वागणं ते पसायदानातून मागतात. स्वतःसाठी मागतो आणि जगतो तो माणूस. पण, दुसर्‍यासाठी दुसर्‍याच्या कल्याणासाठी दुसर्‍याच्या जगण्यासाठी जो मागतो तो संत. संत ज्ञानेश्वरांचे ‘पसायदान’ ही वैश्विक प्रार्थना आहे. ही वैश्विक प्रार्थना फक्त एका देशापुरती नसून सर्व भूतमात्रांना सुख-समाधान प्राप्त व्हावं. त्यांचं जीवन सुखमय व्हावं. कल्याणकारी व्हावं यासाठी मागणी मागत आहे. धर्म, पंथ, काल या पलीकडे जाऊन ही मागणी आहे. सर्व आणि सर्वकालीन मानवांसाठी केली गेलेली ती प्रार्थना आहे. Saint Dnyaneshwar संत ज्ञानेश्वरांनी चराचर व्यापलेल्या परमेश्वराकडे मागणं मागितले. पसायदानात इथे कोणीही विशिष्ट देवतेचे नाव घेतलेले नाही. कोणत्या विशिष्ट पंथाचाही निर्देश केला नाही. हा ईश्वर विश्वात्मक आहे. ज्ञानेश्वरांची ईश्वरासंबंधीची कल्पना या पसायदानामध्ये प्रामुख्याने प्रकट झालेली आहे. मानव जातीच्या व्यवहारातील सर्व वाईट, अनिष्ट प्रवृत्ती नष्ट व्हाव्या. त्या ज्यातून उत्पन्न होतात ते खलत्व संपावर जावं. ही खलवृत्ती व्यक्तिगत अथवा सामूहिक स्वरूपात जरी असेल तरी ती काळानुसार थांबावी, अशी भावना त्या पाठीमागे आहे. सर्वत्र मंगलाची स्थापना व्हायची असेल, तर हे खलत्व नष्ट व्हायला पाहिजे. ज्ञानेश्वर मानतात की, खलवृत्ती निसर्गदत्त नसून परिस्थितिजन्य निर्माण होत असते. माणसाची वृत्ती ही एक सचेतन शक्ती आहे, तिला योग्य कार्यभाग मिळाला तर दुरुस्ती सात्त्विकपणे खुलते.
 
 
मैत्री म्हणजे नि:स्वार्थी प्रेम भावना, हेच या युगाचे गाणे आहे. या युगाचं प्रेमगीत जर कोणतं असेल तर ते संस्कृतीचं गाणं आहे. इतिहासातील सर्व प्रेषितांनी आणि संतांनी हाच संदेश या अवघ्या विश्वाला दिला आहे. प्रसंगी त्यासाठी प्राण अर्पण करावे लागले तरी संत विचार डगमगत नाहीत. त्यांनी सर्व प्रकारचे शासन स्वीकारले. दुष्कर्म नाहीसे झाले पाहिजे. विश्व आपापल्या कर्तव्याच्या जाणिवेने कार्यरत असणे त्यांना अपेक्षित आहे. इच्छा कोणतीही असली, तरीही आध्यात्मिक व्यक्तीचा समाजाच्या जीवनामध्ये त्यामुळे संघर्ष होता कामा नये. असे सज्जन सर्वांचे आप्त होत आणि विश्वात्मकाची उपासना यामध्ये करीत राहो.
 
 
Saint Dnyaneshwar : संत ज्ञानेश्वरांचा विचार भाव हा प्रत्येकाचे हृदय परिवर्तन झाले पाहिजे, यावर प्रामुख्याने भर देताना आढळतो. मानवी मनाला आंतरिक आनंद लाभावा. आत्मिक समाधान हे पैशात मोजता येत नाही. सर्वांना अनन्यसाधारण शांती प्राप्त व्हावी यासाठी ही प्रार्थना आहे. समाधानातून प्राप्त झालेली शांती ही चिरकाल टिकणारी असते. त्यांनी देवाला येथे विश्वात्मक असे विशेषण लावले आहे. जगाला परमात्मावाचून वेगळे अस्तित्व नाही. असे दर्शन ज्ञानेश्वरीत अखंडपणे आलेले आहे. यामध्ये गुरू हाच परमेश्वर असाही एक प्रमुख विचार दिसून येतो. पापी, दुराचारीऐवजी ‘खल’ हा प्रवृत्ती वाचक शब्द संत ज्ञानेश्वर मोठ्या खुबीने या ठिकाणी वापरतात. ज्याला स्वतःची आत्मउन्नती साधायची आहे, त्याने आपल्यातील वाईट वृत्तींचा बीमोड करणे गरजेचे आहे. सत्संगतीने स्वभाव दोष दूर होऊ शकतात. व्यक्तीच्या विकृतीवरील सोपा आणि सहज उपचार हा माणसाच्या वैयक्तिक आणि सामाजिक सुसंस्थाचा असू शकतो. त्यासाठी ‘सत्कर्मी रती वाढो’ म्हणताना त्यात कर्माविषयीचा शास्त्रचर्चित अर्थ त्यांना सूचित करायचा आहे, असे प्रकट होते.
 
 
वैयक्तिक स्तरावर सत्कर्माचे प्रेम आणि सामाजिक स्तरावर व्यक्ती-व्यक्तीमधील प्रेम वाढले पाहिजे. हे घडले तर, व्यक्ती आणि समाज यामधील संबंध योग्य होण्यास खूप उपयोगी आणि महत्त्वाचे ठरेल.
 
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्ये पाहो ।
जो जे वांछील तो ते लाहो । प्राणिजात ॥
दुरित म्हणजे पाप, तिमिर म्हणजे या सगळ्या जगातील अंधकार. हा पापरूपी अंधाराचा विनाश होऊन ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र प्रकाशमय होवो.
 
 
सगळ्या विश्वाने स्वतः सूर्याच्या प्रकाशात न्हावून निघावे. मग सर्व प्राण्यांना ज्याला जे हवे असेल ते प्राप्त होईल, असा भाव ते यातून व्यक्त करतात. पाप म्हणजे काय तर सत्व, रज, तम या तीन गुणांच्या कमी-अधिक प्राबल्याने मनुष्याचे आचरण प्रकट होत असते. रज, तम या गोष्टीच्या जोरावर काम आणि त्यामुळे प्राप्त होणारे मद, मोह हे शत्रू बलवान होत असतात. मानव पापाचरास प्रवृत्त होतो. म्हणून स्वधर्म म्हणजे निष्काम प्रवृत्तीने केलेले कर्माचे आचरण. हा गीतेचा मुख्य विषय आहे. भागवत धर्माचे सार इथेच आहे. स्वधर्म आचरणाच्या प्रकाशात सर्वांना ते प्राप्त होवो. अशा प्रकारचा व्यापक भाव या मांगल्याच्या मागणीतून जगाच्या मंगलासाठी Saint Dnyaneshwar संत ज्ञानेश्वर माउली मागतात.
 
- प्रा. डॉ. हरिदास आखरे
- 7588566400